phaltan लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
phaltan लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

मंगळवार, ५ जुलै, २०२२

!! वारी पंढरीची २०२२ !! ( दिवस पंधरावा ५ जुलै )

 !! वारी पंढरीची २०२२ !! ( दिवस पंधरावा ५ जुलै )

           आज सकाळी साडेसहा वाजता ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे नातेपुतेहून माळशिरसच्या दिशेने प्रस्थान झाले. पालखीच्या मार्गावर सर्वच ठिकाणी  वारकऱ्यांची उत्तम व्यवस्था होते.अनेक ठिकाणी खाद्यपदार्थांचे स्टॉल होते. सकाळी रस्त्यावर बऱ्यापैकी चिखलमय वातावरण होते. आज पहिला विसावा मांडवे गावात होता. 

              नातेपुते ते माळशिरस मार्गावर सर्वत्र परिसरातल्या लोकांनी माऊलींच्या दर्शनासाठी गर्दी केली होती.आज सदाशिवनगरला पहिले गोल रिंगण होते.रिंगण पाहण्यासाठी खूप लांबून लोक आले असावेत. आपापसात बोलणाऱ्या लोकांची बोली भाषा वेगळी वाटत होती. रिंगणात एक घोडेस्वार विराजमान झाले असतात. एका घोड्यावर माऊली विराजमान झाल्या आहेत असे मानले जाते. रिंगणात मार्गावर रांगोळी काढली होती. प्रत्यक्ष रिंगणात अश्व धावताना घोडेस्वार असणारा अश्व पुढे व माऊलींचा अश्व मागे अशी परिस्थिती असते. रिंगण सोहळा संपल्यानंतर अश्वाच्या पायाखालची माती लोक घरी घेऊन जात होते.दुपारनंतर येळीव याठिकाणी पालखीने विसावा घेतला होता.







         आज दुपारी पुरंदावडे येथे प्रशांत कुंभार यांचेकडे भोजन घेतले. तेथेच हरे कृष्ण संप्रदायाचा कार्यक्रम चालू होता. सर्वजण वाद्यांच्या तालासुरावर नाचत होते. महिलांही नृत्यात सहभागी झाल्या होत्या. फुगड्यांचाही आस्वाद घेतला होता. 

            आपणास मानसिक स्वास्थ्य अध्यात्मामुळे मिळते. हरे कृष्ण संप्रदायाने जगात भगवदगीतेचा प्रचार व प्रसार करण्याचे उत्तम काम केले आहे. मानसिक स्वास्थ्य ,कुटुंबाची तसेच समाजाची प्रगती व्हायची असेल तर  अध्यात्म हाच मार्ग आहे. आपणही अध्यात्माचा आधार घेऊन आपली प्रगती करावी असे वाटते.

   राजेंद्र पवार 

 ९८५०७८११७८

सोमवार, ४ जुलै, २०२२

!! वारी पंढरीची २०२२ !! ( दिवस चौदावा ४ जुलै )

 !! वारी पंढरीची २०२२ !! ( दिवस चौदावा ४ जुलै )

              आज सकाळी साडेसहा वाजता ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे प्रस्थान बरडहून झाले. गावातून रथ आणणे अवघड असल्याने नुसती पालखीच गावात नेली जाते. यामुळे ग्रामस्थांना, भाविकांना माऊलींच्या पादुकांचे जवळून दर्शन घेता येते. आज पहिला विसावा संत साधुबुवा महाराज मंदिर, राजुरी येथे होता. या स्थानाला साधूबुवाचा ओढा असेही म्हटले जाते. या मंदिरात टाळ, मृदंगाच्या तालावर वारकरी नुसते माऊली, माऊली म्हणत नाचत असतात. याठिकाणी मठाचीवाडी येथील दत्ता पवार यांनी आमच्या अल्पोपहाराची व्यवस्था केली होती.

                मंदिरापासून दोन किलोमीटर अंतरावर सोलापूर जिल्ह्याची हद्द सुरु होते. हद्द सुरु होताच फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. सातारा जिल्हा पोलीस दलातर्फे नीरा नदीपासून विशेषतः लोणंदपासून बंदोबस्त सुरु होतो. सोलापूर जिल्ह्याच्या हद्दीपर्यंत सातारा पोलिसांची जबाबदारी असते. सातारा जिल्हा पोलीस दल पालखी सोलापूर जिल्हा पोलीस दलाकडे सुपूर्त करते. चार्ज हँडओव्हर करण्याची प्रक्रिया ही नजरेचे पारणे फेडणारी असते. सोलापूर जिल्ह्यात कारुंडे येथे पहिला विसावा होता. याठिकाणी जिल्हा प्रशासनाच्या वतीने, स्थानिक ग्रामस्थांच्या वतीने पालखीचे भव्य स्वागत करण्यात आले. प्रत्येक विसावा स्थळाला यात्रेचे स्वरुप आलेले असते. थोडे दुर्लक्ष झाले तरी आपल्या माणसापासून आपण भरकटतो. विशेषतः महिला, लहान मुलांना पोलिसांच्या सहकार्याशिवाय आपल्या माणसापर्यंत पोहचताच येत नाही. दुपारनंतर मोरोची येथे पालखीने विसावा घेतला. सकाळी उन्हाचा तडाखा तर दुपारनंतर पावसाच्या हलक्या सरी आल्या. सकाळी उकाड्याने हैरान तर दुपारनंतर आम्हास पावसाने दिलासा दिला. पाऊस परवडला पण उन्ह नको असेच आम्हाला वाटते. उन्हात काम न करण्याच्या सवयीने तसे वाटत असावे.  काही मेंढ्या वारी करताना दिसून आल्या.एक वारकरी तर आपल्या सोबत कुत्रा घेऊन चालले होते.








              वारीत लोक संस्कृतीला चालना मिळते. बऱ्याच वेळा डोंबारी आपला खेळ दाखवताना दिसत होते.तर मरीआईचा गाडापण  आपणास दिसतो. बऱ्याचशा कला सामाजिक आश्रयाच्या अभावाने बंद पडत आहेत. वारीत लाखो लोक सहभागी होतात त्यामुळे अशा पारंपरिक कलांना उर्जितावस्था प्राप्त होत आहे असे वाटते.

             आज आमच्या निवासाची व्यवस्था ज्ञानदीप क्रेडिट सोसायटीच्या नातेपुते शाखेने केली होती तर भोजनाची व्यवस्था याच गावातील भीमराव दादा बर्वे यांनी केली होती. या मंडळींचा सेवाभाव बऱ्याच गोष्टी शिकवून जातो. आज दुपारी कारुंडे गावापासून पावसाला सुरुवात झाली. काही वेळा चांगल्या सरी आल्या. पाऊस आलाकी

सर्व वारकरी प्लॅस्टिकच्या कागदाची खोळ डोक्यावर घेतात. हा कागदच बहूउद्देशीय आहे. जेवायला बसायचं असेल तर हा कागद बस्कर म्हणून वापरता येतो, झोपायचं असेल तर हाच कागद अंथरूण म्हणून वापरता येतो. पाऊस आलाकी डोक्यावर घेतला जातो.

     एखादी वस्तू जर अशी अनेक प्रकारे वापरता येते तर माणसाच्या बाबतीतही गोष्ट तंतोतंत लागू पडते. जर या गतिमान जगात टिकायचे असेल तर व्यक्तीही मल्टिस्किल असली पाहिजे. थोडक्यात एखाद्या व्यक्तीला अधिकाधिक गोष्टी आत्मसात करायला आल्या पाहिजेत आणि त्याप्रमाणे  समाजाला सेवा देता आली पाहिजे असे मला वाटते.

  राजेंद्र पवार 

 ९८५०७८११७८

रविवार, ३ जुलै, २०२२

!! वारी पंढरीची २०२२ !! (दिवस तेरावा ३ जुलै )

 !! वारी पंढरीची २०२२ !!   (दिवस तेरावा ३ जुलै )

              आज सकाळी साडेसहा वाजता फलटणहून ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे प्रस्थान झाले. सुरुवातीचा काही वेळ शहरातूनच पालखीचे मार्गक्रमण होते. रस्त्याच्या दुतर्फा लोक उभे राहून मुखाने माऊली, माऊली असा गजर करीत पालखीचे स्वागत करीत होते. फलटणनगरीत अनेक ठिकाणी खाऊचे तसेच पाण्याचे वाटप होत असताना दिसून आले. आज मार्गात विडणी, निंबळक असे छोटे विसावे होते. तर पिंप्रद येथे मोठा विसावा होता. विडणी, पिंप्रद, निंबळक या सर्वच ठिकाणी अल्पोपहार व भोजनाची उत्तम व्यवस्था केलेली होती. 

                आज पालखीचा मुक्काम बरड येथे आहे. बरड पासून जवळ असणाऱ्या निंबळकच्या हद्दीतील पवारवस्तीवर आजची निवासाची व्यवस्था ज्ञानेश्वर पवार यांनी केली आहे. एखाद्या हिलस्टेशनला राहिल्यासारखे वाटत आहे. व्यवस्था लयच भारी असल्याने वारी व्यतिरिक्त अन्यवेळीदेखील भेट द्यायला हवी असं वाटतंय. फलटण  ते बरड मार्गावर आसपासच्या गावातील लोकांनी माऊलींच्या दर्शनासाठी गर्दी केली होती. आज विडणी येथील विसाव्याच्या ठिकाणी केलेले डेकोरेशन खूपच लक्षवेधक होते. पुणेपासून आत्तापर्यंत ज्या ज्या ठिकाणी विसावे होते त्यामध्ये सर्वात सुंदर सजावट केली होती. विडणी येथे माऊलींच्या पालखीवर जोरदार पुष्पवृष्टी करण्यात आली.






             वारीत एक लहान मुलांची दिंडी आढळून आली. सगळीकडे दिंडीत मोठे वारकरी पाहायला मिळतात.पण लहान मुलांची  दिंडी सहसा आढळून येत नाही. मुलांच्यात अपेक्षित बदल हवा असेल तर लहानपणीच संस्कार होणे गरजेचे आहे. मोठया माणसावर काही प्रयोग करायचं म्हटले तर त्यामध्ये फारसे यश येत नाही. आपण मुलांच्यावर जाणीवपूर्वक काही प्रयोग केले तर यश निश्चितच येते. आपण संस्कारक्षम पिढी घडवण्यासाठी लहान मुलांच्यावर काही प्रयोग करुया,चांगली पिढी निर्माण होण्यासाठी प्रयत्नशील राहूया.

   राजेंद्र पवार 

 ९८५०७८११७८

शनिवार, २ जुलै, २०२२

!! वारी पंढरीची २०२२ !! (दिवस बारावा २ जुलै )



 !! वारी पंढरीची २०२२ !! (दिवस बारावा २ जुलै )

            ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचा फलटणला दोन दिवस मुक्काम असल्याने आम्हालाही थोडी विश्रांती मिळाली. दोन दिवस विश्रांती असेल तर कपडे धुणे, वैद्यकीय मदत उपलब्ध करुन घेणे या बाबी सहज शक्य होतात. आज फलटण नगरीत स्नेही मंडळींच्या गाठीभेटी घेण्यात वेळ गेला. दिपक मुळे यांच्या घरी तर जणू काही संगीताची मैफलच रंगली. शिक्षणामुळे आपल्या ज्ञानात भर पडते हे खरे आहेच. पण अशिक्षित महिला देखील नुसतं ऐकून काही गीते, अभंग, गौळणी पाठ करत असतात. ऐकून म्हणत असल्याने एखादी चूकही होऊ शकते परंतु त्या मागचा भाव जास्त महत्वाचा आहे असे मला वाटते.सकाळी अशीच एक  जालना जिल्ह्यातील धनसंगी येथील सुशिला कुडधनी ही महिला भेटली त्यांच्याकडून समाज प्रबोधनात्मक गौळण ऐकली ती आपल्या माहितीसाठी....

लहान हो, लहान हो हरी,

वेळ नाही बरी माझे भ्रतार घरी !!धृ !!

सासू माझी निघाली बघा मथुरा बाजारी,

सासरा माझा दारामध्ये राखण करी!!१!!

ननंद माझी आहे बघा माझ्या शेजारी,

चाडया चुगल्या करुन माझा संसार मोडी !!२ !!

 एका जनार्दनीं, हरी लहान होईन,

सासू सासऱ्याचा जाच सहन होईना !!३!!

  या गीतामधून सामाजिक स्थितीचे विदारक चित्र मांडले आहे. आपण सावध रहावे अशीच यापाठीमागची भावना आहे.


