!!वारी पंढरीची २०२२ !! (दिवस सातवा २७ जून )
आज सकाळी बरोबर ७ वाजता संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखीचे जेजुरी नगरीतून प्रस्थान झाले. प्रस्थानाच्यावेळी नगरवासीयांनी रस्त्याच्या दुतर्फा उभे राहून माऊलीला निरोप दिला तर अनेकांनी मार्गावर उस्फुर्त स्वागत केले. जेजुरीच्या एम. आय.डी.सी एरियात रस्ते विस्तिर्ण असल्याने वारकऱ्यांना चालणे खूपच आरामदायी वाटत होते. मार्गावर अनेक सामाजिक संस्थांच्या माध्यमातून खाऊची पाकिटे, फराळाचे साहित्य, बिसलेरी पाण्याच्या बाटल्या पुरवल्या जात होत्या. आज पालखी मार्गावर दोन ठिकाणी माउलींनी विसावा घेतला. पहिला विसावा जेजुरीची हद्द संपताच पहिल्याच वळणावर होता. पालखी मार्गावर बहुतांशी ठिकाणी विसावा स्थळे बांधलेली आहेत परंतु या वळणावर बांधलेले विसावा स्थळ नसून तात्पुरता मंडप उभारला होता. याठिकाणी छोट्या छोट्या टेकड्या असून या टेकड्यावर बसून वारकऱ्यांनी फराळाचा आनंद लुटला. येथे कोणतेही गाव नसल्याने वारकऱ्यांशिवाय अन्य कोणीही नव्हते. हा रस्ता घाट रस्ताच होता असे वाटते. या मार्गावर रस्ता व रेल्वे मार्ग अगदी समांतर असल्याने दृश्य खूप विलोभनीय वाटत होते.




दुसरा विसावा दौंडज याठिकाणी होता. जेथे विसावा असतो त्या स्थळाला, गावाला यात्रेचे स्वरुप प्राप्त झालेले असते. आज दुपारीच माऊलींची पालखी वाल्हे गावात आलेली आहे. आज येथेच माऊलींच्या पालखीचा मुक्काम आहे. येथील पालखी तळ रेल्वे लाईनच्या पलीकडे असून अतिशय भव्य दिव्य आहे. ज्या गावात माऊली विसावल्या आहेत त्या गावाविषयी थोडीसी माहिती सांगितली पाहिजे.
बघूया वाल्हे गाव कसं हाय ते ....
पुरंदर तालुक्यातील सर्वात मोठे गाव म्हणून या गावाची ओळख. आद्य कवी रामयणकार महर्षी वाल्मिकी ऋषी पासून ते अगदी शिवकालीन काळापर्यंत तसेच स्वातंत्र्य लढ्यातदेखील येथील ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होता. भारताला स्वातंत्र्य मिळाले त्यादिवशी एका रात्रीत या गावात विजय स्तंभ उभारल्याचा उल्लेख आहे.
वाल्याचा वाल्मिकी कसा झाला याबद्दल माहिती घेतलीच पाहिजे. त्याच्या याबदलात त्याच्या पत्नीचा सिंहाचा वाटा आहे. नेमकं परिवर्तन कसं झाले ते पाहूया. रामायण, म्हटले की आम्हा भारतीयांचा ऊर केवढा भरुन येतो. रामायण आपल्या संस्कृतीचा ठेवा असून रोजच्या जगण्यात, पावलोपावली त्याचे दाखले दिले जातात. 'पुत्र असावा तर, प्रभुरामासारखा'! 'पती असावा तर मर्यादापुरूषोत्तम श्रीरामासारखा !', भाऊ असावा तर लक्ष्मणासारखा !', 'पत्नी असावी तर सीतेसारखी !', खरं तर या सर्व दाखल्यापूर्वी आणखी एक दाखला आवर्जून द्यायला हवा. तो म्हणजे, 'बायको असावी तर वाल्याकोळ्याच्या बायकोसारखी !', कारण तीच खरी रामायणकर्त्याची ' कर्ती ' आहे, हे दुर्लक्षीत सत्य कायमच दुर्लक्षीतच राहिले.
रामायणकर्त्या वाल्मिकी ऋषीच्या जडणघडणीसंबधी, अगदी जुजबी इतिहास सांगितला जातो. वाल्याकोळी वाटसरूंना जंगलात अडवून, प्रसंगी त्यांचे मुडदे पाडून, त्यांची लूट करुन चरितार्थ चालवायचा. एकदा नारदमुनींनाच वाल्याने अडवले. तेव्हा नारदमुनींनी त्याचे तिथल्या तिथे बौधिक घेतले. 'अरे मूर्खा हे पापकर्म कशासाठी करतोस' असे विचारल्यावर, 'माझ्या बायकोपोरांसाठी', असं सांगितल्यावर, नारदमुनी त्याला म्हणतात, 'जा तुझ्या बायकोला विचारुन ये, ते तुझ्या पापात सहभागी आहेत काय ?. 'तू इथेच थांब, मी विचारुन येतो' म्हणत वाल्या पळतच घरी येतो. दारावर धाडकन् लाथ मारुन घरात घुसतो. बायकोमुलं घाबरतात. वाल्या बायकोला धमकाऊन विचारतो. 'बोल तू माझ्या पापात सहभागी आहेस की नाही ? आता असा विचार करा, शेकडो माणसांचे मुडदे पाडलेला, खाद्यांवर लखलखती कुऱ्हाड घेतलेला, क्रुरकर्मा, दरोडेखोर नवरा असा संतापल्यावर, एक अशिक्षीत, अडाणी, परावलंबी स्री दुसरं काय उत्तर देणार !! पण नाही. त्या तडफदार आदिमायाशक्तीने, क्षणाचाही विचार न करता, 'नाही, मी तुमच्या पापात सहभागी नाही!', असे सडेतोडपणे सांगितले आणि तोच वाल्याकोळ्याच्या जडणघडणीतला 'टर्नींग पाॅईंट' ठरला.
गरीबबापड्या बायकोच्या अनपेक्षीत तडफदार उत्तराने वाल्याकोळ्याचे डोळे खाडकन् उघडतात. तो नारदमुनीची क्षमायाचना करतो. नारदमुनी त्याला दिक्षा देतात. तो तप करतो आणि दरोडेखोर वाल्याकोळ्याचा 'वाल्मिकीऋषी' होऊन 'रामायण' हे महाकाव्य रचतो. ही सरळसाधी गोष्ट आपण वाचून सहज सोडून देतो. पण, एक साधी शंका कुणाच्याही मनात का येत नाही! की समजा, वाल्याकोळ्याच्या बायकोने, 'व्हय.. आम्ही आहोतच की तुमच्यासंगं !', असं सर्वसाधारण, सोईचं उत्तर दिलं असतं तर ! नारदाचं काही खरं नव्हतंच पण वाल्याकोळ्याचा वाल्मिकी ऋषी होऊन त्याने रामायण तरी कसे काय रचले असते? अशी रास्त शंका घेता येऊ शकते.
वाल्हे गावात महर्षी वाल्मिकीचे मंदिर आहे. याच गावात महर्षी वाल्मिकी या नावाने हायस्कूल आहे. सध्या रामायण मालिका दूरदर्शनवर चालू आहे तीही आपण पहावी. नितीमार्गाने कसे जगावे हे रामचरित्र सांगते. वाल्या कोळ्याची बायको आणि सध्याच्या स्त्रिया यांची तुलना केली तर एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते ती म्हणजे बऱ्याचशा स्त्रिया वाल्या कोळ्याच्या बायको सारख्या वागत नाहीत . जर त्या वाल्या कोळ्याच्या बायकोप्रमाणे वागल्या तर समाजातील अनेक भ्रष्टाचारासारख्या बाबी कमी होतील. नीतिमान तसेच भ्रष्टाचारमुक्त भारत निर्माण करण्यासाठी वाल्या कोळ्याच्या बायकोचा आदर्श घ्यावा. जे पतीचे अयोग्य वाटत असेल त्यासाठी स्पष्टपणे नकार द्यायला शिकले पाहिजे असे मला वाटते.
राजेंद्र पवार
९८५०७८११७८