#narmada लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
#narmada लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

मंगळवार, २२ मार्च, २०२२

!! आमची नर्मदा परिक्रमा !! (११६ ) २२ मार्च

 !! आमची नर्मदा परिक्रमा !! (११६ ) २२ मार्च 

                  आम्ही दिनांक २१ मार्च रोजी पायी परिक्रमा पूर्ण केली ही परिक्रमा सर्वांच्या शुभेच्छामुळेच पूर्ण झाली असे मनोमन वाटते. कालच संकल्पपूर्तीची पूजाही झाली. आज सकाळी ओंकारेश्वर येथे दर्शन घेऊन चार महिन्यापूर्वी पूजनासाठी घेतलेले जल त्याचा जोतिर्लिंगाला जलाभिषेक केला. परिक्रमा पूर्ण केल्यानंतर मांधाता परिक्रमा करण्याचा प्रघात आहे तोही सोपस्कार पार पाडला, इतकेच नव्हेतर कन्यापूजनही केले.

                आपल्या भारतभूमीचा विचार करता जरी सर्व नद्या पवित्र असल्यातरी फक्त नर्मदेचीच परिक्रमा केली जाते. देशातील अनेक साधूंनी, महंतांनी नर्मदाकाठी तपचर्या केली आहे. महाराष्ट्रापुरता विचार केला तरी शिर्डीचे साईबाबा, शेगावचे गजानन महाराज, अक्कलकोटचे स्वामी समर्थ, ब्रम्हचैतन्य महाराज गोंदवलेकर, टेम्बे स्वामी महाराज यासारख्या अनेक साधूंनी नर्मदाकाठी तपचर्या केली आहे. आजही काही साधू तपचर्या  करत आहेत. साधूंच्या चरणस्पर्शाने पावन झालेल्या भूमीतून गेल्यानंतर आपलंही जीवन उजळून निघावे, अंगी असणारे दोष कमी व्हावेत हाच परिक्रमा करण्याचा प्रधान हेतू असतो, तोच हेतू आमचा होता. ही परिक्रमा जीवन जगण्याची आदर्श पाठशाळा आहे असे वाटते.




 

                या परिक्रमेत अनेक गोष्टींची कसोटी लागते. पंढरपूरची पायी वारी करणे वेगळे आणि परिक्रमा करणे वेगळं. वारीत सर्व काही निश्चित असते. कोठे मुक्काम, कोठे विसावा हे सर्व ठरलेले असते. वारी व्यवस्थित पार पडावी यासाठी प्रशासनदेखील सज्ज असते. परिक्रमेत मात्र सगळंच अनिश्चित, कोठे भोजन, कोठे अल्पोपहार, कोठे विसावा हे ठरलेलं नसते. अनेक कटूगोड अनुभव येत असतात. येथे तुमच्या संयमाची, सहनशीलतेचीही कसोटी लागलेली असते. परिक्रमा पूर्ण केलेली व्यक्ती कोणत्याही प्रसंगाला सामोरे जाण्यासाठी सक्षम झालेली असते असं म्हटलंतरी वावगं ठरणार नाही. लिहिण्यासारखं खूप आहे परंतु आपण कोठेतरी थांबायला हवे.



  थोडंस माझ्यासाठी....

            आध्यात्माचा फारसा गंध नसलेला मी मात्र सत्संगामुळे बदलून गेलो.  माझ्या आध्यत्मिक बदलाचे सारे श्रेय एकंबेचे माझे स्नेही श्री गोरख चव्हाण यांना जाते. ते माझे आध्यात्मिक गुरु आहेत. या परिक्रमेतदेखील त्यांनी व त्यांच्या सौभाग्यवती इंदुमती चव्हाण यांनी अनेक गोष्टी माझ्याकडून करुन घेतल्या. श्रीयुत चव्हाणसाहेबांनी आबापुरीच्या डोंगरावरील देवासाठी भव्य मंडप उभारला आहे हे आपणास ज्ञात आहेच.

           या परिक्रमेत मला आलेले अनुभव, एखाद्या प्रसंगाविषयी मला काय वाटले ते आपणापर्यंत आणण्याचा प्रामाणिक प्रयत्न मी केला आहे. सगळ्याच गोष्टी सगळ्यांना पटतील असं मलाही वाटत नाही परंतु माझ्या परिक्रमेमुळे आपणात थोडासा जरी सकारात्मक बदल झाला तरी ही माझी परिक्रमा यशस्वी झाली असे मी म्हणेन.  आपलं असंच प्रेम  माझ्यावर राहू द्या.

   राजेंद्र पवार

   ९८५०७८११७८

!! आमची नर्मदा परिक्रमा !! (११५ ) २१ मार्च संकल्पपूर्ती - आज नर्मदा परिक्रमा पूर्ण झाली.

