warkari लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
warkari लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

रविवार, १० जुलै, २०२२

!! वारी पंढरीची २०२२ !! (दिवस विसावा १० जुलै आषाढी एकादशी )

 !! वारी पंढरीची २०२२ !! (दिवस विसावा  १० जुलै आषाढी एकादशी )

            आज आषाढी एकादशी निमित्ताने पंढरपूरला वैष्णवांचा मेळा भरला होता. चंद्रभागा नदीवर स्नानाची झुंबड उडाली होती. स्नान करताना एकमेकांच्या अंगावर पाणी उडवणे, एकमेकांना स्नान घालत असल्याचे अनेक ठिकाणी दिसून आले. आज रांगेत उभे राहून दर्शन घेणे म्हणजे एक दिव्यच आहे. आम्हीही कळसाचे दर्शन घेतले. पंढरपूर येथे इस्कानचे भव्य मंदिर आहे. पांडुरंगाच्या भेटीसाठी आलेला माणूस इस्कॉनला भेट दिल्याशिवाय परत फिरत नाही अशी सद्यस्थिती आहे. इस्कॉन भगवद्गीतेचा प्रचार व प्रसार संपूर्ण जगभर करते. इस्कॉन मंदिराजवळ नदीवर सुंदर घाट बांधला आहे. येथे वर्षभर भाविकांची वर्दळ असते. आजच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे  यांच्या शुभहस्ते इस्कॉन मंदिर परिसरात भूवैकुंठ भूमिपूजन कार्यक्रम संपन्न झाला. या स्थळाला आपण एकदा तरी भेट द्यायला हवी असे वाटते.

          आज रात्री पांडुरंग महाराज घुले यांचे कीर्तन झाले. त्यांनी कीर्तन सेवेसाठी घेतलेला अभंग खालीलप्रमाणे....

  नामाचे चिंतन प्रगट पसारा!

 असाल ते करा जेथें तेथें !!१ !!

 सोडविल माझा स्वामी नीस्चेयेशी !

प्रतिज्ञा हे दासी केली आम्ही !! धृ !!

 गुणदोष नाही पाहत कीर्तनी!

प्रेमे चक्रपाणी वश्य होय !!३ !!

 तुका म्हणे कडु वाटतो प्रपंच!

 रोकडे रोमांच कंठ दाटे !!४ !!

              निरुपण करताना महाराज म्हणाले की, आपण जेथे कोठे असु तेथे नामाचे चिंतन केले पाहिजे. मग ते ऑफिस असो, कंपनी असो, शेतात असो, घर कामात असो, तेथे आपण नामस्मरण करायला हवे. नामामुळे आपला तर फायदा होणार आहेच. पण ऐकणाराचेही भले होते. हे नामच आपल्या समस्या सोडवित असते. येथे त्यांनी अनेक उदाहरणे दिली.









            तुकाराम महाराज म्हणतात ,आम्ही मालक नसून दास आहोत. दासांनी केलेली प्रतिज्ञा परमेश्वर कधीच खाली पडू देत नाही. प्रपंचात कितीही अडचणी आल्या, कटु अनुभव तरी त्यापासून आपण दूर जात नाही हे खरं आहे. थोडक्यात काय आपण आपले काम करत असताना परमेश्वराचे नामस्मरण करावे. त्याला स्थळ काळाचे कोणतेही बंधन नाही.त्याला कोठे जाण्याची गरज नाही.

           आपण आपलं काम संत सावता माळी सारखे  देवाचे नामस्मरण करत करावे त्यामध्ये आपले तसेच इतरांचेही  हित असते. यामध्ये आपोआपच सत्संग लाभतो तोच आपणास प्रगतीपथाकडे नेहतो असे मला वाटते.

