srt pune लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
srt pune लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शनिवार, १० डिसेंबर, २०२२

आयुष्यातील पहिली सर्वात खडतर मॅरेथॉन ५३ किलोमीटर ११ तास ७ मिनिटात पूर्ण ......

 !! सिंहगड, राजगड, तोरणा अल्ट्रा मॅरेथॉन पुणे !! (SRT ULTRA MARATHON, PUNE )

                   (१० डिसेंबर )

                हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, रयतेचे राजे,अखिल भारतीयांचे प्रेरणास्थान छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करण्यासाठी सदरच्या मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले होते. थोडक्यात ही पाचवी मॅरेथॉन छत्रपती शिवरायांना समर्पित केलेली होती.



                  सदरच्या मॅरेथॉनमध्ये  वेस्टर्न घाट रनींग फौंडेशन,महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळ, वन विभाग पुणे, पुणे ग्रामीण पोलीस, हवेली, भोर, वेल्हे, मुळशी या तालुक्यातील जनता त्याचबरोबर घेरा सिंहगड वनसमिती यांचा महत्वपूर्ण वाटा आहे.  ही रन ११कि. मी.,२५  कि. मी. व ५३ कि. मी. अशी होती. मी ५३ कि. मी.मध्ये भाग घेतला होता. हे अंतर पाऊल वाटेने पूर्ण करावयाचे असल्याने शर्यत पूर्ण करण्याचा कालावधी १२ तासाचा होता. मी हे अंतर ११:०७:३२( अकरा तास सात मिनिटे आणि बत्तीस सेकंद )   एवढया वेळेत पूर्ण केले. एवढया मोठ्या स्पर्धेत भाग घेण्याची आयुष्यातील पहिलीच वेळ होय. ही स्पर्धा अतिशय अवघड होती. सिंहगड, राजगड व तोरणा किल्ला चढणे- उतरणे,अगदी कसोटी होती.आपणा सर्वांच्या शुभेच्छामुळे कसोटीस उतरु शकलो असे वाटते. ५३ कि. मी.नाव नोंदणी केलेल्या ३०० पैकी साधारण १०० लोकांनी ही शर्यत पूर्ण केली असावी.

         आज माझ्याबरोबर माझे बंधू डॉ. दत्तात्रय भोसले, आर्किटेक्ट रामदास लावंड, गुणवंत गायकवाड,  सेल्स टॅक्स इन्स्पेक्टर सुनिल मांढरे आणि आपल्या गावचे चंद्रकांत काळंगे सहभागी झाले होते.  ही शर्यत पार करत असताना सगळा जंगलातील रस्ता, बऱ्याच ठिकाणी चढण्या-उतरण्यासाठी दोर बांधलेले,काही ठिकाणी रेलिंग तर काही ठिकाणी शिढ्या होत्या. काही ठिकाणी बसूनच उतरावे लागत होते. शर्यतीचा शेवटचा टप्पा खूपच अवघड होता. माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच एका दिवसात तीन किल्ल्यावर जाण्याचा योग आला. मार्गावर रुट सपोर्ट छान होता.





               या ५३ किलोमीटर शर्यतीमध्ये निसर्गाचा अनोखा नजराणा पाहायला मिळाला आहे. यामध्ये प्रामुख्याने भातशेतीचा खोडवा,त्याची बुचाडे, भाजीपाला, सह्याद्रीची  पर्वतरांग, नद्या,धरणे, जंगली फळे, फुले, विविध प्राणी, सह्याद्रीचा पश्चिम घाट, जागतिक वारसा स्थळ म्हणून येथील जैव विविधता पाहण्याची संधी मिळाली.

  थोडंस गडाविषयी.....

सिंहगड : सिंहगडाचे मूळ गाव कोंढाणा होते. शिवाजी महाराजांचे विश्वासू सहकारी सरदार तानाजी मालुसरे आणि त्यांच्या मावळ्यांनी हा किल्ला जिंकला परंतु या लढाईत तानाजींना वीर मरण आले. प्राणांचे बलिदान देऊन हा किल्ला जिंकल्यामुळे शिवाजी महाराजांनी " गड आला पण सिंह गेला" हे वाक्य उच्चारले,त्यानंतर सिंहगड हे नाव रुढ झाले.

 राजगड :या किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या मराठी साम्राज्याची पहिली राजधानी होती. शिवाजी महाराजांचे धाकटे चिरंजीव राजाराम महाराज यांचा जन्म या गडावर झाला तसेच महाराणी सईबाईंचे निधनही येथेच झाले आहे. बुलंद, बळकट राजगड आजही हिंदवी स्वराज्याची ग्वाही देत आहे.

तोरणा : छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेच्या सुरुवातीच्या काळात जे किल्ले घेतले त्यामधील एक म्हणजे तोरणा किल्ला. या किल्ल्याला स्वराज्याचा शिलेदार म्हणून ओळखले जाते कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या सोबत्या सोबत आणि मावळ्या सोबत रायरेश्वर मंदिरामध्ये स्वराज्याची स्थापना करण्याची शपथ घेतल्यानंतर त्यांनी पहिल्यांदा तोरणा हा किल्ला जिंकला आणि स्वराज्याचे तोरण बांधले.

              या शर्यतीच्या निमित्ताने एवढेच  सांगावेसे वाटते की,आपणही व्यायामाचा सराव करावा, अशा शर्यतीत भाग घ्यावा, स्वतःला तंदुरुस्त ठेवावे.चला तर आपण सर्वजण व्यायामाची कास धरुया,स्वतःला निरोगी ठेवूया.

            राजेंद्र पवार

     ९८५०७८११७८

!!ग्रीन पुणे मान्सून हिल मॅरेथॉन२०२५ !!

 !!ग्रीन पुणे मान्सून हिल मॅरेथॉन२०२५ !!              आज रविवार दिनांक १३ जुलै २०२५ रोजी पुणे येथे" ग्रीन पुणे मान्सून हील मॅरेथॉनचे ...