 !! आमची नर्मदा परिक्रमा !! (११५ ) २१ मार्च  संकल्पपूर्ती - आज नर्मदा परिक्रमा पूर्ण झाली.

               आमचा कालचा मुक्काम देवला रयत येथे होता. परिक्रमा आज पुर्ण करण्याचा आमचा मानस असल्याने आम्ही  पहाटे चार वाजता चालण्यास सुरुवात केली आणि नियोजनाप्रमाणे दुपारी ४.३० वाजता ओंकारेश्वर येथे पोहोचलो. आज उन्हाची कसलीच पर्वा केली नाही. कालपासून माझ्याही पायाने असहकार पुकारला होता. प्रचंड वेदना होत असतानाही आम्ही एकोणचाळीस किलोमीटर चाललो. सदाव्रताने आमची आजही पाठ सोडली नाही. दुपारी आंजरुद याठिकाणी या परिक्रमेतला शेवटचा सदाव्रताचा आनंद लुटला. आज वाटेत खुटला, डुडगाव, बखरगाव, करौला, गुंजली, खंगवाडा, अंजरुद, धावडिया, शिवकोठी ही महत्वाची गावे लागली. दुपारनंतर आम्ही ओंकारेश्वर येथे येत असताना उत्तरप्रदेशातील एक गाडी आमच्याजवळ  येऊन थांबली, त्या गाडीत एक साधू महाराज होते त्यांनी आम्हाला दक्षिणा दिली तर माझे स्नेही श्री गोरख चव्हाण यांच्या सौभाग्यवती सौ. इंदुमती चव्हाण यांना साडी भेट म्हणून दिली. जणू काही नर्मदा मैय्याचाच प्रसाद मिळाला असे आम्हास वाटले.तुमची प्रचंड इच्छाशक्ती असेल तर परमेश्वर तुम्हाला कोणत्याही रुपात भेटतो हे मात्र नक्की.





           आम्ही आजच संकल्पपूर्तीची पूजा केली. आपण बरेच संकल्प करतो पण त्याची पूर्ती होईलच असे नाही. आम्ही संकल्प केला, आपणा सर्वांच्या  शुभेच्छामुळे तो पूर्णही केला. आपणही असेच संकल्प करुया आणि ते तडीस जातील असा प्रयत्न करुया.

  राजेंद्र पवार 

९८५०७८११७८

रविवार, २० मार्च, २०२२

!! आमची नर्मदा परिक्रमा !! (११४ ) २० मार्च

  !! आमची नर्मदा परिक्रमा !! (११४ ) २० मार्च 

                 आमचा कालचा मुक्काम खंडवा जिल्ह्यातील मांडला या गावी असणाऱ्या हनुमान मंदिरात होता. हे गाव आध्यात्मिक वातावरणाने भारले आहे असेच वाटले. येथेही सदाव्रतच होते मात्र दोन एमपीमधील बंधूंनीच आमची सेवा केली. आजही आम्ही उन्हापासून आपले संरक्षण व्हावे यासाठी लवकरच चालण्यास सुरुवात केली. आम्ही लवकरच देवला गावी आलो. त्या गावात सकाळची प्रभातफेरी चालली होती. या राज्यात बहुतांशी गावात पहाटे  प्रभातफेरी असते. याबाबत मी पाठीमागे उल्लेख केला होता. त्याच गावातील श्रध्दा श्रीमाली यांनी आम्हास दूध बिस्किटे दिली. आज वाटेत मुंदी नावाचे शहर लागले. तुलनात्मक विचार करता हे शहर स्वच्छ वाटले. येथील माता मंदिरात आम्ही बालभोग (अल्पोपहार ) घेतला.    







                आज दुपारचा भोजन प्रसाद भमौरी गावातील उमाबाई गुजर, मुन्शीजी गुजर यांच्या घरी मिळाला. बऱ्याच दिवसांनी ज्वारीची भाकरी खायला मिळाली त्यामुळे आनंदच झाला. आज वाटेत सहेजला, देवला, माथनी, पालसुद, मुंदी, केनूद, भमौरी, जलवा ही गावे लागली. या भागात मोहाची झाडे भरपूर आहेत. मोहाच्या झाडाखाली सर्वत्र फुलांचा सडा पडला होता. ही फुले वेचण्याचे काम चालले होते. या फुलांपासून मद्य निर्मिती केली जाते. मद्य निर्मितीला परवानगी नसली तरी घरोघरी  निर्मितीचे काम चालत असल्याचे सांगितले. आज आमचा मुक्काम देवला रयत या गावी आहे. येथील सर्वच व्यवस्था एखाद्या हॉटेलला लाजवेल अशी आहे.

            आता आमची परिक्रमा अंतिम टप्प्यात आहे. आम्ही ओंकारेश्वरजवळ पोहोचलो आहोत. थोडेसे परिक्रमेबाबत  सांगितलेच पाहिजे. परिक्रमा करणे मनात येणे, प्रत्यक्ष कार्यवाहीला प्रारंभ होणे हा पूर्वपुण्याईचा भाग आहे असे वाटते. महाराष्ट्रातील बहुतेक जण ओंकारेश्वरपासून परिक्रमेस प्रारंभ करतात. परिक्रमा संकल्प आणि पूर्ती यामध्ये बरेच अडथळे आहेत. यामध्ये बऱ्याच वेळा आपण ग्रुपने निघतो. हा ग्रुप फार काळ टिकत नाही. कोणत्याही दोन व्यक्तींचे विचार एकसारखे असत नाहीत. काहीना काही अडचणीमुळे ग्रुप टिकत नाही हे वास्तव आहे. आपण पायी परिक्रमा करण्याचा कितीही निर्धार करावयाचा म्हटले तरी शरीर प्रकृती साथ देईल असे नाही. शारीरिक वेदनेतून कोणाचीही सुटका नाही. 

                   मी सहजच परिक्रमा पार करेन असे कोणी म्हणत असेल त्याचा अहंकार  लगेचच उतरतो. आम्ही ही परिक्रमा जास्तीत जास्त किनाऱ्याने केली आहे त्यामुळे आमचा वेळ वाढला आहे. परंतु किनाऱ्याचा आनंद लुटला आहे. प्रचंड इच्छाशक्ती,परमेश्वरावर श्रद्धाभाव, शारीरिक क्षमता या सर्वांची योग्य सांगड असेल तरच ही परिक्रमा पूर्ण होते. पायी  परिक्रमा पूर्ण करण्याचे प्रमाण सहा सात टक्क्यांपर्यंत आहे. जसा सी. ए. परीक्षेचा निकाल अत्यल्प लागतो तेच प्रमाण पायी परिक्रमा पूर्ण करणाऱ्यांचे आहे.

                 आपणास जीवनात यशस्वी व्हायचं असेल तर प्रचंड इच्छाशक्ती, कोणतेही अडथळे पार करायची तयारी असेल तर आणि तरच आपण यशस्वी होतो अन्यथा नाही. कोणत्याही क्षेत्रात उच्चपदी जायचे असेल तर कष्टाशिवाय  पर्याय नाही, आपली चिकाटी कमी होता कामा नये  हेच परिक्रमेतून आम्हाला शिकायला मिळाले.

 आपण प्रत्येकाने आपापल्या क्षेत्रात करिअर करण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावेत, तसे प्रयत्न आपण सर्वजण करुया.

      राजेंद्र पवार 

 ९८५०७८११७८

!! आमची नर्मदा परिक्रमा !! (११३ )१९ मार्च

 !! आमची नर्मदा परिक्रमा !! (११३ )१९ मार्च 

              आमचा कालचा मुक्काम खंडवा जिल्ह्यातील दगडखेडा येथे होता. उन्हाचे चालणे होत नसल्याने आणि पुढचा रस्ता चांगला असल्याने पहाटे ४ वाजताच चालण्यास सुरुवात केली. लवकर सुरुवात केली असल्यामुळे ३७ किलोमीटर अंतर सहज पार करु शकलो. आज मार्गात धारुखेडी, वरुड, गिट्टीबदान, सडीयापानी, छनेरा (नवीन हरसुद ), सत्तापूर, सेलदा ही  महत्वाची गावे लागली. आमचा आजचा मुक्काम मांडला गावात आहे. आम्ही आज दुपारी सत्तापूर  गावात मुकेश यादव यांच्या घरी भोजनप्रसाद घेतला. त्यांच्याकडे पाण्याची मुबलकता असल्याने कपडे धुणे, स्नानादी कार्यक्रमाचा आनंद लुटला. सकाळच्या सत्रात छनेरा नावाचे मोठे शहर लागले. हरसुद नावाचा हा तालुका आहे त्याची प्रशासकीय कार्यालये छनेरामध्ये असावीत. 

     






             दुपारनंतरचा बराचसा भाग वन विभागाच्या ताब्यात असलेला दिसला. वनीकरण विभागाची मोठी रोपवाटिका लागली. रस्त्याच्या दुतर्फा जंगलच होते. जंगलातच एक साधूची कुटी होती. साधू म्हटले की, अंगावर वस्त्र नाही हे मान्य आहेच परंतु त्यांच्या पायात घुंगराचा चाळ होता. कोणते साधू कसे राहतील हे काही सांगता येत नाही.

