!! वारी पंढरीची २०२२ !! (दिवस बारावा २ जुलै ) ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचा फलटणला दोन दिवस मुक्काम असल्याने आम्हालाही थोडी विश्रांती मिळाली. दोन दिवस विश्रांती असेल तर कपडे धुणे, वैद्यकीय मदत उपलब्ध करुन घेणे या बाबी सहज शक्य होतात. आज फलटण नगरीत स्नेही मंडळींच्या गाठीभेटी घेण्यात वेळ गेला. दिपक मुळे यांच्या घरी तर जणू काही संगीताची मैफलच रंगली. शिक्षणामुळे आपल्या ज्ञानात भर पडते हे खरे आहेच. पण अशिक्षित महिला देखील नुसतं ऐकून काही गीते, अभंग, गौळणी पाठ करत असतात. ऐकून म्हणत असल्याने एखादी चूकही होऊ शकते परंतु त्या मागचा भाव जास्त महत्वाचा आहे असे मला वाटते.सकाळी अशीच एक जालना जिल्ह्यातील धनसंगी येथील सुशिला कुडधनी ही महिला भेटली त्यांच्याकडून समाज प्रबोधनात्मक गौळण ऐकली ती आपल्या माहितीसाठी....
लहान हो, लहान हो हरी,
वेळ नाही बरी माझे भ्रतार घरी !!धृ !!
सासू माझी निघाली बघा मथुरा बाजारी,
सासरा माझा दारामध्ये राखण करी!!१!!
ननंद माझी आहे बघा माझ्या शेजारी,
चाडया चुगल्या करुन माझा संसार मोडी !!२ !!
एका जनार्दनीं, हरी लहान होईन,
सासू सासऱ्याचा जाच सहन होईना !!३!!
या गीतामधून सामाजिक स्थितीचे विदारक चित्र मांडले आहे. आपण सावध रहावे अशीच यापाठीमागची भावना आहे.
सातारा जिल्ह्यातील फलटण हे महत्वाचे शहर याचीही माहिती आपणाला होणे गरजेचे आहे असे वाटते. फलटण हे आपल्या देशातील एक पुरातन शहर आहे. महानुभाव पंथीयांची दक्षिणकाशी म्हणून फलटण ओळखले जाते. दरवर्षी चैत्र वद्य प्रतिपदेला फलटणला घोड्यांची जत्रा भरते. या जत्रेला पंजाब, बिहार, उत्तर भारतातून भाविक मोठ्या प्रमाणात सहभागी होतात. येथे एक प्रसिद्ध श्रीराम मंदिर आहे. ते फलटणचे ग्रामदैवत म्हणून ओळखले जाते. दर वर्षी नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात श्रीराम रथोत्सव साजरा केला जातो. यालाच रामयात्रा असे देखील म्हणतात .या यात्रेला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लोक येतात. फलटण येथील पुरातन हेमाडपंथी जबरेश्वर मंदिरही प्रसिद्ध आहे. ऐतिहासिक वारसा असलेला तालुका आहे.
फलटण हे हिंदुस्थानातील एक संस्थान होते. नाईक-निंबाळकर हे संस्थानचे राजे होते. आजही राजे मंडळींचा समाजावर सकारात्मक प्रभाव जाणवतो. छत्रपती संभाजीराजे यांच्या मातोश्री सईबाई यांचे हे माहेर होय.फलटण ही महानुभाव संप्रदायाचे चक्रपाणी महाराज यांची जन्मभूमी आहे. फलटण येथील राम मंदिर आणि मुधोजी मनमोहन राजवाडा ह्या अति प्राचीन वास्तू चांगल्या जतन केल्या आहेत. अशा या ऐतिहासिक शहराला आपण भेट द्यायला हवी असे वाटते.
फलटण नगरीत सर्वत्र टाळ, मृदंगाचा ध्वनी कानी पडत होता. विश्रांतीच्या या वेळेचा वारकरी सदुपयोग करत होते. अनेक ठिकाणी वारकरी कीर्तनाचा आनंद लुटत असताना दिसून आले.
पालखी सोहळा आनंदमयी व्हावा यासाठी प्रशासन देखील खूप काळजी घेते. वारीच्या मार्गावर पाणी पिऊन प्लॅस्टिकच्या बाटल्या, खाद्यपदार्थांची पाकिटे ,शिल्लक राहिलेले अन्न पडलेले असते. वारकरी पुढे गेल्यानंतर त्या परिसरात रोगराई पसरण्याची भिती असते. ही वारी निर्मल व्हावी यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, शिवाजी विद्यापीठाचे राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी सर्व कचरा गोळा करण्याचे काम करतात. त्याची विल्हेवाट लावतात. आज फलटणमध्ये राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी दाखल झाले आहेत.आमचे स्नेही आणि वाईच्या ज्ञानदीप इंग्लिश मिडीयम स्कूलचे चेअरमन दिलीप चव्हाण ,जुन्नरचे रंगनाथ हांडे यांच्यासमवेत एका एन. एस. एस. तुकडीला भेट देण्याचा योग आला. या तुकडीमध्ये किसन वीर महाविद्यालय,वाई,सरदार बाबासाहेब माने महाविद्यालय,रहिमतपूर आणि विवेकानंद महाविद्यालय, कोल्हापूरचे विद्यार्थी सहभागी झाले होते. हे विद्यार्थी पालखी पुढे गेल्यानंतर सर्व परिसर स्वच्छ करण्याचे काम करणार आहेत.
लोणंदपासून प्रत्यक्ष काम केलेले सुध्दा आहे. हे विद्यार्थी खूप मोठे करत आहे असे वाटते.स्वच्छता हेच परमेश्वराचे दुसरे नाव आहे असे म्हटले जाते. आपणही अशा सार्वजनिक स्वच्छता मोहिमेत सहभागी व्हावे, आपला परिसर स्वच्छ करुन कोणतेही साथीचे आजार पसरणार नाहीत याची काळजी घ्यावी असे मनोमन वाटते.
राजेंद्र पवार
९८५०७८११७८