!! जागतिक ग्रंथ
दिन !! (२३ एप्रिल )
२३ एप्रिल रोजीच जागतिक ग्रंथदिन का साजरा
होतो याचे मूळ काही घटनांमध्ये दडलेले आहे. जगद्विख्यात नाटककार विल्यम
शेक्सपिअरचा जन्मदिन २३ एप्रिल रोजी असून त्यानिमित्त दरवर्षी या दिवशी ग्रंथविषयक
कार्यक्रम आयोजिण्याची प्रथा रूढ झाली. २३ एप्रिल या तारखेचे महत्त्व ग्रंथजगताला
अजून एका दृष्टीने आहे. १७ व्या शतकातील प्रख्यात स्पॅनिश नाटककार, कवी व कादंबरीकार मिग्युल दे सेर्व्हांटेस
सावेड्रा यांचा २२ एप्रिल १६१६ रोजी मृत्यू झाला व त्याचे दफन २३ एप्रिल रोजी
करण्यात आले. या घटनेचे स्मरण ठेवून स्पेनमधील ग्रंथविक्रेत्यांनी मिग्युलच्या
स्मरणार्थ २३ एप्रिल १९२३ रोजी ग्रंथदिन पाळला.
या ग्रंथदिनाला जागतिक स्वरूप आले ते
युनेस्को या संस्थेच्या एका निर्णयामुळे. ग्रंथांचे वाचन, प्रकाशन व त्यांच्या स्वामित्वहक्काविषयी
(कॉपीराइट) मोठ्या प्रमाणावर जागृती निर्माण व्हावी याकरिता प्रोत्साहन
देण्याकरिता २३ एप्रिल १९९५ या दिवसापासून दरवर्षी जागतिक ग्रंथ तसेच
स्वामित्वहक्क दिन पाळण्याचा निर्णय युनेस्कोने घेतला. जागतिक ग्रंथदिन हा २३
एप्रिलला साजरा करण्यात येत असला तरी काही देशांमध्ये तो तिथल्या मोसमाप्रमाणे
वेगळ्या दिवशीही साजरा केला जातो. उदाहरणार्थ आयर्लंड या देशामध्ये मार्च
महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये ग्रंथदिन आयोजिला जातो. स्वीडनमध्ये मोसमाचा
अदमास लक्षात घेऊन दरवर्षी १३ एप्रिल रोजी ग्रंथदिन साजरा केला जातो. दस्तुरखुद्द
इंग्लंडमध्ये जागतिक ग्रंथदिन हा दरवर्षी मार्च महिन्याच्या पहिल्या गुरुवारी
साजरा होतो. ईस्टर स्कूल सुट्ट्यांमध्ये कोणतेही अडथळे नकोत, त्याचप्रमाणे २३ एप्रिल हा इंग्लंडमध्ये राष्ट्रीय संत दिवस म्हणजेच सेंट
जॉर्ज दिन म्हणूनही पाळला जातो. त्यामुळे एकाच दिवशी ब-याच कार्यक्रमांची सरमिसळ
नको या हेतूने इंग्लंडने वेगळ्या दिवशी ग्रंथदिन साजरा करण्याची परंपरा आपल्या
देशात रूढ केली. भारतात मात्र २३ एप्रिल याच प्रमाण तारखेला जागतिक ग्रंथ दिनाचे
कार्यक्रम होतात. हे सगळे वैविध्य अशासाठी सांगितले की, प्रत्येक
दिनाच्या बाबतीत अनेकांच्या ढोबळ कल्पना असतात, पण या
कल्पनांना छेद देणारे कंगोरे समोर आणले की
ज्ञानात थोडी अधिक भर पडते.
भारतीय भाषांमधील
साहित्यनिर्मितीची परंपरा प्राचीन व उच्च आहे :
भारतामध्ये अनेक
बाबतीत विविधतेमध्ये एकता आहे. भारतीय भाषांमध्ये साहित्यनिर्मितीची उच्च परंपरा
आहे. जीवनाच्या सर्व अंगांना स्पर्श करणारे साहित्य प्रसवणा-या अनेक साहित्यिकांनी
या मातीत जन्म घेतला आहे. वैदिक काळापासून ते आजपावेतो याचे अनेक दाखले आपल्याला
या दृष्टीने मिळू शकतील. ब्रिटिश राजवटीच्या उण्यापु-या १५० वर्षांच्या कालावधीत
आधुनिक ज्ञानाची कवाडे भारतातील नागरिकांना मोठ्या प्रमाणावर खुली झाली. विविध
ज्ञानशाखांमध्ये इंग्रजीतून करण्यात आलेल्या उत्तमोत्तम ग्रंथलेखनाने भारतातील
वाचकांचे डोळे त्या काळात दिपून गेले नसते तरच नवल.
