!!ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे जन्मदिन !! (१५ जून )
किसन बाबूराव हजारे ऊर्फ अण्णा हजारे जन्म: १५ जून १९३७:भिंगार, अहमदनगर जिल्हा, महाराष्ट्र मूळचे सैन्यात वाहनचालक असणारे किसन बाबुराव तथा आण्णा हजारे हे भारतातील एक ज्येष्ठ समाजसेवक आहेत. १९९० साली त्यांना त्यांच्या समाजसेवेच्या कार्याबद्दल भारत सरकारने पद्मश्री आणि १९९२ साली पद्मभूषण या पुरस्कारांनी सन्मानित केले. त्यांनी ग्रामस्थांच्या सहकार चळवळीद्वारे राळेगण सिद्धी या गावाचा कायापालट घडवून आणला आहे. स्वच्छता, पाणी व्यवस्थापन व सामाजिक सलोखा यावर त्यांनी भर दिला होता. या कामाबद्दल गावाला अनेक पारितोषिके मिळाली आहेत, त्यांनी त्यांच्या अनुभवाची नोंद "माझे गाव माझे तीर्थ" या आत्मचरित्रपर पुस्तकात केलेली आहे. आण्णा हजारे यांनी माहितीच्या अधिकारासाठी आंदोलन केले. माहितीच्या अधिकारावर त्यांनी पुस्तकाचे लेखनही केले आहे. या आंदोलनामुळे सरकारला २००५ साली सर्वसामान्यांना माहितीचा अधिकार देण्याचा कायदा संमत करावा लागला. आण्णा हजारे यांनी वेळोवेळी भ्रष्टाचाराविरुद्ध आंदोलने करून जनजागृतीची कामे केली आहेत. त्यांच्या आंदोलनांमुळे ६ कॅबिनेट मंत्र्यांना राजीनामे द्यावे लागले आहेत.
प्रसिद्ध कामे:
आंदोलनामुळे झालेले कायदे माहितीचा अधिकार, जनलोकपाल आंदोलन, लोकपाल, लोकायुक्त, दफ्तर दिरंगाई, ग्रामसभेला ज्यादा अधिकार कायदा नागरिकांच्या सनदी, ग्रामरक्षक दल कायदा ,भ्रष्टाचाराविरूद्ध जनजागृती,
पुरस्कार:
पद्मश्री वृक्षमित्र पुरस्कार १९९१ वनविभाग भ्रष्टाचार विरुद्ध सरकारला परत केले आहेत, पद्मभूषण, कृषिभूषण २००८
लष्करी सेवा:
इ.स. १९६२च्या सुमारास चीनने भारतावर आक्रमण केलेले असताना भारतीय सैन्याने धडाक्यात भरती सुरू केली होती. त्यावेळी २५ वर्षांचे असलेले हजारे लष्कराच्या किमान शारीरिक क्षमतेस पात्र नव्हते, पण कोणत्याही परिस्थितीत नवीन जवान भरती करणे आवश्यक असल्याने लष्कराने त्यांना भरती करून घेतले.औरंगाबाद येथे सुरुवातीचे प्रशिक्षण घेतल्यावर १९६३मध्ये त्यांना वाहनचालकाचे पद दिले गेले.