           या भागात होळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. होळीपासून रंगाची उधळण अनेक ठिकाणी केली होती. हा सण साजरा करण्यासाठी मात्र वाहने अडवून पैसे उकळण्याचे काम चालू होते. वाद्यांचा गजर करत रस्त्यावर नाचणेही चालू होते. विशेषतः यामध्ये महिलांचा सहभाग जास्त होता. एखाद्या ठिकाणी पैसे दिले तर प्रश्न सुटला असे नाही. पुढे एक किलोमीटरवर दुसरा ग्रुप तुम्हाला अडवण्यासाठी तयार आहेच. कोणताही सण उत्साहात साजरा करण्यास काहीच हरकत नाही, तो उत्स्फूर्तपणे साजरा केलाच पाहिजे परंतु लोकांना अडवून पैसे उकळणे हे काही योग्य वाटले नाही. आपल्याकडेही गणेशोत्सवाच्या वेळी हा अनुभव येतो. थोडक्यात सण, उत्सव साजरा करताना कोणावर सक्ती असू नये असे वाटते.

  राजेंद्र पवार 

 ९८५०७८११७८

शुक्रवार, १८ मार्च, २०२२

!! आमची नर्मदा परिक्रमा !!(११२ ) १८ मार्च २०२२

 !! आमची नर्मदा परिक्रमा !!(११२ ) १८ मार्च २०२२ 

         आमचा कालचा मुक्काम हरदा जिल्ह्यातील पाचातलाई येथील आश्रमात होता. आम्ही सकाळी लवकरच निघालो. सुरुवातीला रस्ता चुकायला नको म्हणून भजनलाल बिष्णोई यांचे चिरंजीव अनिकेत रस्ता दाखवण्यासाठी दोन किलोमीटरपर्यंत पुढे आले. अनिकेत बी एस्सी. ऍग्रिचे विद्यार्थी आहेत. आम्ही थोडे अंतर गेल्यानंतर पुन्हा जंगल रस्ता आला. जंगल पायवाटेने जाताना अनेकदा वाट चुकण्याची शक्यता जास्त असते मात्र आम्ही सुरक्षितपणे देवपूरपर्यंत आलो. देवपूर गावात महेश विश्वकर्मा यांच्या घरी होळी ही साजरी केली. उन्हाचा तडाखा जबरदस्त वाढला असल्याने नऊच्या पुढे चालणे अतिशय कठीण होत आहे. दुपारी तीन तास तरी सक्तीची विश्रांती घ्यावीच लागते.





  आज खिडकियाच्या मार्गावर चालत असताना शरद तापडिया यांची भेट झाली. त्यांनी होळीच्या शुभेच्छा तर  दिल्याच शिवाय भोजन प्रसादासाठी घरी येण्याचा आग्रह केला. आम्ही त्यांच्या घरी दुपारचा भोजन प्रसाद घेतला. शरद तापडिया यांची मधुरवाणी सर्वांनाच मोहित करणारी आहे. ते मारवाडी असल्याने व्यवसायात आहेत.  व्यवसायात मधुरवाणीच गरजेची असते त्या वाणीने आम्हीही मोहित झालो.आज वाटेत बाबर, देवपूर, नागावा, पाहनपाट, चौकडी, खिडकिया, पोखरणी ही महत्वाची गावे लागली. आज आमचा मुक्काम खंडवा जिल्ह्यातील दगडखेडा गावातील दुर्गामाता मंदिरात आहे. या मंदिरात मुक्कामासाठी नाशिक जिल्ह्यातील चांदवडची सावता माळी यात्रा कंपनीची बस आलेली आहे. त्यांनी आमच्या संध्याकाळच्या भोजनाची व्यवस्था केली आहे.




    शेतीच्या दृष्टीने विचार केला तर हा भाग जास्त प्रगत वाटतो. इकडे शेतीही दरडोई जास्त आहे. आर्थिक विषमता मात्र खूप जाणवते. एकीकडे श्रीमंत जमीनदारांचा वर्ग तर दुसरीकडे मजूरवर्ग दिसून येतो. सध्या गहू कापणीचे काम जोरात सुरु आहे. सर्वत्र मशीनच्या साह्यानेच कापणी होताना दिसून येते. रस्त्यांनी मशीनची येजा होताना दिसत आहे. वेगवेगळ्या क्षमतेच्या मशीन दिसून येतात. मशीनच्या पाठीमागे गहू नेण्यासाठी ट्रेलर उभाच असतो. या परिसरात चारशेपाचशे क्विंटलपर्यंत गहू, दोनतीनशे क्विंटलपर्यंत हरभरा होणारे शेतकरी भरपूर आहेत. याठिकाणी गहू वाळवणे हा प्रकार कोठेच दिसत नाही. मुबलक प्रमाणात पाण्याची उपलब्धता, जमिनीची सुपीकता, साठवण्याची चांगल्या सोयी याचा फायदा शेतकऱ्यांना होताना दिसत आहे. या परिसरात कृषी यांत्रिकीकरण  मोठ्या प्रमाणात झालेले आहे. कृषी अवजारे घेण्यासाठी मोठया प्रमाणात अनुदान उपलब्ध करुन दिले आहे. काही शेतकऱ्यांना १००% अनुदानावर ट्रेलर मिळाले आहेत.


      

        आपल्या परिसरात ऊस शेती भरपूर आहे. ऊसासाठी लहान मोठ्या क्षमतेच्या हार्वेस्टिंग मशीन अनुदानावर उपलब्ध झाल्या पाहिजेत. इतर शेतीसाठी लहान मोठ्या क्षमतेची अवजारे उपलब्ध झाली पाहिजेत. सध्या कृषी यांत्रिकीकरणासाठी अनुदान उपलब्ध आहे. या अनुदानाचा लाभ अधिकाधिक शेतकऱ्यांना व्हायला हवा असे वाटते.

     राजेंद्र पवार 

९८५०७८११७८

गुरुवार, १७ मार्च, २०२२

!! आमची नर्मदा परिक्रमा !! (१११ ) १७ मार्च २०२२

 !! आमची नर्मदा परिक्रमा !! (१११ )    १७ मार्च २०२२ 

          आमचा कालचा मुक्काम हरदा जिल्ह्यातील मनोहरपुरा येथे होता. काल एकदम कमी अंतर चालल्यामुळे आज सकाळी लवकर जायचे ठरवले.रस्ता विचारुन घेतला मार्गक्रमण सुरु झाले. प्रत्यक्ष रस्ताच सापडेना. "नर्मदे हर" चा गजर करुनही सकाळची वेळ असल्याने मार्ग दाखवण्यासाठी कोणीच उपलब्ध नव्हते. आम्ही दोन वेळा रस्ता भरकटलो. एक वेळ तर अशी आली की पुढील मार्ग काट्या लावून बंद केला होता. अडचणीच्या काळात आमच्याकडचा दंड अनेक भूमिका पार पाडतो, त्यांनी आम्हास रस्ता तयार करुन दिला. ओढे नाले पार करत भमोरी गाव गाठले त्याचवेळी आता आपली सुटका झाली असे आम्हाला वाटले. 





           रस्त्याबाबत मला असे म्हणावेसे वाटते. " Man proposes but Road disposes." कधी रस्ता चांगला असतो तर कधी परीक्षा घेणारा असतो असेच म्हणावे लागेल. आज वाटेत भमोरा, हंडीया, मांगरुल, रातातलाई, पचौला, कचबेडी, जामली ही महत्वाची गावे लागली. आज पाचातलाई येथे भजनलाल विश्नोई यांच्या घरी थांबलो आहोत. ते आपल्या घरीच मा नर्मदा रेवा आश्रमदेखील चालवतात. भजनलाल विश्नोई हे सध्या नर्मदा परिक्रमेत आहेत. परिक्रमेत त्यांची आमची अनेक वेळा भेट झाली. स्नेह जुळून आला त्याचा परिणाम म्हणून

        आम्ही जाणीवपूर्वक त्यांच्या आश्रमात मुक्कामासाठी आलो आहोत. त्यांचे चिरंजीव अनिकेत यांनी आमचे स्वागत केले. परिक्रमेत नेहमीच संमिश्र अनुभव येतात. कटू गोड अनुभव घेऊनच वाटचाल करावयाची असते. लोक आदरातिथ्यही करतात त्याचबरोबर कसलीच विचारपूसदेखील करत नाहीत. आज पचौला गावात सौ.गीताबाई धनगर व काशीप्रसाद धनगर यांनी दुपारचे भोजन दिले तर कचबेडी येथील विश्वकर्मा यांनी कडक उन्हात लिंबू सरबत देऊन थंड केले. 

          जामली गावात आम्ही थांबावे यासाठी प्रभूदयाल पवार यांनी खूपच आग्रह केला होता परंतु पूर्व नियोजनामुळे आम्ही थांबलो नाही. येथील शेती खूपच प्रगत आहे. सध्या गहू कापनीचे तसेच हरभरा काढणीचे काम जोरात चालू आहे. गहू, हरभरा पिकाबाबत नंतर स्वतंत्रपणे माहिती सांगेन. आज एका ठिकाणी मिरचीचा मोठा प्लॉट पाहण्यात आला. थोडक्यात कॅश क्रॉपवरदेखील चांगलाच जोर  दिसत आहे.