अँग्लो इंडियन साहित्य : ब्रिटिश
अमदानीत इंग्रजी साहित्यातील अव्वल साहित्यिकांचे ग्रंथ वाचून त्याच प्रकारचे
साहित्य भारतीय भाषांमध्ये आले पाहिजे अशी प्रेरणा १९ व्या शतकातील अनेक भारतीय
ग्रंथकारांनी घेतली. त्यातून इंग्रजी साहित्यकृतींचे भारतीय भाषांतील अनुवाद
मोठ्या प्रमाणावर सिद्ध होऊ लागले. तसेच आपल्या देशातील भाषांतून विविध विषयांवर
ग्रंथलेखन करण्यास चालना मिळाली. दुस-या बाजूस काही भारतीय लेखक त्या काळात
इंग्रजीतूनही लेखन करू लागले. अशा साहित्याला अँग्लो इंडियन साहित्य म्हणण्याची
प्रथा रूढ झाली. भारत स्वतंत्र झाल्यानंतरही भारतीय लेखकांनी इंग्रजी ग्रंथ
लिहिण्याचा प्रवाह पूर्वीइतकाच सशक्त राहिलेला आहे. आजच्या युवा पिढीत विलक्षण
लोकप्रिय असलेल्या चेतन भगतपर्यंत आता हा प्रवाह येऊन पोहोचलेला आहे.
दक्षिण भारतीय राज्यांमध्ये
स्वत:च्या मातृभाषेविषयी असलेले प्रेम व त्यातून फुललेली अस्मिता ही काहीशी अंगावर
येणारी असते. भाषा व प्रांताच्या अस्मितेचे राजकारणही तेथे जोरात चालते. त्याचे
काही दुष्परिणाम असले तरी सुपरिणामाचा भाग असा की, तामिळनाडू, केरळ, कर्नाटक,
आंध्र प्रदेश या राज्यांमध्ये उत्तमोत्तम साहित्यनिर्मिती होत आली
आहे. या ग्रंथांची विक्रीही तडाखेबंद होते. तेथील भाषिक वृत्तपत्रांचा खपही विक्रमी
असून ती आपापल्या भाषेच्या ग्रंथविक्री व्यवहाराला भक्कम पाठबळ पुरवितात. खासगी वा
सरकारी पाठिंब्याने दक्षिणी भाषांमध्ये स्थापन झालेल्या साहित्य संस्थांचा पायाही
भक्कम असतो. त्यांच्यातर्फे राबवल्या जाणा-या
साहित्यविषयक उपक्रमांची संख्याही मोठी असते. भारताची राष्ट्रभाषा
हिंदीमध्येही लक्षणीय संख्येने ग्रंथ प्रकाशित होत असतात. हिंदी भाषिक राज्यांमधील
वाचकांची संख्याही मोठी असल्याने हिंदी पुस्तकांना मागणी बरीच असते. या
पार्श्वभूमीवर मराठी ग्रंथव्यवहाराचा विचार केला तर फार हताश होण्यासारखी
परिस्थिती नक्कीच नाही.
मराठीमध्ये ललित
साहित्यप्रकारातील ग्रंथ प्रकाशित करणारे २५० प्रकाशक : धार्मिक, ज्योतिष, पाककृती आदी
विषयांवर ग्रंथ प्रकाशित करणा-या प्रकाशकांची संख्या जमेस धरली तर ती पाचशेच्या वर
जाऊ शकते. मराठीतील ललित साहित्यप्रकारातील पुस्तकांची पहिली आवृत्ती ही हजार
प्रतींची असते. एखादे पुस्तक वाचकप्रिय झाले तर त्याच्या पुढील आवृत्या दोन हजार,
प्रसंगी पाच हजारांचाही टप्पा ओलांडतात. दरवर्षी मराठीमध्ये सुमारे
१२०० पुस्तके प्रकाशित होत असावीत असा अंदाज आहे.
जागतिक ग्रंथदिनाच्या
निमित्ताने वाचनाची गोडी अधिक लागावी
यासाठी आपण सर्वजण
प्रयत्नशील राहूया. स्वतः पुस्तके वाचूया, इतरांना वाचनासाठी प्रेरित करुया. आपल्याच जिल्ह्यातील भिलारचा आदर्श
घेऊया.
आपल्या माहितीसाठी काही घोषवाक्ये
◆ वाचाल तर वाचाल
, शिकाल तर टिकाल
◆ जिथे जिथे
दिसते पुस्तक, तिथे व्हावे नतमस्तक
◆ जिथे
पुस्तकांचा साठा ,
समृद्धीचा नाही तोटा
◆ वाचन करता मिळते
ज्ञानं, उंचावते जीवनमान
◆ पुस्तकांशी
करता मैत्री , ज्ञानाची मिळते
खात्री
◆ वाचनाने समृद्ध
होते मती, मिळते आमच्या विकासाला गती
◆ ग्रंथ हे आपले गुरु, वाचनासाठी हाती धरू
◆ वाचन करा वाचन करा, हाच खरा ज्ञानाचा झरा
◆ वाचनालयाला देऊ
आकार, कलामांचे स्वप्ना करू साकार
◆ एक एक वाचू
पुस्तक, गर्वोन्नत होईल मस्तक
◆
वाचनसंकृती घरोघरी, तिथे फुले ज्ञानं पंढरी
◆
वाचनाचा जपा नाद, ज्ञानाचा नको उन्माद
◆
वाचता वाचता मिळते
ज्ञानं,
अनभुव हाच गुरु
महान
◆
पुस्तके वाचून मिळते ज्ञानं, ज्ञानासह सामाजाचे भान
संकलक :
राजेंद्र पवार
९८५०७८११७८