आज कोरेगाव, फलटण आणि खंडाळा तालुक्याच्या सरहद्दीवर असणाऱ्या पांडुरंग राचकर यांच्या शेतीस भेट देण्याचा योग आला. मा. मानसिंग पवार, टॉप गिअरचे कार्यकारी संचालक श्रीकांत पवार, राजकुमार काळंगे, भगवान पवार आणि मी या टीममध्ये होतो. पृथ्वीच्या निर्मिती नंतर कधीही जिथे शेती केली नव्हती अशा ठिकाणी राचकरसाहेबांनी शेती केली आहे. असामान्य व्यक्तीमत्व असेल तर काय घडू शकते हे आज पाहायला मिळाले. दूरदृष्टी असेल तर खडकालाही पाझर फोडता येतो हेच याची देही याची डोळा प्रत्यक्ष अनुभवता आले.आता प्रत्यक्ष राचकर साहेबांनी राबवलेल्या प्रकल्पाविषयी माहिती घेऊया.
प्रथम सालपे घाटातील राबवलेल्या शेती विषयी माहिती पाहूया.
राचकरसाहेबांच्या शेतीस भेट देण्यासाठी साताराहून वाठारस्टेशनमार्गे सालपे घाटातून उजवीकडे वळावे लागते. घाटातून डोंगर टेकड्या आपलं लक्ष वेधून घेतात. शेतीकडे जाण्यासाठी पूर्णपणे घाटमार्ग आहे."घाटातली वाट काय तिचा थाट, खाली खोल दरी वर उंच कडा",अशीच परिस्थिती अनुभवायला मिळाली.
रस्त्याच्या दुतर्फा आंब्याच्या झाडांची लागवड केली आहे. सर्वच झाडांना ठिबकद्वारे पाणी दिले जाते. सालपे येथील जमीन साधारण ५० एकर असावी याठिकाणी पेरु, सीताफळ यांच्या बागा पाहण्याची संधी मिळाली. सर्व शेतीत गाडीने जाता येते.पेरु तैवान पिंक जातीचा होता. साधारण ४० एकरावर पेरु असावा उर्वरित क्षेत्रावर सीताफळ लागवड केली आहे. सर्वच झाडे अतिशय तजेलदार होती. या झाडांना स्लरी नियमितपणे दिली जाते. प्रत्येक फार्मवर देशी गायींचा गोटा होता. या सर्व क्षेत्राला विंधन विहिरीचे पाणी दिले जाते. तीन विंधन विहिरी (बोअर वेलचे )पाणी एकत्र केले असून सीताफळ शेतीलातर पुर्णपणे गुरुत्वाकर्षण पध्दतीने पाणी दिले जाते. विशेष म्हणजे राचकरसाहेबांच्या प्रयोगशील वृत्तीमुळे परिसरातील शेतकऱ्यांनीही आपल्या शेतीत सुधारणा केली आहे.
ही शेती पाहून झाल्यानंतर तडवळे सं. वाघोली येथील शेतीला भेट दिली. हे क्षेत्र ७५ एकर एवढे होते. येथे ४० एकरवर खजुराची बाग पाहायला मिळाली. ही बाग ५ वर्षांपूर्वी लावली होती तिला आता गोड फळे लागली आहेत. प्रत्यक्ष खजुरांचादेखील आस्वाद घेता आला. खजूर हे अरेबियन राष्ट्रात येणारे पीक मानले जाते परंतु सातारा जिल्ह्यातील दुष्काळी भागात हे पीक आणण्याची राचकर कुटुंबाने किमया केली आहे. अशक्य ते शक्य करतील स्वामी असं म्हटलं जातं पण मला असे वाटते की अशक्य ते शक्य करतील राचकरसाहेब.
बऱ्याचवेळा आपण नकारात्मक भावनेने अनेक गोष्टींकडे पाहतो परंतू राचकरसाहेबांनी त्या बाबीकडे सकारात्मक दृष्टीने पाहिल्यामुळे हे सर्व घडले आहे.आज राचकरसाहेब सामान्यातून असामान्य व्यक्ती झाली आहेत. प्रिंट मीडिया, दुरदर्शनच्या अनेक वाहिन्यांनी त्यांची दखल घेतली आहे. त्यांच्या कष्टाळू वृत्तीमुळे ते ६५० एकराचे मालक झाले आहेत. त्यांचा शेतीतील टर्न ओव्हर कोट्यवधी रुपयांचा झाला आहे. गतवर्षी नुसते पेरुच ८० लाखाचे विकले आहेत. त्यांच्याकडे फळ प्रक्रिया उद्योगाचे काम चालू असल्याचे दिसून आले.
क्रांतिसिह नाना पाटील यांनी "साताऱ्याचे प्रतिसरकार स्थापन केले अगदी याचप्रमाणे राचकर साहेबांनी शेतीचा मळा फुलवला." असे म्हणावेसे वाटते. कामाचे वेड लागलेली माणसं असं अलौकिक कार्य करु शकतात हे निश्चित. आपणही आपल्या क्षेत्रात मोठं होण्यासाठी स्वताला वेड लावून घ्यायला हवं असं वाटतं.
राजेंद्र पवार
९८५०७८११७८