!! पोळा( बेंदूर ) महाराष्ट्रातील शेतीशी संबंधित सण !! (१२ जुलै )
बैल पोळा (बेंदूर )हा सण देशात वेगवेगळ्या वेळी साजरा केला जातो.सातारा जिल्ह्यात हा सण आषाढ महिन्यातील शुध्द त्रयोदशी, चतुर्दशीला साजरा करण्याची परंपरा आहे. यावर्षी तो त्रयोदशीला आहे. काही ठिकाणी हा सण श्रावण किंवा भाद्रपद अमावास्येला साजरा करण्याची प्रथा आहे.
बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा हा एक मराठी सण असून हा विशेषतः विदर्भात भव्य पातळीवर साजरा केला जातो, विदर्भातील सीमेवर असलेल्या मध्यप्रदेश व तेलंगण सीमाभागात सुद्धा हा सण साजरा होतो. ज्यांच्याकडे शेती नाही ते मातीच्या बैलाची पूजा करतात.
बेंदराच्या आदल्या दिवशी खांदमळणी असते. यादिवशी बैलाच्या खांद्याला हळद आणि लोणी यांचे मिश्रण करुन ते लावले जाते. यादिवशी बाजरीचे उंडे बैलांना खाऊ घालण्याची परंपरा आहे. बेंदरादिवशी बैलांना आंघोळ घातली जाते. नंतर बैलांना सुंदररित्या सजवले जाते. गळ्यात नवीन कंडा तसेच चाळ बांधला जातो, कासरा देखील नवीन वापरण्याची प्रथा आहे. शिंगे रंगवली जातात, त्यावर पितळी शेंब्या बसवल्या जातात, सर्वांगावर नक्षीदार ठिपके काढले जातात,डोक्याला बाशिंग बांधले जाते, पाठीवर झूल घातली जाते. बैलांची वाजत गाजत मिरवणूक काढण्यात येते. बैलाला आज पुरणपोळीचा नैवेद्य दाखवून तो त्याला खायला दिला जातो. आजच्या दिवशी बैलांना कोणतेही काम लावले जात नाही.शेतकरी वर्गात हा सण विशेष महत्त्वाचा मानला गेल्याने तो उत्साहाने साजरा करण्यात येतो.
आता मात्र परिस्थिती बदलली आहे, ग्रामीण भागात बैलांची संख्या खूपच कमी झालेली आहे. बैलगाडा शर्यतीला परवानगी दिल्याने बैलांना चांगले दिवस येत आहेत ही एक चांगली बाब आहे. कृषी यांत्रिकीकरण झाल्याने बैलांची जागा ट्रॅक्टरने घेतलेली दिसून येते. आपल्या जिल्ह्यात काही गावात तर ट्रॅक्टरची मिरवणूक काढली जाते. खरोखरची बैले नसली तरी मातीच्या बैलाची पूजा करुया. या सणाच्या निमित्ताने जुन्या स्मृतींना उजाळा देऊया.बेंदूर सणाच्या शेतकरी बांधवाना हार्दिक शुभेच्छा.
संकलक: राजेंद्र पवार
९८५०७८११७८