!! दिल्ली दर्शन !! (९ ऑक्टोबर )
आम्ही आदि कैलास ओम पर्वत यात्रेच्या निमित्ताने ७ ऑक्टोबरला पुण्याहून प्रवासाला सुरुवात केली आणि ८ ऑक्टोबरला दुपारी १२ वाजता दिल्ली येथे पोहोचलो. दिल्लीला पोहोचण्यापूर्वी फक्त १५ मिनिटे आधीच प्रतिकूल हवामानामुळे यात्रा रद्द झाल्याचा संदेश टूर कंपनीकडून प्राप्त झाला.आता आमच्याकडे परत फिरण्याशिवाय पर्याय राहिला नाही. पुढच्या प्रवासाला निघण्यापूर्वी एक दिवस आमच्याकडे होता त्या दिवसाचा उपयोग आम्ही दिल्ली पाहण्यासाठी घालवला. माझ्याबरोबर ऍड. निवृत्ती माळी, ऍड. हेमंत जाधव, चंद्रकांत फरांदे, नेताजी कुंभारे, अरुण कुंभारे आणि माझे स्नेही आनंदराव कदम आदि होते.
आज आम्ही राष्ट्रीय युध्द स्मारक(अमर जवान ज्योत ), राजघाट,लाल किल्ला, कर्तव्य पथ, कुतुब मिनार,लोटस टेम्पल आणि अक्षरधाम मंदिर पाहिले.
या प्रत्येकाविषयी सविस्तर माहिती खालीलप्रमाणे.....
राष्ट्रीय युध्द स्मारक:
राष्ट्रीय युध्द स्मारक किंवा वॉर मेमोरियल हे भारत सरकारने आपल्या सशस्त्र दलांच्या सन्मानार्थ इंडिया गेट , नवी दिल्लीच्या परिसरात बांधलेले स्मारक आहे. स्मारकाची भिंत जमिनीशी, विद्यमान सौंदर्यशास्त्राशी अतिशय सुसंगत आहे. स्वातंत्र्य संग्राम १९४७, १९६१ चे गोवा मुक्ती युध्द, १९६२ चे भारत चीन युध्द, १९६५ चे भारत पाकिस्तान युध्द, १९७१ चे बांगला देश मुक्ती युध्द, १९८७ चे सियाचीन युध्द, १९८७-८८ चे श्रीलंका युध्द (शांती सेना), १९९९ चे कारगिल युध्द यांसारख्या इतर युद्धातील हुतात्म्यांची नावे येथील दगडावर कोरलेली आहेत. थोडक्यात आपला देश स्वतंत्र होण्यासाठी व त्यानंतर आज अखेर देश रक्षणासाठी प्राणांची बाजी लावली आहे त्यांचे यथोचित स्मारक येथे उभारले आहे. येथे सतत ज्योत प्रज्वलित असून तेथे सैनिकांमार्फत आदरांजली वाहिली जात आहे. येथे नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा भव्य पुतळा नुकताच उभारण्यात आला आहे.
राज घाट : यमुनेच्या तीरावर महात्मा गांधींची समाधी आहे, यालाच राज घाट असे म्हटले जाते. काळ्या संगमरवरी बनवलेल्या या समाधीवर त्यांचे शेवटचे शब्द हे राम कोरलेले आहेत. आता याला सुंदर उद्यानाचे स्वरूप आले आहे. येथे सुंदर कारंजे असून अनेक प्रकारची झाडे लावली आहेत. हा परिसर अतिशय सुंदर असून प्रत्येकजण येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना आदरांजली वाहण्यासाठी येत असतो.
लाल किल्ला: लाल किल्ला ही ऐतिहासिक वास्तू आहे. देशाचे पंतप्रधान १५ ऑगस्टला येथूनच जनतेला संबोधित करतात. लाल वालुकामय दगडाने बांधलेला असल्याने लाल किल्ला असे म्हटले जाते. किल्ल्याभोवती अतिशय मोठा खंदक आहे. या किल्ल्याची जागतिक वारसा स्थळ म्हणून २००७ मध्ये युनेस्कोने नोंद केली आहे. देशाची राजधानी दिल्ली येथे असलेला लाल किल्ला हा देशाच्या स्वाभिमानाचे आणि स्वातंत्र्याचे प्रतीक आहे. भारतातील एक प्रमुख पर्यटन स्थळ आहे. जगाच्या कानाकोपऱ्यातून येथे लोक भेट देण्यासाठी येत असतात. हा किल्ला वास्तूकलेचा उत्कृष्ट नमुना आहे.
कर्तव्य पथ:
स्वातंत्र्यदिनी आपण संचलन पाहतो ते ठिकाण, पूर्वी याला विजयपथ असं म्हणले जायचे. हा परिसरही अतिशय भव्य आहे. या सर्वच परिसरात पावलापावलावर सुरक्षा यंत्रणा सतर्क असलेली दिसून येते.
लोटस टेम्पल:
लोटस टेम्पल हे बहाई समाजाचे उपासना मंदिर आहे. या मंदिराचा परिसर खूपच मोठा आहे. कमळाच्या आकाराची वास्तू असून येथे ध्यानधारणा करण्याची तसेच उपासना करण्याची सोय आहे. या ठिकाणी पर्यटकांची गर्दी मोठ्या प्रमाणावर दिसून आली.
कुतुब मिनार:
दक्षिण दिल्ली शहराच्या मेहरौली भागात हा उंच मिनार आहे. याची उंची२३८ फूट, तळाला रुंदी ४२ फूट तर अंतिम टोकाला ९ फूट एवढी आहे. वरती पाहताना आपल्या डोक्यातील टोपी सहजच पडते. कुतुब मिनारचीही जागतिक वारसा स्थळ म्हणून नोंद झालेली आहे. येथे काही वास्तूंची पडझड झालेली पाहण्यास मिळते. असे असले तरी भारतीय कलेचा उत्तम नमुना आपणास पाहायला मिळतो.
अक्षरधाम मंदिर:
१०० एकरावर उभारलेले स्वामी नारायण मंदिर आहे. हे मंदिर जगातील सर्वात मोठे हिंदू मंदिर म्हणून ओळखले जाते. २६ डिसेंबर २००७ ला मंदिराची गिनीज बुक ऑफ वर्ड रेकार्डमध्ये नोंद झाली आहे.
दिल्लीत सर्वत्र रस्त्याची कामे चालली आहेत.दिल्लीचा परिसर अतिशय मन मोहक आहे. दिल्ली पाहण्यासाठी आठवडाभराचा कालावधी अपेक्षित आहे.आज ओझरतेच दर्शन झाले आहे.
आपण प्रत्येकानेच आपल्या देशाच्या राजधानीला एकदा तरी भेट द्यायलाच हवी.
राजेंद्र पवार
९८५०७८११७८