बुधवार, ११ ऑगस्ट, २०२१

!! आंतरराष्ट्रीय युवा दिन !!(१२ ऑगस्ट )

 

!! आंतरराष्ट्रीय युवा दिन !!(१२ ऑगस्ट )



            आंतरराष्ट्रीय स्तरावर १२ ऑगस्ट हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय युवा दिन’ म्हणून साजरा केला जातो. दरवर्षी यानिमित्ताने युवकांशी निगडीत विशिष्ट पैलूवर चर्चा घडवून आणली जाते. यावर्षी ‘शांती स्थापनेत युवकांचा सहभाग’ (युथ बिल्डींग पीस) हे घोषवाक्य निश्चित करण्यात आले आहे. सृजनशील अशा युवा शक्तीच्या माध्यमातून जगभरात शांततेची स्थापना व्हावी हा यामागचा विचार आहे.
संयुक्त राष्ट्रांनी १९८५  मध्ये पहिले आंतरराष्ट्रीय युवा वर्ष साजरे केले. या घटनेच्या दहाव्या वर्धापन दिनानिमित्त १९९५ मध्ये जगातील युवावर्गाच्या स्थितीत अनुकुल बदल घडवून आणण्यासाठी ‘वर्ल्ड प्रोग्राम ऑफ ॲक्शन फॉर युथ’ स्वीकारण्यात येऊन त्या माध्यमातून मार्गदर्शक तत्वे निश्चित करण्यात आली.
              या कार्यक्रमाच्या माध्यमातून संयुक्त राष्ट्र महासभेने शिक्षण, रोजगार, गरिबी, आरोग्य, पर्यावरण, सहभाग, जागतिकीकरण, युवक आणि संघर्ष, एचआयव्ही एड्स आदी १५ क्षेत्रांची निवड प्राध्यान्याने केली. युवकांना मिळणाऱ्या संधींची संख्या वाढविणे, त्यांची गुणवत्ता वाढविणे आणि त्या माध्यमातून समाजासाठी युवकांचे योगदान वाढविणे यादिशेने या कार्यक्रमाद्वारे चांगले प्रयत्न झाले आहेत.
लिस्बन येथे ८ ते १२ ऑगस्ट १९९८ दरम्यान पार पडलेल्या युवकांशी निगडीत मंत्र्यांच्या आंतरराष्ट्रीय परिषदेत १२ ऑगस्ट रोजी आंतरराष्ट्रीय युवा दिन साजरा करण्याची शिफारस करण्यात आली आणि त्यावर १७ डिसेंबर १९९९ रोजी संयुक्त राष्ट्र महासभेने शिक्कामोर्तब केले. तेव्हापासून हा दिवस युवा दिन म्हणून जगभरात साजरा करण्यात येतो.
         सुरक्षा परिषदेने आपल्या २०१५ आणि २०१६ च्या ठरावात शांतीस्थापनेच्या प्रयत्नांना यश येण्यासाठी युवकांची भूमीका महत्त्वाची असल्याचे नमूद करण्यात आले आहे. सामाजिक न्याय आणि शांतीस्थापनेच्या अशाच प्रयत्नांना यावर्षीच्या युवा दिनाच्या माध्यमातून अधोरेखित करण्यात आले आहे.
           युवक हा समाजात बदल घडवून आणण्यासाठी महत्त्वाचा घटक आहे. युवकांना नागरिकांचे अधिकार, सामाजिक न्याय आणि विश्वशांतीच्या महत्त्वाबाबत जागरूक केले तर जगात विविध पातळ्यांवर असणारे संघर्ष, वाद कमी होऊ शकतील. अशा अनुकुल बदलासाठी युवावर्ग निश्चितपणे पुढे येईल. जनसामान्यांच्या प्रगतीसाठी जागतिक शांततेचे महत्त्व लक्षात घेता शांतता प्रस्थापित करण्यात युवकांची भूमिका महत्त्वाचे ठरणार आहे.
               आजचा युवक ज्ञान आणि विज्ञानाच्या विश्वात वावरणारा आहे. मानवी मुल्ये आणि मानवी विकासाबाबत त्याला चांगली जाण आहे. विज्ञान - तंत्रज्ञानाच्या माध्यमातून जगातील अनेक समस्यांची उत्तरे शोधण्याची क्षमता त्याच्यात आहे. या क्षमतेचा उपयोग तो जगात शांतता प्रस्थापित करण्यासाठी निश्चितपणे करू शकतो. जागतिक युवा दिनाच्या निमित्ताने या भूमिकेबाबत चर्चा होणे आणि त्यादिशेने युवकांचा सहभाग वाढणे तेवढेच महत्त्वाचे आहे.
लेखक: डॉ.किरण मोघे
माहिती स्रोत: महान्युज
संकलक: राजेंद्र पवार
  ९८५०७८११७८

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

!!ग्रीन पुणे मान्सून हिल मॅरेथॉन२०२५ !!

 !!ग्रीन पुणे मान्सून हिल मॅरेथॉन२०२५ !!              आज रविवार दिनांक १३ जुलै २०२५ रोजी पुणे येथे" ग्रीन पुणे मान्सून हील मॅरेथॉनचे ...