!! वारी पंढरीची २०२२ !! (दिवस विसावा १० जुलै आषाढी एकादशी )
आज आषाढी एकादशी निमित्ताने पंढरपूरला वैष्णवांचा मेळा भरला होता. चंद्रभागा नदीवर स्नानाची झुंबड उडाली होती. स्नान करताना एकमेकांच्या अंगावर पाणी उडवणे, एकमेकांना स्नान घालत असल्याचे अनेक ठिकाणी दिसून आले. आज रांगेत उभे राहून दर्शन घेणे म्हणजे एक दिव्यच आहे. आम्हीही कळसाचे दर्शन घेतले. पंढरपूर येथे इस्कानचे भव्य मंदिर आहे. पांडुरंगाच्या भेटीसाठी आलेला माणूस इस्कॉनला भेट दिल्याशिवाय परत फिरत नाही अशी सद्यस्थिती आहे. इस्कॉन भगवद्गीतेचा प्रचार व प्रसार संपूर्ण जगभर करते. इस्कॉन मंदिराजवळ नदीवर सुंदर घाट बांधला आहे. येथे वर्षभर भाविकांची वर्दळ असते. आजच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या शुभहस्ते इस्कॉन मंदिर परिसरात भूवैकुंठ भूमिपूजन कार्यक्रम संपन्न झाला. या स्थळाला आपण एकदा तरी भेट द्यायला हवी असे वाटते.
आज रात्री पांडुरंग महाराज घुले यांचे कीर्तन झाले. त्यांनी कीर्तन सेवेसाठी घेतलेला अभंग खालीलप्रमाणे....
नामाचे चिंतन प्रगट पसारा!
असाल ते करा जेथें तेथें !!१ !!
सोडविल माझा स्वामी नीस्चेयेशी !
प्रतिज्ञा हे दासी केली आम्ही !! धृ !!
गुणदोष नाही पाहत कीर्तनी!
प्रेमे चक्रपाणी वश्य होय !!३ !!
तुका म्हणे कडु वाटतो प्रपंच!
रोकडे रोमांच कंठ दाटे !!४ !!
निरुपण करताना महाराज म्हणाले की, आपण जेथे कोठे असु तेथे नामाचे चिंतन केले पाहिजे. मग ते ऑफिस असो, कंपनी असो, शेतात असो, घर कामात असो, तेथे आपण नामस्मरण करायला हवे. नामामुळे आपला तर फायदा होणार आहेच. पण ऐकणाराचेही भले होते. हे नामच आपल्या समस्या सोडवित असते. येथे त्यांनी अनेक उदाहरणे दिली.
तुकाराम महाराज म्हणतात ,आम्ही मालक नसून दास आहोत. दासांनी केलेली प्रतिज्ञा परमेश्वर कधीच खाली पडू देत नाही. प्रपंचात कितीही अडचणी आल्या, कटु अनुभव तरी त्यापासून आपण दूर जात नाही हे खरं आहे. थोडक्यात काय आपण आपले काम करत असताना परमेश्वराचे नामस्मरण करावे. त्याला स्थळ काळाचे कोणतेही बंधन नाही.त्याला कोठे जाण्याची गरज नाही.
आपण आपलं काम संत सावता माळी सारखे देवाचे नामस्मरण करत करावे त्यामध्ये आपले तसेच इतरांचेही हित असते. यामध्ये आपोआपच सत्संग लाभतो तोच आपणास प्रगतीपथाकडे नेहतो असे मला वाटते.
राजेंद्र पवार
९८५०७८११७८