!! टाटा मुंबई मॅरेथॉन २०२५ TATA consultancy services !! (१९ जानेवारी )
आज रविवार दिनांक १९ जानेवारी २०२५ या दिवशी टाटा मुंबई मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. ही स्पर्धा आंतरराष्ट्रीय पातळीवरची असून ती देशात प्रथम क्रमांकाची आहे.आंतरराष्ट्रीय स्पर्धेस पात्र होण्यासाठी ही स्पर्धा विशिष्ट वेळेत पूर्ण करणे आवश्यक असते.
आजची स्पर्धा ४२ कि. मी.२१ कि.मी. व १० कि.मी. अशी होती. मी ४२ कि.मी. च्या स्पर्धेत भाग घेतला होता. मी आज ही स्पर्धा ५:३६:०४ पाच तास छ्त्तीस मिनिटे आणि चार सेकंदात पूर्ण केली.
मुंबई मॅरेथॉनमध्ये देश तसेच विदेशातील स्पर्धक मोठ्या संख्येने भाग घेत असतात. साधारण साठ हजार स्पर्धक देश तसेच विदेशातून आले असावेत.स्वयंसेवकांची संख्याच दहा हजाराच्या आसपास असते.४२ कि.मी.चा विचार करावयाचा म्हटले तर त्यासाठी चार गट (ए.बी. सी. डी.) असे केले होते.
माझा ए गटातच समावेश होता. स्पर्धा जरी ५ वाजता सुरु झाली असली तरी गेट ३ वाजताच खुले केले होते. उशिरा येणारास धावण्याची संधी मिळत नाही. आजच्या या स्पर्धेत साठहून अधिक सातारकर सहभागी झाले असावेत. रनिंग क्षेत्रात बऱ्यापैकी साताऱ्याचा दबदबा निर्माण झाला आहे.
स्पर्धेचा मार्ग आझाद मैदान, सी.एस. एम.टी., मुंबई हायकोर्ट, मरीन ड्राईव्ह, पेडर रोड, बांद्रा वरळी सी लिंक हाजी अली असा होता. काही ठिकाणी चढ काही ठिकाणी उतार तर बाकीचा सपाट भाग होता. चढाला बऱ्यापैकी कस निघत होता.
स्पर्धकांचा जोश वाढवण्यासाठी ठिकठिकाणी वाद्यवृंद होते. मुंबईचे वातावरण दमट त्याचबरोबर सूर्य उगवल्यानंतर उन्हाचा तडाखा त्यामुळे मला अपेक्षित कामगिरी करता आली नाही. मला पाच तासात स्पर्धा पूर्ण करावयाची होती. स्पर्धा मार्गावर बऱ्यापैकी हायड्रेशन पॉइंट होते. पाणी अजून जवळ जवळ मिळायला पाहिजे होते असे वाटते.
फुल मॅरेथॉन आपल्या शरीराचा कस काढणारी स्पर्धा असते. आज मला एरोली रनर्स ग्रुपचे सदस्य आणि शिवकृपाचे अधिकारी संदीप शिर्के यांची मोलाची मदत झाली.
जीवनात यशस्वी होण्यासाठी खडतर परिश्रमाशिवाय पर्याय नाही. आपणही अशा स्पर्धेत भाग घेऊन आपल्या शरीराची क्षमता तपासायला हवी. स्वतः निरोगी राहायला हवे असे मनोमन वाटते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा