!! जागतिक युवा कौशल्य दिवस २०२२ !! (१५ जुलै )
दरवर्षी साजरा होणारा जागतिक युवा कौशल्य दिन तरुणांना रोजगारासाठी, उद्योजक बनण्यासाठी लागणारे कौशल्य प्राप्त व्हावे यावरच लक्ष केंद्रित करतो. जागतिक युवा कौशल्य दिवस तांत्रिक, व्यावसायिक शिक्षण प्रशिक्षणाचे महत्त्व आणि स्थानिक आणि जागतिक अर्थव्यवस्थेशी संबंधित व इतर कौशल्यांच्या विकासाबद्दल जनजागृती करण्याच्या उद्देशाने १५ जुलै रोजी साजरा केला जातो. तरुणांना रोजगार, योग्य काम आणि उद्योजकता या कौशल्यांनी सुसज्ज करणे गरजेचे आहे. हा दिवस वर्तमान आणि भविष्यातील जागतिक आव्हाने सोडविण्यासाठी कुशल तरुणांच्या महत्त्वपूर्ण भूमिकेवर देखील प्रकाश टाकतो. हा दिवस तरूणामधील संवाद, तांत्रिक आणि व्यावसायिक शिक्षण आणि प्रशिक्षण संस्था, कंपन्या, इत्यादींसाठी एक खास संधी प्रदान करतो. केंद्र सरकारच्या पुढाकाराने युवा कौशल्याचे सबलीकरण करण्यासाठी स्किल इंडिया मिशन आजच्याच दिवशी सुरु करण्यात आले आहे. या माध्यमातून तरुणांना अधिक रोजगारक्षम बनवण्यासाठी प्रयत्न चालू आहेत.
जागतिक युवा कौशल्य दिनाचा इतिहास डिसेंबर २०१४ मध्ये संयुक्त राष्ट्र महासभेने ठराव स्वीकारून १५ जुलै हा जागतिक युवा कौशल्य दिन म्हणून घोषित केला. आजच्या तरूणांसाठी बेरोजगारी आणि रोजगाराच्या आव्हानांच्या बाबतीत अधिक चांगली सामाजिक-आर्थिक परिस्थिती प्राप्त करणे हा या दिवसाचा मुख्य उद्देश आहे.
महत्त्व - २१ व्या शतकातील तरुणांसाठी बेरोजगारी ही सर्वात मोठी समस्या आहे. युवा २०२० च्या ग्लोबल एम्प्लॉयमेंट ट्रेंड्सच्या अहवालानुसार २०२० पासून नोकरी नसलेले तरुण किंवा अप्रशिक्षित असलेल्या लोकांची आकडेवारी वाढली आहे ही बाब आपल्यासाठी चिंताजनक आहे.
विद्यार्थ्यांना रोजगाराच्या कोणत्याही अडचणी येऊ नयेत यासाठी वर्णे हायस्कूलमध्ये २०१३ मध्येच कौशल्याधिष्टीत अभ्यासक्रम सुरु केलेला आहे. तो मल्टिपल स्किल फौंडेशन कोर्स या नावाने ओळखला जातो. हा कोर्स सातारा जिल्ह्यातील अगदी मोजक्या शाळांमध्ये आहे. याचा आतापर्यंत अनेक विद्यार्थ्यांनी फायदा घेतला आहे. आय टी आय सती आरक्षित कोट्यातून प्रवेश मिळून अनेकांनी लगेच नोकरी प्राप्त केली आहे. तसेच अनेकांना स्वताचा व्यवसाय उभारणीसाठी प्रोत्साहन मिळत आहे. हायस्कूलमध्ये असलेल्या संधीचा फायदा लोकांनी घ्यायला हवा. या अभ्यासक्रमांतर्गत चार उपविषय आहेत.
ते खालीलप्रमाणे....
१)अभियांत्रिकी २) गृह-आरोग्य ३) शेती पशुपालन ४) ऊर्जा- पर्यावरण
या विषयामध्ये प्रात्यक्षिकावर अधिक भर आहे. हा अभ्यासक्रम पूर्ण करणारास खालील संधी आहेत.
१)आय.टी.आय.साठी २५% जागा राखीव
२) अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी १५% जागा राखीव
३) स्वयंरोजगाराच्या अनेक संधी
आपला पाल्य भविष्यात स्वतःच्या पायावर उभा राहिला पाहिजे यासाठी त्याच्याकडे कोणते ना कोणते कौशल्य असलेच पाहिजे. माध्यमिक ,उच्च माध्यमिक, महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना आपल्या पाल्याला जाणीवपूर्वक कौशल्य शिक्षण द्यायला हवे असे मला वाटते.
राजेंद्र पवार
९८५०७८११७८