डाॅ. नरेंद्र दाभाेलकर स्मृतिदिन
(२० ऑगस्ट )

जन्म:१ नोव्हेंबर १९४५ मृत्यू:२० ऑगस्ट २०१३
आज २० ऑगस्ट २०२१सामाजिक कार्यकर्ते डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनाला आठ वर्ष पूर्ण होत आहेत. जगाला तंत्रज्ञान देणाऱ्या भारतासारख्या देशात आठ वर्षांनी कटातील केवळ काही लोकच सापडतात ही शोकांतिका आहे. एका बहुआयामी व्यक्तीमत्वाचा असा निर्घुण खून होतो, ही गोष्ट लांच्छनास्पद आहे. आज डाॅ. दाभोलकर आपल्यात नाहीत; पण त्यांचे बहुआयामी विचार प्रत्येकाच्या स्मरणात कायम राहणार आहेत. डाॅ. दाभोलकरांविषयीच्या निवडक गोष्टी जाणून घेऊया.
आठ वर्षांपूर्वी २० ऑगस्ट २०१३ या दिवशी सकाळी नेहमीप्रमाणे डॉ. नरेंद्र दाभोलकर 'मॉर्निंग वॉक'साठी बाहेर पडले, सकाळी साडेसात वाजता पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिराजवळ असलेल्या महर्षी शिंदे पुलावर, काही जणांनी चार गोळ्या झाडून डॉ. दाभोलकरांची हत्या केली. गोळीबार केल्यावर हल्लेखोर दुचाकीवरून पळून गेले. त्यावेळी पोलिसांनी डाॅ. दाभोलकरांना ससून रुग्णालयात दाखल केले; पण त्यापुर्वीच घात झाला. छायाचित्रावरून आणि साधना साप्ताहिकाच्या काही कार्यकर्त्यांनी ओळख पटविल्यावर पोलिसांनी नरेंद्र दाभोलकर यांची हत्या झाल्याचे घोषित केले. एका बहुआयामी व्यक्तीमत्वाचा असा निर्घुण खून होतो, ही गोष्ट लांच्छनास्पद आहे. आज डाॅ. दाभोलकर आपल्यात नाहीत; पण त्यांचे बहुआयामी विचार प्रत्येकाच्या स्मरणात कायम राहणार आहेत. डाॅ. दाभोलकरांविषयीच्या निवडक गोष्टी जाणून घेऊया. उत्कृष्ट कबड्डीपट्टू : डाॅ. नरेंद्र दाभोलकर हे केवळ अंधश्रध्देविरुध्दच्या लढ्यासाठीच प्रसिध्द नव्हते, तर दाभोलकर राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावरचे उत्तम कबड्डीपटू म्हणूनही क्रीडाविश्वात सुविख्यात होते. नरुभाऊंचा (कबड्डीतील लोक दाभोलकरांना `नरुभाऊ` या नावाने ओळखायचे) कबड्डीत चांगलाच दबदबा होता. ते नित्यनियमाने श्री शिवाजी उदय मंडळाच्या मैदानावर कबड्डीच्या सरावासाठी जात. सडपातळ नरुभाऊ मैदानात उतरले की, प्रतिस्पर्ध्यांच्या हातीच लागत नसायचे. कारण, त्यांची हनुमान उडी खूप प्रसिध्द होती. समोरून पकड करण्यास कोणी आले की, नरुभाऊ पायात स्प्रिंग असल्यासारखी उडी मारायचे. एका जागेवर उभ्या-उभ्या सहा फुटांपर्यंत उडी घ्यायचे, असे दाभोलकारांबरोबरचे भिडू आजही अभिमानाने सांगतात. हे सांगताना त्यांचा ऊर भरुन येतो. ते कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाचे व महाराष्ट्र राज्याच्या कबड्डी संघांचे कर्णधार बनले. एवढच नव्हे तर देशाच्या पहिल्या आंतरराष्ट्रीय कबड्डी संघात त्यांचा समावेश होता. वीस-पंचवीस वर्षे त्यांचे कबड्डीशी घट्ट नाते होते. मला लढण्याची, संघटना उभी करण्याची प्रेरणा ही कबड्डीची देण असल्याचे दाभोलकर आवर्जुन सांगत. सांघिक भावना, जिंकण्याची- हरण्याची सवय, मेहनत केल्याशिवाय फळ मिळणार नाही हा मंत्र हे सगळ मला कबड्डीमुळे मिळालं. कबड्डी खेळताना मी सुद्धा इतर खेळाडूंप्रमाणे अंधश्रद्धाळू होतो; पण याच खेळाने मला त्यातला फोलपणा दाखवून दिला, असं ही ते सांगत. तद्नंतर कबड्डी व या खेळाची शास्त्रशुद्ध माहिती देणारे पुस्तकही त्यांनी लिहिले आहे. कबड्डी या क्रीडा प्रकारात त्यांनी दिलेल्या योगदानासाठी महाराष्ट्र सरकारचा मानाचा 'शिवछत्रपती पुरस्कार व शिवछत्रपती युवा पुरस्कार' देऊन सन्मान करण्यात आला आहे. आजही कबड्डी क्रीडाविश्वात दाभोलकरांच्या हनुमान उडीचा सर्रास वापर केला जातो आणि समोरच्या प्रतिस्पर्ध्याला चितपट केले जाते.