     आज दुपारी १२.३० वाजता आलेला अनुभव तुम्हाला सांगितलाच पाहिजे. रातातलाई आणि पचौला गावाच्या दरम्यान जंगलात हनुमान टेकडीवर एक आश्रम आहे. तेथे भोजन प्रसाद मिळेल या आशेने आम्ही गेलो होतो. तेथील महाराज निवांत कॉटवर लोळत पडले होते. त्यांनी उठण्याचा त्रासही घेतला नाही. आसन कोठे लावावे असे विचारले असता, शेजारीच गाय बांधली होती ती जागा निर्देशित केली. आमची कसलीच विचारपूस केली नाही. भोजनाबाबत तर विचारले नाहीच,अशा वेळी राग येणे साहजिक आहे परंतु परिक्रमेने आम्हास चांगलाच संयम शिकविला आहे जे वाट्याला येईल ते निमूटपणे सहन करायचे.

     आपल्या जीवनात सर्वच गोष्टी आपल्या मनासारख्या होत नाहीत.एखादी गोष्ट मनासारखी झाली नाही की आपला संयम सुटतो. सुटलेल्या संयमामुळे  प्रतिकूल परिणाम आपणावर होतो. आपलेच नुकसान होते म्हणून आपला संयम कधीच सुटू नये याची काळजी आपण घेतली पाहिजे असे मला वाटते.

   राजेंद्र पवार

   ९८५०७८११७८

बुधवार, १६ मार्च, २०२२

!! आमची नर्मदा परिक्रमा !! (११०) १६ मार्च

 !! आमची नर्मदा परिक्रमा !! (११०) १६ मार्च 

                आमचा कालचा मुक्काम गोंदागाव येथील आश्रमात होता. हा आश्रम खूपच जुना आहे. काल आम्ही ४२ किलोमीटर चाललो होतो. उष्णतेचा त्रास होऊ नये यासाठी परिक्रमा लवकर पूर्ण करण्याचा आमचा मानस होता. कालचे तपमाण ही ४० डिग्रीच्या जवळपास होते. आम्हाला हिट स्ट्रोक झाला असेच म्हणावे लागेल. आम्ही संवेदनशील असल्याने प्रतिकूल परिणाम शरीरावर लगेच जाणवला. आमचे दोन स्नेही श्री. गोरख चव्हाण व सौ. इंदुमती चव्हाण या दोघांनाही  शारीरिक त्रास झाला. जवळच छिपानेर नावाचे गाव होते. तेथे डॉ. लखनसिंह राजपूत यांच्या दवाखान्यात उपचारासाठी आम्ही गेलो. तेथे  नुसता उपचार  घेतला नाही तर त्यांच्याकडेच अल्पोपहारही  घेतला. शारीरिक त्रासामुळे बॅग घेऊन चालणे अवघडच होते, आमची अडचण डॉक्टरांच्या लक्षात आली. त्यांनी स्वतः आमची बॅग पुढे पाच किलोमीटरवर असणाऱ्या लछोरा आश्रमात पोहचवली. या डॉक्टरांनी एक परिक्रमा केलेली होती त्यामुळेच  त्यांच्या शब्दांशब्दात सेवाभाव जाणवत होता.





                आज वाटेत छिपानेर, लछोरा, समसाबाद, जलोदा, गोयत, सुरजना ही महत्त्वाची गावे लागली. आज आमचा मुक्काम मनोहरपुरा येथील नर्मदा मंदिरात आहे. आज दुपारचा भोजन प्रसाद हरदा जिल्ह्यातील लछोरा येथील मा रेवा कुटी आश्रमात घेतला. हा आश्रम पुण्यातील सौ. प्रतिभा चितळे चालवतात. प्रतिभाताईंनी पायी परिक्रमा केली आहे. परिक्रमा केल्यानंतर परिक्रमावासीयांच्या मनात सेवाभाव जागृत होतो. तो सेवाभाव त्यांच्या मनात जागृत झाला. त्यांनी तो प्रत्यक्ष  अंमलात आणला. आपला स्वतःचा आश्रम सुरु करण्यापूर्वी त्यांनी एकदोन ठिकाणी सेवा दिली होती. महत्वाचे म्हणजे परिक्रमेबाबत यु ट्यूबच्या माध्यमातून त्या हजारो लोकांपर्यंत  पोहोचल्या आहेत. 

               सौ. प्रतिभाताईंच्याकडे मुळातच अलौकिक  "प्रतिभा " आहे. आज खऱ्याअर्थाने ताईंच्याबरोबर सत्संग झाला. या आश्रमात सेवा देण्यासाठी त्यांच्या कुटुंबातील सदस्याशिवाय त्यांच्या कामावर श्रध्दा असणारी काही मंडळी उपस्थित होती. त्यांच्या नातीने आण्विने आमचे विशेष लक्ष वेधून घेतले. अगदी सहा-सात वर्षांची मुलगी नर्मदा मातेचे गीत "मैय्या अमरकंटकवाली, तु है भोली भाली" हे गीत तर म्हटलेच, शिवाय " हनुमान चालीसा" हेही म्हणून दाखवले. हा सगळा सत्संगाचा परिणाम आहे असे वाटते.