  सातारा जिल्ह्यातील फलटण हे महत्वाचे शहर याचीही माहिती आपणाला होणे गरजेचे आहे असे वाटते. फलटण हे आपल्या देशातील एक पुरातन शहर आहे. महानुभाव पंथीयांची दक्षिणकाशी म्हणून फलटण ओळखले जाते. दरवर्षी चैत्र वद्य प्रतिपदेला फलटणला घोड्यांची जत्रा भरते. या जत्रेला पंजाब, बिहार, उत्तर भारतातून भाविक मोठ्या प्रमाणात सहभागी होतात. येथे एक प्रसिद्ध श्रीराम मंदिर आहे. ते फलटणचे ग्रामदैवत म्हणून ओळखले जाते. दर वर्षी नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात श्रीराम रथोत्सव साजरा केला जातो. यालाच रामयात्रा असे देखील म्हणतात .या यात्रेला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लोक येतात. फलटण येथील पुरातन हेमाडपंथी जबरेश्वर मंदिरही प्रसिद्ध आहे. ऐतिहासिक वारसा असलेला तालुका आहे.

              फलटण हे हिंदुस्थानातील एक संस्थान होते. नाईक-निंबाळकर हे संस्थानचे राजे होते. आजही राजे मंडळींचा समाजावर सकारात्मक प्रभाव जाणवतो. छत्रपती संभाजीराजे यांच्या मातोश्री सईबाई यांचे हे माहेर होय.फलटण ही महानुभाव संप्रदायाचे चक्रपाणी महाराज यांची जन्मभूमी आहे. फलटण येथील राम मंदिर आणि मुधोजी मनमोहन राजवाडा ह्या अति प्राचीन वास्तू  चांगल्या जतन केल्या आहेत. अशा या ऐतिहासिक शहराला आपण भेट द्यायला हवी असे वाटते.

                फलटण नगरीत सर्वत्र टाळ, मृदंगाचा ध्वनी कानी पडत होता. विश्रांतीच्या या वेळेचा वारकरी सदुपयोग करत होते. अनेक ठिकाणी  वारकरी कीर्तनाचा आनंद लुटत असताना दिसून आले. 

             पालखी सोहळा आनंदमयी व्हावा यासाठी प्रशासन देखील खूप काळजी घेते. वारीच्या मार्गावर पाणी पिऊन प्लॅस्टिकच्या बाटल्या, खाद्यपदार्थांची पाकिटे ,शिल्लक राहिलेले अन्न पडलेले असते. वारकरी पुढे गेल्यानंतर त्या परिसरात रोगराई पसरण्याची भिती असते. ही वारी निर्मल व्हावी यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, शिवाजी विद्यापीठाचे राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी  सर्व कचरा गोळा करण्याचे काम करतात. त्याची विल्हेवाट लावतात. आज फलटणमध्ये राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी दाखल झाले आहेत.आमचे स्नेही आणि वाईच्या ज्ञानदीप इंग्लिश मिडीयम स्कूलचे चेअरमन दिलीप चव्हाण ,जुन्नरचे रंगनाथ हांडे यांच्यासमवेत  एका एन. एस. एस. तुकडीला भेट देण्याचा योग आला. या तुकडीमध्ये किसन वीर महाविद्यालय,वाई,सरदार बाबासाहेब माने महाविद्यालय,रहिमतपूर आणि विवेकानंद महाविद्यालय, कोल्हापूरचे विद्यार्थी सहभागी झाले होते. हे विद्यार्थी पालखी पुढे गेल्यानंतर सर्व परिसर स्वच्छ करण्याचे काम करणार आहेत.  

            लोणंदपासून प्रत्यक्ष काम केलेले सुध्दा आहे. हे विद्यार्थी खूप मोठे करत आहे असे वाटते.स्वच्छता हेच परमेश्वराचे दुसरे नाव आहे असे म्हटले जाते. आपणही अशा सार्वजनिक स्वच्छता मोहिमेत सहभागी व्हावे, आपला परिसर स्वच्छ करुन कोणतेही साथीचे आजार पसरणार नाहीत याची काळजी घ्यावी असे मनोमन वाटते.

    राजेंद्र पवार

  ९८५०७८११७८

शुक्रवार, १ जुलै, २०२२

!! वारी पंढरीची २०२२ !! (दिवस अकरावा १ जुलै )

 !! वारी पंढरीची २०२२ !! (दिवस अकरावा १ जुलै )

               आज सकाळी सहा वाजता तरडगावहून संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचे प्रस्थान झाले. दत्त मंदिर देवस्थान काळज येथे पालखीने पहिला विसावा घेतला. तर दुसरा विसावा सुरवडी येथे होता. तरडगावपासून फलटणपर्यंत रस्त्याच्या दुतर्फा बऱ्याचशा औद्योगिक वसाहती दिसून आल्या. परिणामी या टप्प्यात वारकऱ्यांना मोठया प्रमाणात खाऊ तसेच बिसलेरी बॉटलचे वाटप होताना दिसत होते. वारकऱ्यांना सेवा देण्यासाठी खूप दुरहून लोक आलेले दिसत होते. पालखीची दुपारची विश्रांती निंभोरे येथे होती. दुपारनंतर वडजल येथे पालखीने विसावा घेतला. या पालखी मार्गावर पर्यटन विकास महामंडळाकडून देखील वारकऱ्यांचे स्वागत केले जात होते. या मार्गावर फलटणजवळ क्रेनच्या साह्याने माऊलीच्या रथास पुष्पहार घालण्यात आला. तरडगाव ते फलटणची पायी वारी अगदी सहजरीत्या झाली. फलटण कधी आले ते कळलेही नाही. आज दुपारी निंभोरे येथे किशोर मोरे यांच्या घरी भोजनाचा आस्वाद घेतला तर आजचा मुक्काम फलटणला आशिष कणसे यांच्या घरी आहे. वारीच्या मार्गावरील स्थानिक लोकांना वारकरी भोजनासाठी आपल्या घरी यावेत अशी अपेक्षा असते त्याचाही प्रत्यय आज आला. वारकऱ्यांच्या रुपाने ज्ञानेश्वर माऊलीच आपल्या घरी येतात असे त्यांना वाटते यासाठी आपल्या घरी येण्याचा त्यांचा जास्त आग्रह असतो. "साधूसंत येती घरा तोचि दिवाळी दसरा"  हेच येथे दिसून येते. 











            वारीच्या माध्यमातून अनेक गोष्टी शिकायला मिळतात. आज सहकार क्षेत्रातील दोन दिगग्ज ज्ञानदीपचे व्ही. जी. पवार व शिवकृपाचे संस्थापक व माजी अध्यक्ष गोरख चव्हाण यांची दिलखुलास चर्चा होताना दिसून आली. वारीत अनेक लोक भेटत असतात. प्रत्येकाने आपापली प्रगती कशी केली हेही आपणास कळते. अडचणी आल्या तर मार्ग कसा काढावा हे सुध्दा आपल्याला समजते.

              फलटण शहराच्या प्रवेशद्वारावर  महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्व. यशवंतराव चव्हाण आणि त्यांच्या सौभाग्यवती वेणूताई चव्हाण यांचा पुतळा दिसून आला. हा पुतळा पाहिल्यानंतर एक सुसंस्कृत राजकारणी आणि त्यांचा कार्यकाल नजरेसमोर आला. महाराष्ट्राला कसे प्रगतीपथावर नेले हे समजून आले. फलटण शहरात पालखीवर पुष्पवृष्टी करण्यात आली. शहरातसुध्दा अनेक ठिकाणी खाद्यपदार्थ व चहापानाचे वाटप होताना दिसत होते. एका ठिकाणी मुस्लिम समाजाच्यावतीने चहापान दिले जात होते, त्या कृतीने जास्त लक्ष वेधून घेतले. बऱ्याचवेळा एक धर्मातील लोक दुसऱ्या धर्माचा द्वेष करताना दिसतात. कोणताही धर्म दुसऱ्याचा द्वेष करावा असे सांगत नाही. मानवी मनानेच या भिंती उभ्या केल्या आहेत.आजच्या घटनेने सर्वधर्मसमभावाची शिकवण दिली. आपणही कोणत्याही धर्माचा द्वेष करु नये. इतर धर्मातील चांगल्या गोष्टींचा स्वीकार करावा असे मला वाटते.

     राजेंद्र पवार 

 ९८५०७८११७८

गुरुवार, ३० जून, २०२२

!! वारी पंढरीची २०२२ !! (दिवस दहावा ३० जून )

 !! वारी पंढरीची २०२२ !! (दिवस दहावा ३० जून )