    राजेंद्र पवार 

    ९८५०७८११७८

शनिवार, ९ जुलै, २०२२

!! वारी पंढरीची २०२२ !! (दिवस एकोणिसावा ९ जुलै )

 !! वारी पंढरीची २०२२ !!  (दिवस एकोणिसावा ९ जुलै )

            आज ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे प्रस्थान अडीच वाजता वाखरीहून झाले. प्रत्यक्ष प्रस्थान सुरु होण्यापूर्वीच वरुण राजाने वारकऱ्यांवर जलाभिषेक सुरु केला, तो काही थांबलाच नाही. तसं पाहिलं तर काल दुपारपासूनच पावसाला सुरुवात झाली आहे. प्रत्येक वारकरी ओलाचिंब झाला होता. अशाही परिस्थितीत वारकरी खेळाचा आनंद लुटत होते. बऱ्याचशा पालख्या वाखरी येथे एकत्र येतात. नामदेव महाराज, संत मुक्ताबाई, चांगावटेश्वर,संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर असा पालख्यांचा क्रम असतो. रात्री आम्ही पंढरपूरमध्ये मुक्कामाला होतो. आज पुन्हा वाखरीला जाताना सर्वच संतांच्या पालख्या पाहता आल्या, दर्शन घेता आले.

            वाखरी ही पंढरपूरची वेस आहे. या वेशीवर ज्ञानेश्वर आले असताना प्रत्यक्ष पांडुरंग त्यांच्यासाठी रथ पाठवतात. हा रथ वाखरीजवळ आल्यानंतर ज्ञानेश्वर पांडुरंगाच्या रथात बसतात. याठिकाणी देवच भक्ताच्या भेटीसाठी जातात. येथे देव तोचि भक्त, भक्त तोचि देव असे  साक्षात दिसून येते. येथे कोणीही लहान नाही, कोणी मोठा नाही, सगळेजण सारखेच आहेत. (No leader, No follower, All equal )






           आज ज्ञानेश्वर शिंदे माऊलींच्यामुळे वारकरी शिक्षण संस्थेस भेट देण्याचा योग आला. मामासाहेब दांडेकर यांच्या स्मृती स्थळाला भेट द्यायची संधी मिळाली. पंढरपूर येथील वारकरी शिक्षण संस्थेत भोजन घेतले. वारकरी शिक्षण संस्थेची कार्यपद्धतीही जवळून पाहता आली.

           आज प्रत्येक वारकरी पांडुरंगाच्या भेटीसाठी बेभान झालेला होता. मृदंग आणि टाळाच्या तालावर नाचत होता. ध्येयाचा ध्यास लागला की कामाचा त्रास वाटत नाही त्याप्रमाणे सर्वच वारकऱ्यांना पांडुरंग भेटीची ओढ लागली होती.  वारकऱ्यांना पांडुरंग भेटीची ओढ असते त्या भेटीसाठी होणाऱ्या त्रासाची तो पर्वा करत नाही. त्याचप्रमाणे आपलं ध्येय साध्य करण्यासाठी आपणही अडचणीची तमा न बाळगता ध्येय गाठण्यासाठी प्रयत्न करावेत असे वाटते.

   राजेंद्र पवार

९८५०७८११७८

!!वारी पंढरीची २०२२ !! ( दिवस अठरावा ८ जुलै )

 !!वारी पंढरीची २०२२ !! ( दिवस अठरावा ८ जुलै )

            आज भंडीशेगावहून ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे दुपारी एक वाजता वाखरीच्या दिशेने प्रस्थान झाले. सुरुवातीपासूनच पावसाच्या हलक्या सरी कोसळायला सुरुवात झाली. मध्ये कधीतरी पावसाची उघडीप असायची. आज वाखरीपर्यंत दोन रिंगणे झाली. उभे रिंगण प्रथम झाले. महामार्गावर रिंगण झाल्यामुळे सगळ्यांनाच अधिक आनंद लुटता आला. रस्ता डांबरी असल्याने फुगड्या तसेच अन्य खेळ खेळण्याचा आनंद  वारकऱ्यांनी लुटला.  रिंगणात स्वार असलेला अश्व व माऊलींचा अश्व धावताना प्रत्येक जनाच्या तोंडातून माऊली, माऊली असा जयघोष होत होता. दिंड्या हळूहळू पावसाच्या सरी झेलत पुढे मार्गक्रमण करत होत्या.