             सत्संगामुळे माणसे घडतात, अगदी वाल्याचा वाल्मिकी होतो हे आपणास विदित आहेच. सौ. प्रतिभाताई चितळे यांचा सत्संग संपूर्ण महाराष्ट्राला लाभला असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. यावर्षी महाराष्ट्रातील परिक्रमावासी जास्त आहेत त्यांचे बरेचसे श्रेय ताईंनाच जाते.

           प्रत्येक कुटुंबाला अध्यात्माची बैठक असेल तर ते कुटूंब प्रगतीपथावर जाते. आपली मुले सर्वार्थाने पुढे जायची असतील तर ती कुणाच्या संगतीत वाढतात हे पाहणे महत्वाचे आहे. आपल्या मुलांना नेहमी " सत्संग " लाभेल याची काळजी घेऊया. महाराष्ट्राला पुढे न्यायचे असेल सौ. प्रतिभाताई चितळे सारख्या अनेक प्रतिभाताई तयार झाल्या पाहिजेत असे मला वाटते.

    राजेंद्र पवार

  ९८५०७८११७८

मंगळवार, १५ मार्च, २०२२

!! आमची नर्मदा परिक्रमा !! (१०९)१५ मार्च

 !! आमची नर्मदा परिक्रमा !! (१०९)१५ मार्च 

              आमचा कालचा मुक्काम गजानन आश्रम, आवली घाट येथे होता. येथील आश्रमातील सर्वच सेवेकरी अतिशय सेवाभावी वृत्तीचे दिसून आले. काल एकादशी होती, आज आमचा उपवास सोडण्यासाठी सकाळी सहा वाजताच स्वयंपाक तयार केला. इतकेच नव्हे तर आम्हाला सकाळी रस्ता दाखवण्यासाठी एक किलोमीटर अंतरावर चौघेजण आले. या सर्वांवर कळस म्हणजे त्यांनी आमच्या बॅगा ४२ किलोमीटर अंतरावर असणाऱ्या आश्रमात पोहोच केल्या. संध्याकाळच्या भोजनाचीही व्यवस्था केली. भोजन प्रसाद घेऊन येणाऱ्या गाडीत स्वतः उमानाथ महाराज आले होते. त्यांच्याबरोबर ब्रजमोहन, ललित मालवीय, राजू पालिवाल, सुनिल मालवीय आदी आले होते. सेवा कशी करावी याचा वस्तूपाठच त्यांनी आज आम्हास दिला. आज दुपारचा भोजन प्रसाद चांदगढ कुटी येथील परमहंस अद्वेत आश्रम येथे घेतला. येथील आश्रमस्थळी शिव मंदिराबरोबर गजाननाचे मंदिर आहे. आश्रम परिसर अतिशय भव्य आहे.  





               आज मार्गात ग्वाडी, घोघरा, पेथोडा, बाबरी, चांदगढकुटी, भिलाडीया, कुंडाकला, हमीदपूर, अर्चनागाव आदी गावे लागली. आज आमचा मुक्काम गोदागाव येथील  गंगेसरी मठात आहे. गोमती, गंजाली व नर्मदेचा येथे त्रिवेणी संगम आहे. येथील मठ सहाशे वर्षापूर्वीचा  जुना आहे. या मठाची रचना ऐतिहासिक आहे.

              या परिक्रमेत "नर्मदे हर " हा अभिवादनाचा परवलीचा शब्द आहे. परिक्रमावासीयांना  खूपच आदराने वागवले जाते. लहानापासून थोरापर्यंत प्रत्येकजण " नर्मदे हर " असे म्हणतात. काहीजण महात्मा म्हणतात, गुरुजी म्हणतात, महंत म्हणतात, बाबाजी म्हणतात, प्रभू म्हणतात. थोडक्यात सर्वजण आदर देतात. आपणही एकमेकाला आदराने बोलवले पाहिजे. आदर दिला पाहिजे. वारकरी संप्रदायात "राम कृष्ण हरी" हाही असाच परवलीचा शब्द आहे. राम कृष्ण हरी उच्चारात देखील बरेच सामर्थ्य आहे. आपण बोलताना नमस्कार, जयहिंद, नमस्ते हेही अभिवादनाचे प्रकार वापरतो हेही चांगले आहेच. आपण "राम कृष्ण हरी " या अभिवादनाचा अधिकाधिक वापर करुया. आपण संभाषण करताना नेहमीच एकमेकास आदराने  वागवले पाहिजे. लहानपणीच अभिवादन करण्याची पध्दती अंगिकारली तर भविष्यात निश्चितच कमी अडचणी येणार यात शंका नाही.