           दोन दिवसांच्या लोणंद मुक्कामानंतर ज्ञानेश्वर माऊलींची पालखी दुपारी एक वाजता तरडगावच्या दिशेने मार्गस्थ झाली. फलटण तालुक्यात पालखीचे आगमन झाल्यानंतर प्रशासनाच्यावतीने जोरदार स्वागत करण्यात आले. फक्त ५ किलोमीटरवर चांदोबाचा लिंब हे ठिकाण असून येथे पहिले उभे रिंगण होते. रिंगणाच्या मार्गावर सर्वत्र रांगोळी काढली होती. रिंगणात चोपदारांचा अश्व पुढे व माऊलींचा अश्व मागे असतो. हे दोन्ही अश्व धावत असताना प्रत्येकजण माऊली, माऊली असा जयघोष करीत असतात. हा सोहळा अतिशय नयनरम्य होता. हे रिंगण पाहण्यासाठी परिसरातील तसेच आसपासच्या तालुक्यातील भाविक आलेले होते. लोणंद ते तरडगाव हे अंतर केवळ ८ किलोमीटर असून, हा सगळ्यात छोटा टप्पा आहे. बरेच लोक लोणंद ते तरडगाव हा टप्पा पायी चालतात. वारी सुरु झाल्यापासून या गावाने नेहमीच  वारीला सहकार्याची भूमिका घेतली असल्याने  या गावाला हा  खूप मोठा मान मिळाल्याचे दिसते.येथील पालखीतळही साडेबारा एकरावर विस्तारलेला आहे.








 तरडगाव गावाबाबत थोडीसी माहिती सांगितलीच पाहिजे.....

             या गावाजवळ रथ आल्यानंतर पालखी रथातून उतरवली जाते. गावातील तरुण पालखी वाहण्याचे काम करतात. या गावात विठ्ठल मंदिर,पवारवाडा, चाफळकर वाडा,सावता माळी मंदिर याठिकाणी पालखी  थांबते. इतकेच नव्हे तर ती खाली ठेऊन  तिची पूजा केली जाते. या गावावर वारकरी संप्रदायाचा मोठा प्रभाव  जाणवतो. वर्षभरात ५ वेळा या गावात ज्ञानेश्वरी पारायणे होतात. गावातील ६०% लोक हे माळकरी आहेत. फलटण-कोरेगाव मतदार संघाचे आमदार दिपक चव्हाण यांचे हे गाव असून हे गाव प्रगत असल्याचे स्पष्टपणे दिसून येते. या गावातील गावकरी  ठिकठिकाणी खाऊ तसेच पाणी वाटप करताना दिसून आले.

               आज आमचा मुक्काम अनिल गाडे या किराणा दुकानदाराकडे आहे. या कुटुंबाचा सेवाभाव खूप काही शिकवून गेला.या कुटुंबाने आमची शाही व्यवस्था केली त्यामुळे त्यांच्या ऋणातच सदैव राहावे असे वाटते.

            पालखी तळावर पालखी आल्यानंतर ती वाजत गाजत तंबूकडे नेली जाते. यावेळी वाद्यांचा गजर आणि मुखाने ज्ञानबा तुकाराम यांच्या नामाचा जयघोष चालू होता. संपूर्ण पालखी मार्गावर चोपदारांचे राज्य चालू असते. जणू काही ते अनभिषिक्त सम्राटच असतात असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. चोपदारांनी दंड उंचावताच सर्वत्र शांतता पसरते. जर एखाद्या दिंडीची काही तक्रार असेल तर ते वाद्यांचा गजर चालूच ठेवतात. आज एक नंबरच्या दिंडीने गजर चालू ठेवला होता. त्यांची तक्रार चोपदारांनी ऐकून घेतली. यावेळी हरवलेल्या जिनसा व सापडलेल्या जिनसा यांचा उल्लेख केला जातो. ज्याच्या जिनसा आहेत त्यांना ओळख पटवून घेऊन जाण्याचे आवाहन केले जाते. वारीत एखाद्याला वस्तू सापडली तर सोहळ्याच्या कार्यालयात जमा केली जाते. थोडक्यात वारीत भौतिक वस्तूंचा मोह सोडला जातो.

         वारीत लाखो वारकरी सहभागी होतात. येथे स्वयंशिस्तीला प्राधान्य असते. स्वयंशिस्त असेल तर कितीही अवघड काम सहज शक्य होते. आपणही आपल्या जीवनात स्वयंशिस्तीला प्राधान्य द्यावे असे मला वाटते.

    राजेंद्र पवार 

  ९८५०७८११७८

!!ग्रीन पुणे मान्सून हिल मॅरेथॉन२०२५ !!

 !!ग्रीन पुणे मान्सून हिल मॅरेथॉन२०२५ !!              आज रविवार दिनांक १३ जुलै २०२५ रोजी पुणे येथे" ग्रीन पुणे मान्सून हील मॅरेथॉनचे ...