वर्णे गावात विधवांना सन्मानाने वागवण्याचा ठराव आवाजी मतदानाने मंजूर..…
अनिष्ट विधवा प्रथांना कायमची मूठमाती देण्याचा ठराव सातारा तालुक्यातील वर्णे येथे आवाजी मतदानाने मंजूर करण्यात आला. समाजात अनेक अनिष्ट प्रथा आजही प्रचलित आहेत. हेरवाड ग्रामपंचायतीने महाराष्ट्रात पुरोगामी पाऊल उचलले आणि संपूर्ण राज्याला वेगळा आदर्श दिला. सध्या या विचाराला शासकीय आदेशाचे पाठबळ मिळाले आहे. परिवर्तनासाठी नुसता शासकीय आदेश पुरेसा नसतो त्यासाठी मानसिक परिवर्तनाची लढाई लढावी लागते. आपण ठराव मंजूर केला त्याबद्दल मी ग्रामपंचायतीला धन्यवाद देते परंतु येथून पुढे प्रत्येक विधवेची कोठेही अडवणूक होणार नाही याची काळजी ग्रामस्थांनी घ्यायला हवी असे प्रतिपादन लेक लाडकी अभियानच्या प्रवर्तक वर्षा देशपांडे यांनी वर्णे येथे केले. त्या पुढे म्हणाल्याकी येथून पुढे स्थावर व जंगम मालमत्तेत स्त्रियांना समान अधिकार मिळण्यासाठी ग्रामस्थांनी प्रयत्न करायला हवा. बऱ्याचदा हक्कसोड पत्रासाठी माहेरची मंडळी आग्रही असतात पण हे काही योग्य नाही. स्त्रीला तिचा अधिकार मिळू द्या, नंतर ती बक्षीसपत्राने मालमत्ता आपणास देईल परंतु तिचा अधिकार हिरावून घेऊ नका तिला समाजात सन्मान द्या असे आवाहनही त्यांनी केले.
ऍड. शैला जाधव यांनी स्त्रियांसाठी असणाऱ्या प्रचलित कायद्याचा उहापोह केला. त्याचबरोबर महिलांना काही अडचणी असतील तर त्यांना मदत करण्याचे अभिवचनही दिले. ऍड. रुपाली काकडे यांनी या अनिष्ट प्रथेविरुध्द २००८ पासूनची लढाई कशी सुरु आहे त्याचे विवेचन केले.विधवांना सन्मानजनक वागणूक मिळावी यासाठी माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांना निवेदन दिले होते त्याचप्रमाणे त्यांच्या सावित्री विचारमंचच्या माध्यमातून विधवांना सन्मान देणारे अनेक कार्यक्रम नवी मुंबईत घडवून आणल्याचे त्यांनी सांगितले.
वर्णे गावच्या मूळ रहिवासी सातारा येथील महिला उद्योजिका सौ. श्रध्दा पवार यांनी महिलांसाठी सातारा आणि सातारा परिसरासाठी करत असलेल्या कार्याचा उल्लेख केला. समाजात चांगल्या गोष्टी रुजण्यासाठी खूप वेळ लागतो .कामाप्रति आपली श्रध्दा असेल तर त्या गोष्टी समाजात रुजतात. समाजात सुधारणा करत असताना वेळ जातच असतो पण अंतिमतः समाज चांगल्या बाबी स्वीकारतो हे स्वानुभवातून त्यांनी सांगितले.
सातारा पंचायत समितीच्या बचत गटाच्या समन्वयक सीमंतिनी सगरे यांनी वैवाहिक स्त्रीची प्रतीके आणि समाजातील स्त्रियांचे स्थान यांचे ओघवत्या शैलीत वर्णन केले. शाहीर कैलास जाधव यांनी स्त्री ही वडील, पती व मुलाच्या अधिपत्याखाली सतत वावरत असते. परिणामी तिला सगळीकडे दुय्यम दर्जाची वागणूक मिळत असते यामध्ये बदल झाला पाहिजे हे गीतातून स्पष्ट केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गावच्या उपसरपंच सौ. अनिता यादव होत्या. कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवराय, सावित्रीबाई फुले,जिजामाता, शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन व दीप प्रज्वलाने झाली.आम्ही विधवा प्रथांना कायमची मूठमाती देणार अशी शपथ याप्रसंगी दिपाली पंडित व ग्रामपंचायत सदस्या सौ. आशा पवार यांनी दिली. पती निधनानंतर आम्ही स्त्रीच्या बांगड्या फोडणार नाही, जोडवी काढणार नाही, कुंकू पुसणार नाही, मंगळसूत्र काढणार नाही,संबंधित स्त्रियांना कार्यक्रमात सहभागी करुन घेऊ, सन्मानाची वागणूक दिली जाईल अशी शपथ याप्रसंगी दिली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्र संचालन दिपाली पंडित यांनी केले तर आभार मेघा पांढरपट्टे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व महिला ग्रामपंचायत सदस्या सर्वश्री आशा पवार, सौ. नंदाताई पवार, कुसुम पवार, अनिता यादव, सुषमा काळंगे ,सौ. सुनिता सुतार तसेच गावचे सरपंच विजयकुमार पवार, अक्षय धस्के, रजत भस्मे, किशोर काळंगे,रमेश पवार आणि ग्रामसेवक सत्यवान वाघमारे यांनी परिश्रम घेतले त्यांना पंचायत समितीचे माजी सदस्य प्रविण धस्के, सेवानिवृत्त मुख्याध्यापक राजेंद्र पवार, सोसायटीचे माजी चेअरमन हणमंतराव पवार, सुनिलशेठ काकडे ,माजी सरपंच धैर्यशील पवार ,दादासाहेब काळंगे,पां.प. पवार,रामचंद्र पवार,सूर्यकांत पवार,विनोद पवार, श्रीमंत काळंगे ,योगेश पवार यांचे विशेष सहकार्य लाभले. या कार्यक्रमात विधवा महिलांच्या सुवासिनीप्रमाणे ओठ्या भरण्यात आल्या. हा क्षण अतिशय भावूक होता. यावेळी आम्हाला येथून पुढे सन्मानाची वागणूक दिली जावी अशी भावना सुमन धस्के, अश्विनी काळंगे या महिलांनी व्यक्त केली. भावना व्यक्त करताना अश्रूंचा बांध फुटला होता. हा प्रसंग बघून सर्वजणच हेलावून गेले. यावेळी महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. कार्यक्रमास पुरुष ग्रामस्थही बहुसंख्येने उपस्थित होते. सातारा तालुक्यात परिवर्तनाची वाट चोखळणारी वर्णेची ग्रामपंचायत पहिली ठरली असल्याने ,ग्रामपंचायतीचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
राजेंद्र पवार
९८५०७८११७८