!!वारी पंढरीची २०२२ !! (दिवस आठवा २८ जून )
आज सकाळी ६ वाजता वाल्हेहून पालखीचे प्रस्थान झाले. पालखी तळ गावापासून दोन किलोमीटर अंतरावर असून तो भव्य आहे.पालखीचे प्रस्थान होण्यापूर्वी रोजच पाद्य पूजा होत असते. आज जेऊर फाटा येथे पालखीचा पहिला विसावा होता. या विसाव्याच्या ठिकाणी शेजारच्या गावातील लोक वारकऱ्यांसाठी भाकरी, पिठले आणि खर्डा (ठेचा ) घेऊन येत असतात. वारकऱ्यांना याठिकाणी याचकाच्या भूमिकेत जावे लागते. थोडक्यात मागून खावे लागते. आमच्यासाठी पुरंदर तालुक्यातील मांडकी गावच्या ह.भ.प.ज्ञानेश्वर शिंदे (माऊली ) यांनी बाजरीची भाकरी व खर्डा (ठेचा) आणला होता. त्यांचा आस्वाद आम्ही घेतला. खर्डा खाणे कोणाचंही काम नाही नवीन माणसाला तो आपला प्रताप दाखवतोय. आमचीही यातून सुटका झाली नाही.
दुसरा विसावा नीरा येथे होता. नीरा ग्रामस्थांनी ज्ञानेश्वर माऊलींचे रस्त्याच्या दुतर्फा उभे राहून, फुलांचा वर्षाव तसेच रांगोळ्या काढून स्वागत केले होते. आज दुपारी माउलींनी सातारा जिल्ह्यात प्रवेश केला. सातारा जिल्हा प्रशासनाच्या वतीने पालखीचे स्वागत करण्यात आले. जिल्ह्यात प्रवेश करताच प्रथम पादुकांना नीरा नदीत स्नान घातले गेले. तो क्षण अतिशय भावूक होता. याचवेळी असंख्य भाविकांनीही स्नानाचा आनंद लुटला. मार्गावर काही ठिकाणी वारकऱ्यांच्या सोयीसाठी स्थानिक ग्रामस्थांनी स्नानाची पाईपलाईनद्वारे व्यवस्था केली होती. एरव्ही स्त्री पुरुष एकत्र स्नान करताना फारसे दिसत नाहीत परंतु वारीच्या वाटेवर प्रत्येकजण वारकऱ्यात विठ्ठल रुक्मिणीचे रुप पाहत असतो. त्यामुळे वेगळा भाव मनात येण्याचा प्रश्नच येत नाही. आज दुपारच्या भोजनाची व्यवस्था मुंबईस्थित असणाऱ्या निलम धस मॅडम यांनी केली होती. नीरा येथे त्यांच्या कुटुंबियांकडून दरवर्षीच पंगतीचे नियोजन असते. बऱ्याचवेळा कुटुंबातील कर्ता पुरुष गेल्यानंतर बऱ्याच योजना बंद पडतात पण याठिकाणी धस मॅडम यांनी हा उपक्रम सुरु ठेवल्याबद्दल वारकऱ्यांनी त्यांना धन्यवाद दिले.
आज वर्णे गावाहून माऊलींच्या दर्शनासाठी माजी सरपंच हणमंतराव पवार, रामचंद्र निकम, बाळकृष्ण पवार, बाबासाहेब निकम, शरद हणमंत पवार आदि मंडळी आली होती. वारीचा सोहळा बघून त्यांनी आनंद व्यक्त केला.
आज आणि उद्या पालखीचा मुक्काम लोणंद येथे आहे. लोणंद नगरीला यात्रेचे स्वरुप आले आहे. आज गायक अर्जुन यादव, तबलजी राहुल लोहार तसेच विजय ढाणे यांनी संगीताची मैफल सादर केली.जशा अन्न, वस्त्र, निवारा या मानवाच्या मूलभूत गरजा आहेत तसेच ज्ञान आणि मनोरंजन ही सुद्धा आवश्यक गरज होऊन बसली आहे.
मनोरंजन माणसाला अधिक कार्यप्रवण करते. आपण मनाला आनंद मिळण्यासाठी विविध प्रकारे मनोरंजन करुन घ्यावे असे वाटते.
राजेंद्र पवार
९८५०७८११७८