                थोड्याच अंतरावर वाखरी पालखी तळ आला. तो भाग बाजीरावाची विहीर म्हणून ओळखला जातो. येथे गोल रिंगण झाले. रिंगणाच्या ठिकाणी बऱ्यापैकी चिखलाचे साम्राज्य होते.तशाही परिस्थितीत रिंगणाचा लोकांनी आनंद लुटला. बऱ्याच लोकांचे कपडे चिखलाने माखले होते. अशा चिखलमय स्थितीत वारकऱ्यांनी अनेक खेळ खेळले. रिंगण म्हटलेकी परिसरातील लोकांची मोठी यात्राच असते. लोक खऱ्याअर्थाने यात्रेचा आनंद लुटत होते.









               रिंगणाजवळ बागल वस्तीवर थोडा वेळ आम्ही थांबलो होतो. यावेळी ज्ञानेश्वर शिंदे माऊली, वैष्णव चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष विजय कासुर्डेआणि उद्योजक गोरख चव्हाण यांची अध्यात्म, शिक्षण, समाजसेवा या विषयावर भरपूर चर्चा झाली. त्या चर्चेत मलाही भाग घेण्याची संधी मिळाली. कोणतीही संस्था नावारुपाला यायची असेल तर निरपेक्ष भावनेने काम करणारी टीम असायला हवी. वैष्णव चॅरिटेबलची निर्मिती सेवाभावातून  झाली आहे. या संस्थेचे विद्यमान अध्यक्ष विजय कासुर्डे आळंदी ते पंढरपूर पायी वारी करतअसत. या वारीत आरोग्याविषयी कोणतीच काळजी घेतली जात नाही हे त्यांच्या लक्षात आले. आपणच यासाठी काही तरी केलं पाहिजे, यातूनच वैष्णव चॅरिटेबल ट्रस्टचा जन्म झाला. वैष्णव चॅरिटेबल ट्रस्ट गेली २९ वर्षे वारकऱ्यांना आरोग्यविषयक सुविधा पुरवत आहे. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत सोपानदेव या तिन्हीही पालखी मार्गावर या ट्रस्टच्या माध्यमातून सेवा पुरवली जाते. याशिवाय आदिवासी भागासाठी वर्षभर काम चालूच असते. देहू संस्थानसाठीही प्रासंगिक सेवा पुरवली जाते. या संस्थेचा ८०ते ९० लाखापर्यंतचा टर्नओव्हर आहे. ही सर्व रक्कम तसेच औषधे देणगी स्वरुपात मिळवली जातात. या संस्थेने कोविडच्या काळात मोफत लसीकरणाचे काम केले आहे. सेवाभावी कार्य असेल तर समाज अशा संस्थांना भरभरुन सहकार्य करत असतो.

                आपण प्रत्येकजण कोणत्या ना कोणत्या संस्थेशी संबधीत असतो. आपण त्या संस्थेत निरपेक्ष भावनेने, सेवाभावी वृत्तीने काम करावे, आपण संबधित असलेली संस्था नावारुपाला आणावी असे मला वाटते.

 राजेंद्र पवार

  ९८५०७८११७८

गुरुवार, ७ जुलै, २०२२

!! वारी पंढरीची २०२२ !! ( दिवस सतरावा ७ जुलै )

 !! वारी पंढरीची २०२२ !! ( दिवस सतरावा  ७ जुलै )

            आज सकाळी साडेसहा वाजता  वेळापूरहून ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे प्रस्थान झाले. लोक रस्त्याच्या दुतर्फा उभे राहून माऊली, माऊली असे म्हणत स्वागत करत होते. सकाळी नऊ वाजताच उघडेवाडी (ठाकूर बुवा) येथे पालखीचे आगमन झाले. याठिकाणी गोल रिंगण असते. या रिंगणाचे वैशिष्ट्य असेकी, येथे वारकरी मोठ्या प्रमाणात खेळ खेळत असतात. दिंड्या क्रमाक्रमाने सोडल्या जातात. येथे वारकरी मोठ्या प्रमाणावर धावताना दिसून आले, मीही रिंगणात धावण्याचा आनंद लुटला. महिला फुगड्या तसेच अन्य खेळ खेळताना दिसल्या. वारीचा आनंद लुटताना लोक दिसून आले.










             प्रथम प्रत्यक्ष रिंगणाची पाहणी केली जाते. इशारा मिळताच स्वार असलेला अश्व व माऊलींचा अश्व धावताना दिसले. रिंगणाच्या ठिकाणी मध्यभागी पालखीसाठी मंडप उभारला होता.रिंगण स्थळापासून साधारण चार किलोमीटर अंतरावर तोंडले-बोंडले जवळ संत तुकाराम व ज्ञानेश्वर माऊलींच्या पालख्या एकाचवेळी आल्या. आज दिवसभर अतिशय आल्हाददायक वातावरण होते. दुपारी पावसाची हलकी सर आल्याने वारकरीही आनंदित झाले. तोंडले गावाजवळ नंदाचा ओढा आहे. तेथे ज्ञानेश्वर माऊली आणि त्यांची भावंडे  पाण्यात खेळत असत. सध्या याठिकाणी पूल झालेला आहे. येथे स्प्रिंकलरच्या साह्याने वारकऱ्यांना भिजवले जात होते.



                येथील विसाव्याच्या ठिकाणी परिसरातील लोक वारकऱ्यांच्या भोजनाची व्यवस्था करतात. दुपारी पंढरपूर तालुक्यातील नांदुरे गावच्या अरुण भिंगारे यांनी तोंडले येथे भोजनाची व्यवस्था केली होती. तोंडले येथे प्रवेशद्वारावर छत्रपती शिवरायांचा भव्य पुतळा आहे. तोंडलेपासून संत तुकाराम, संत सोपानदेव व ज्ञानेश्वर माऊलींच्या पालख्या एकत्र आल्याने जणू काही भक्तीचा महासागरच रस्त्यावर उतरला होता. पिराची कुरोली येथे सोपानदेव व ज्ञानेश्वर माऊलींच्या पालख्यांची भेट होते हा सोहळा खूपच रमणीय असतो. आजचा मुक्काम भंडीशेगाव येथे ज्ञानेश यलमार यांचे घरी आहे. 

       पालखी सोहळ्यात वाहनांची संख्या प्रचंड असते. वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलीस तसेच गृहरक्षक दल प्रयत्न करत असतात. कितीही प्रयत्न केले तरी मनुष्यबळ कमीच पडते. वाहतूक व्यवस्था सुरळीतपणे पार पडावी यासाठी पुणेस्थित असणारे पण मूळचे कठापूरचे नाथाजी केंजळे यांनी स्थापन केलेले वाहतूक मुक्ती दल पोलिसांना मदत करत असते. नाथाजी यांच्याबरोबर २० लोकांची टीम आहे. ते आळंदीपासून वाहतूक सुरक्षित होण्यासाठी कार्यरत आहेत.

      अनेक स्वयंसेवी संस्था हा पालखी सोहळा व्यवस्थित पार पडावा यासाठी आपापल्या परीने सहकार्य करीत असतात. आपणही आपल्या परिसरात होणारे सार्वजनिक कार्यक्रम सुरळीतपणे पार पडावेत यासाठी जे शक्य असेल ते

सहकार्य करावे असे वाटते.

     राजेंद्र पवार 

 ९८५०७८११७८

बुधवार, ६ जुलै, २०२२

!! वारी पंढरीची २०२२ !! ( दिवस सोळावा ६ जुलै)

 !! वारी पंढरीची २०२२ !! ( दिवस सोळावा ६ जुलै)

              आज सकाळी साडेसहा वाजता माळशिरसहून ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे प्रस्थान झाले. जसजसी पालखी पुढे पुढे जात आहे तसतसा वारकऱ्यांचा प्रवाह मोठा बनत चालला आहे. आजही खुडूस या गावी गोल रिंगण झाले. दरम्यानच्या काळात पावसानेही हजेरी लावली. यावेळी वारकऱ्यांनी चिखलाचाही आनंद लुटला. हरिनामात दंग झाल्यानंतर कपड्याकडेही पाहिले जात नाही याचा प्रत्यय आज आला.  रिंगणानंतर आम्ही एका पत्र्याच्या शेडमध्ये विश्रांती घेत होतो. त्यावेळी मूळच्या जर्मन असणाऱ्याआणि आता भारतीय  झालेल्या अर्पणा घोष यांची भेट झाली. त्या रथामागे ३० क्रमांकाच्या दिंडीत चालत आहेत. पाश्चिमात्य असूनदेखील भारतीय संस्कृतीची ओढ त्यांना लागली आहे. पांडुरंगाच्या ओढीने वारीतला सगळा त्रास आनंदाने सहन करत आहेत.

             आज दुपारचा विसावा विझोरी येथे होता.आम्हाला या वारीत वैष्णव चॅरिटेबल ट्रस्टचे वारंवार सहकार्य झाले आहे. किंबहुना त्यांच्यामुळेच आमची वारी सुकर होत आहे.विजय कासुर्डे यांना द्यावे तेवढे धन्यवाद कमीच आहेत. आजचा मुक्काम वेळापूर येथे आहे.  





             वेळापूर गाव जवळ येताच तीव्र उतार आहे. येथे येताच संत तुकाराम महाराजांना पंढरपूर येथील मंदिराचे शिखर दिसले. पांडुरंगाला भेट घेण्यासाठी ते धावत सुटले. वेळापूर येथे एक भारुडाचा कार्यक्रम होतो. हा मान शेडगे दिंडीला आहे. भारुडाच्या माध्यमातून समाजाचे प्रबोधन होते. उदाहरणादाखल एक भारुड देत आहे.

    बया बया बया!

    काय झालं बया?

    दादला नको ग बाई

    मला नवरा नको ग बाई!

    मोडकच घर, तुटकेचं छप्पर

    पन रहायला जागा नाही

   मला दादला नको ग बाई!

   फाटकेच लुगडं,तुटकीच चोळी

   पण शिवायला दोराच नाही

    मला दादला नको ग बाई!

     अशी अनेक भारुडे आपण ऐकलीत.

  वारी हे प्रबोधनाचे उत्तम माध्यम आहे.

           आज पंढरपूरमधील सिंहगड कॉलेजच्या  कॉम्प्युटर इंजिनिअरिंगच्या सेकंड इअरला असणाऱ्या अंजली बाबर, आकांक्षा मिरगणे,राशेश्वरी मेनकुदळे, रुचिता फासे या विद्यार्थ्यांनी भेटल्या. त्या प्लॅस्टिकचा वापर वारकऱ्यांनी टाळावा यासाठी प्रबोधन करत होत्या. प्लॅस्टिक पत्रावळी वापरु नये, ग्लास वापरु नये. प्लॅस्टिक कॅन्सरला निमंत्रण देते. प्लॅस्टिक कुजत नाही. आपण झाडांच्या पानांची पत्रावळी वापरावी. प्लॅस्टिक वापराचे दुष्परिणाम त्या मुलींनी सहज सांगितले. आजही बऱ्याच ठिकाणी प्लॅस्टिकचा वापर होताना दिसतो.

           कोणतीही नवीन गोष्ट समाजात रुजवायची असेल तर त्यासाठी सक्षम पर्याय द्यावा लागतो. उदाहरण द्यायचे झाले तर वृक्षतोंडीस पर्याय म्हणून गॅस वापराचे देता येईल. ५० मायक्रॉंनच्या आतील प्लॅस्टिकचा वापर पूर्णपणे टाळला पाहिजे. आपणही प्लॅस्टिकचा वापर पूर्णपणे टाळूया. प्लॅस्टिकचा पुनर्वापर करुया.जनतेचे आरोग्य अबाधित राहील याची काळजी घेऊया.

     राजेंद्र पवार

   ९८५०७८११७८

!!ग्रीन पुणे मान्सून हिल मॅरेथॉन२०२५ !!

 !!ग्रीन पुणे मान्सून हिल मॅरेथॉन२०२५ !!              आज रविवार दिनांक १३ जुलै २०२५ रोजी पुणे येथे" ग्रीन पुणे मान्सून हील मॅरेथॉनचे ...