त्यानंतर दोन वर्षातच पाकिस्तानने भारतावर चाल केली. त्यावेळी हजारेंचा मुक्काम पंजाबमधील खेमकरण क्षेत्रात होता. १२नोव्हेंबर १९६५ रोजी पाकिस्तानी वायुसेनेने भारतीय ठाण्यांवर हल्ले सुरू केले. हजारे त्यावेळी इतर वाहनांसह आपले वाहन चालवीत होते. या हल्ल्यात त्या तांड्यातील ते स्वतः सोडून एकूणएक जवान शहीद झाले. हे पाहून विषण्ण झालेल्या हजारेंनी जगण्यातील अर्थ शोधण्यास सुरुवात केली. आपल्या प्रवासात नवी दिल्ली रेल्वे स्थानकावरील एका दुकानात त्यांच्या हाती राष्ट्रनिर्मितीसाठी युवा पिढीला आवाहन हे स्वामी विवेकानंद यांनी लिहिलेले पुस्तक पडले.हे वाचताना त्यांना वाटले की अनेक संतांनी इतरांच्या सुखासाठी आपल्या सर्वस्वाचा त्याग केलेला आहे. आपण आपले उरलेले आयुष्य गरीबांची दुःखे दूर करण्यात घालवावे असे त्यांना वाटू लागले. यानंतर फावल्या वेळात त्यांनी महात्मा गांधी, स्वामी विवेकानंद आणि विनोबा भावे यांचे साहित्य वाचण्यास सुरुवात केली. यानंतर काही वर्षांनी १९७० च्या दशकात त्यांची मृत्यूशी पुन्हा एकदा जवळून गाठ पडली. वाहन चालवीत असताना भीषण अपघातातून ते बचावले. या क्षणी त्यांना वाटले की आपल्या उरलेल्या आयुष्याचा सदुपयोग करण्यासाठी जणू काही दैवच त्यांना इशारे देत आहे. वयाच्या ३८ व्या वर्षी किसन हजारेंनी आपले उरलेले आयुष्य इतरांच्या सेवेसाठी वेचण्याचा संकल्प सोडला. १९७५ मध्ये त्यांनी भारतीय लष्कराचा राजीनामा दिला.
लष्कर सोडल्यावर हजारे राळेगण सिद्धी या आपल्या मूळ गावी परतले हे गाव अहमदनगर जिल्ह्याच्या पारनेर तालुक्यात आहे. जवळजवळ कायमच्या दुष्काळी प्रदेशात असलेल्या या दुर्लक्षित गावात त्यावेळी गरिबी आणि निराशेचा सुकाळ होता. हजारेंनी ग्रामस्थांसह अनेक दशके अथक प्रयत्न करून गावाचा कायापालट केला. आर्थिक आणि सामाजिक अशा दोन्ही आघाड्यांवर त्यांनी गावातील परिस्थिती सुधारली. तंत्रज्ञान किंवा औद्योगिकीकरणाचा आधार न घेता केवळ अतोनात कष्ट आणि सहकार यांवर त्यानी गावातील गरिबी दूर करण्यात यश मिळवले.
दारुबंदी:
सैन्यातील नोकरी सोडल्यावर अण्णांनी गावातील युवकांना संघटित केले व तरुण मंडळाची स्थापना केली. यादवबाबा मंदिरात सर्वांना दारू न पिण्याची शपथ देण्यात आली. मद्यपींना मंदिराच्या खांबाला बांधून तरुणांनी फटकेही मारले व त्याचाच परिणाम म्हणून व्यसनाधीन राळेगण व्यसनमुक्त झाले.
मीही राळेगणसिद्धी गावाला दोन वेळा भेट दिली आहे, त्यांचे कार्य जवळून पाहिले आहे. नुकतेच आपल्या गावचे ज्येष्ठ नागरिक तुकारामशेठ काकडे व त्यांच्या कुटुंबियातील सर्व सदस्यांनी आण्णा हजारेंची भेट घेतली त्यांना स्वतःचे " मिसळीची भाकर " हे पुस्तक भेट दिले. ग्रामविकासाबाबत सुनिल काकडे, ऍड. रुपाली काकडे यांच्याबरोबर बरीच चर्चा झाली ही आपल्या गावाच्या दृष्टीने भूषणावह बाब आहे. चर्चेत मनुष्य जन्म आपणास एकदाच भेटतो. या जन्मात आपण इतरांच्या कल्याणासाठी काहीतरी काम करायला हवे हा संदेशच त्यांनी काकडे कुटुंबियांना दिला. अण्णा हजारे यांच्यामुळे आपणास माहितीचा अधिकार मिळाला ही देश विकासाच्या दृष्टीने खूप मोठी बाब आहे. अण्णा हजारेंना जन्मदिनाच्या निमित्ताने विनम्र अभिवादन.
संकलक : राजेंद्र पवार
९८५०७८११७८