उत्तम साहित्यिक : डाॅ. दाभोलकरांनी अंधश्रध्देच्या विरोधात उभारलेला लढा व त्यासाठी जनसामान्यांमध्ये केलेल्या जनजागृतीला तोड नाही. सामाजिक कार्यासाठीचे त्यांचे योगदान अमूल्य आहे. हे सर्व करत असताना त्यांची साहित्य क्षेत्रावरही मोठी कमांड होती. ‘विवेकाची पताका घेऊ खांद्यावरी’हे डॉ. नरेंद्र दाभोळकरांचं पुस्तक विवेकवादी चळवळीत असणाऱ्या प्रत्येकानं वाचावं, असंच आहे. तसेच त्यांनी 'अंधश्रद्धा : प्रश्नचिन्ह आणि पूर्णविराम, अंधश्रद्धा विनाशाय, ऐसे कैसे झाले भोंदू , झपाटले ते जाणतेपण , ठरलं... डोळस व्हायचंय, `तिमिरातुनी तेजाकडे, प्रश्न मनाचे' (सहलेखक डॉ. हमीद दाभोलकर), 'भ्रम आणि निरास, विचार तर कराल? , मती भानामती' (सहलेखक माधव बावगे), श्रद्धा-अंधश्रद्ध', अशी पुस्तकं त्यांनी लिहिली आहेत, तसेच त्यांनी अवांतर लेखनही केले आहे. त्यांच्या या साहित्याचा परिणाम युवावर्गावर मोठ्या प्रमाणात झाला. त्यांच्या या साहित्याच्या जोरावर डाॅक्टरांनी चळवळीसाठी युवापिढी भक्कम केली, त्यास प्रतिसाद मिळत गेला. आजही त्यांचे साहित्य इतके लोकप्रिय आहे की, दरवर्षी त्यांच्या पुस्तकांच्या लाखो प्रतींची विक्री होते. त्यांच्या या साहित्यावरच आजची पिढी व्यसनाधिनतेपासून अलिप्त असलेली पहायला मिळत आहे, ही दाभोलकरांच्याच साहित्याची देणं आहे. रशियापर्यंत पोचलेला फकीरा व्यसनाविषयी डाॅ. दाभोलकरांचं मत : तरुण-तरुणींना हे माहित नाही की, तंबाखू सेवनाने पुरुषाला तात्पुरतं किंवा कायमचं नपुसकत्व येतं, ही गोष्ट वादातीतपणे सिध्द झाली आहे. माझी पत्नी स्त्रिरोगतज्ज्ञ आहे. तिच्याकडे मूल न होणारं जोडप आलं की, पहिली सूचना अशी असते; ती म्हणजे, सर्वप्रकारचं तंबाखू सेवन कायमचं बंद करायचं. हीच गोष्ट मद्याबद्दल तरुणांना माहित नाही की, दारुचा पहिला पेला हातात घेतात, त्यापैकी १५ टक्केच लोक बरे होऊ शकतात, त्यामुळे युवकांनी ठरवलं पाहिजे, व्यसनाच्या आहारी जायचं की नाही, ते एका वाहिनीवरती बोलताना आपले प्रखर मत मांडले. डाॅ. दाभोलकर हे पेशाने डाॅक्टर असूनही त्यांनी प्रॅक्टिस सोडून समाजकार्याची वाट धरली. साता-यात त्यांनी वैद्यकीय व्यवसाय सुरु केला, परंतु समाजकार्याची आवड असणारे डाॅ. दाभोलकर या व्यवसायात रमले नाहीत, त्यांनी सामाजिक चळवळ सुरु केली. दाभोलकरांचं स्पष्ट असं मत होतं की, व्यसनापासून अलिप्त राहिल्यास आपली स्वतःची आणि कुटुंबाची प्रगती शक्य आहे, अन्यथा नाही. व्यसनाधिनतेच्या आहारी गेलेला मनुष्य उद्वस्त झाला आहे. तेव्हा आपली प्रगती साधायची असेल तर, व्यसन सोडायला हवे. व्यसनामुळे आपले मानसिक संतुलनही बिघडते, असेही ते नेहमी सांगत.
'महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती'ची स्थापना : सन १९८९ मध्ये अ.भा.अंनि.स पासून वेगळे होऊन दाभोलकरांनी 'महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती'ची स्थापन केली. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या माध्यमातून नरेंद्र दाभोलकरांनी समाजातील अंधश्रद्धा, अनिष्ट रुढींचं उच्चाटन करण्याण्यासाठी व्याख्यान व सभांच्या माध्यमातून लोकप्रबोधन केले. महाराष्ट्र जादूटोणाविरोधी विधेयक विधीमंडळात मंजूर व्हावे, यासाठी दाभोलकरांनी अनेक वर्षे कार्य केले होते. यासाठी ते सातत्याने विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांची भेट घेऊन विधेयकाच्या बाजून सर्वपक्षीय मत बनवण्याचे काम ते करीत होते. समाजातील अनेक भोंदू बाबांची फसवेगिरी दाभोलकर आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी विविध प्रयोग व प्रात्यक्षिक दाखवून लोकांसमोर उघडकीला आणले होते. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती दरवर्षी एका मान्यवरांना ‘सुधारक’कार गोपाळ गणेश आगरकर पुरस्कार देऊन गौरविते. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे मुखपत्र असलेले ‘अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र’ हे मासिक गेली अनेक वर्षे सांगलीतून प्रसिद्ध होत असते. ते महाराष्ट्रातील सर्वाधिक खपाचे मासिक म्हणून आजही प्रसिद्ध आहे. याचे वर्गणीदार करण्याचे काम अंनिसचे कार्यकर्ते विनामोबदला करीत असतात. आयुष्यात कितीही अडथळे आले, तरी हार मानू नका; सर्वव्यापी सामाजिक कार्य : डॉ. नरेंद्र दाभोलकरांचे सामाजिक कार्यासाठीचे योगदान अमूल्य आहे. त्यांनी अंधश्रध्देच्या विरोधात उभारलेला लढा व त्यासाठी जनसामान्यांमध्ये केलेल्या जनजागृतीला तोड नाही. बाबा आढाव यांच्या 'एक गाव-एक पाणवठा' या चळवळीत दाभोलकर यांचा सक्रिय सहभाग होता. त्यानंतरच्या काळात श्याम मानव यांनी स्थापन केलेल्या 'अखिल भारतीय अंधश्रध्दा निर्मूलन समिती'साठी कार्य सुरू केले. महाराष्ट्रामध्ये विविध पुरोगामी चळवळीतील पूर्णवेळ कार्यकर्त्यांना काही अल्प मानधन देता यावे म्हणून एक मोठा निधी उभा करण्यासाठी ‘सामाजिक कृतज्ञता निधी’ या संस्थेची स्थापना झाली. त्याच्या पहिल्याच अध्यक्षपदी डॉ. श्रीराम लागू, तर सचिवपदी डॉ. दाभोलकर होते. या संस्थेसाठी निधी उभारण्यासाठी डॉ. लागूंसह निळू फुले, सदाशिव अमरापूरकर, रीमा लागू, रोहिणी हट्टंगडी या कलाकरांनी विनामानधन ‘लग्नाची बेडी’ हे नाटक सर्व महाराष्ट्रभर केली. या नाटकाचा फायदा या निधीसाठी दिला. तरीही या निधीला अजून पैशाची गरज होती, म्हणून डॉ. दाभोलकरांनी शाळेतील विद्यार्थ्यांकडून निधी संकलन करण्याची कल्पना मांडली. या कार्यक्रमाला ‘एक उपवास कृतज्ञतेचा’ हे नाव दिले. विद्यार्थ्यांनी एक वेळ उपवास करून त्यातून वाचलेले ५ रुपये या निधीसाठी द्यावेत, अशी ही कल्पना होती. यासाठी डॉ. लागूंना घेऊन दाभोलकरांनी सातारा जिल्ह्यातील ६०० मुख्याध्यापकांची बैठक बोलावून या कामासाठी मुख्याध्यापकांना राजी केले. डॉ. लागू या बैठकीला उपस्थित राहिल्यामुळे सर्व मुख्याध्यापकांनी हे काम आनंदाने करण्याचे ठरविले आणि सातारा जिल्ह्यातून त्याकाळी चक्क २५ लाखांचा निधी जमा झाला. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांना स्मृतिदिनाच्या निमित्ताने विनम्र अभिवादन.
माहिती स्रोत: बाळासाहेब मधाळे यांचा
सकाळमधील लेख
संकलक : राजेंद्र पवार
९८५०७८११७८