           चला तर आपण लोकांना आदर देऊया. इंग्रजीत "Give respect, Take respect" असे म्हटले जाते. आपणास इतरांनी आदराने वागवावेसे वाटेत असेल तर आपणही इतरांनाआदर द्यायला शिकले पाहिजे असे वाटते.

    राजेंद्र पवार

 ९८५०७८११७८

रविवार, १३ मार्च, २०२२

!! आमची नर्मदा परिक्रमा !!(१०६ ) १२ मार्च

 !! आमची नर्मदा परिक्रमा !!(१०६ ) १२ मार्च 

       आमचा कालचा मुक्काम परमहंस आश्रम सांगाखेडा येथे होता.आजचा बराचसा रस्ता चांगला असल्याने चालताना कोणताही त्रास जाणवला नाही.आज वाटेत मारा, सर्रा, बछवाडा, नशिराबाद, गणेरा, नगवाडा, बागलखेडी, बिकोरा, घानसी ही महत्वाची गावे लागली.

       आमचा आजचा मुक्काम हौशंगाबाद जिल्ह्यातील सुरज कुंड येथे आहे. पश्चिम वाहिनी असणारी नर्मदा मैय्या  येथे पूर्णपणे उत्तरवाहिनी झालेली आहे.या ठिकाणचे दृश्य खूपच विलोभनीय आहे. याठिकाणी भारतीय पुरातत्व खात्याला राक्षसांच्या अस्थी सापडल्याचे सांगितले गेले. हे कुंड मध्यप्रदेश सरकारने पर्यटन स्थळ म्हणून विकसित केले आहे.







      आज नगवाडा नावाच्या गावात राजू मीना यांनी ताक प्यायला दिले. उन्हात ताक प्यायला मिळणे ही आम्हाला मेजवानीच वाटते. आज दुपारचा भोजन प्रसाद घेण्यासाठी बिकौर गावातील ग्रामपंचायत कार्यालयात थांबलो होतो. आपण येथेच थांबा, मी जेवण घेऊन येतो असे सांगून मुकेश नावाचा माणूस गेला तो काही परत आमच्या भेटीस आलाच नाही. आम्ही वाट पाहून शेजारीच असणाऱ्या प्राथमिक शाळेतून माध्यान्ह भोजन आहारातील भोजन मागून घेतले आणि आमची गरज भागवली, असे वेगवेगळे अनुभव  परिक्रमेत येत असतात. आज बरेचसे चालणे बर्गी डाव्या कॅनॉलने झाले. कॅनॉलला नियमित पाणी येत असावे असे स्पष्टपणे दिसून येते. बऱ्याच ठिकाणी पाटातील पाणी घेण्यासाठी कायमच्या पाईप टाकलेल्या दिसल्या.  पाण्याचे योग्य वितरण होण्यासाठी हे काही योग्य वाटले नाही. थोडक्यात येथे पाण्याचे योग्य वितरण होत नसावे त्याचा परिणाम म्हणून लोकांनी विंधन विहिरी घेतलेल्या आहेत. 

      प्रत्येक शासकीय योजना अगदी सामान्यातील सामान्य माणसाचा आर्थिक स्तर उंचावण्यासाठी असते. सर्व योजना चांगल्याच असतात पण त्याची अंमलबजावणी योग्य होत नसेल तर त्याचा लाभ सामान्यांना होत नाही.  सामान्य जनतेला शासकीय योजनेचा लाभ  कसा होईल यासाठी आपण प्रयत्नशील असायला हवे असे मला वाटते.

     राजेंद्र पवार 

   ९८५०७८११७८

 

!! आमची नर्मदा परिक्रमा !!(१०५ )११ मार्च

!! आमची नर्मदा परिक्रमा !!(१०५ )११ मार्च 

               आमचा कालचा मुक्काम रामघाट माछा येथे होता. येथील आश्रमाचा परिसर भव्य आहे. या गावात सौ.मंजू व संतोषकुमार राय हे परिक्रमावासीयांना भोजन सुविधा उपलब्ध करुन देतात. त्यांचा सेवाभाव खूप काही शिकवून जातो. या परिसरातील लोक बोलत असलेली भाषा आपणास समजून येत नाही. ज्यांचे थोडेफार शिक्षण झाले आहे तेच काय म्हणत आहेत ते समजू शकते.आज नदीच्या कडेकडेने चाललो होतो.नदीत संगमावर स्नानाचा आनंद लुटला.आता या जिल्ह्यात फारसा चढ उतार नसलेली जमीन दिसून येते. यामुळे शेतीस पाणी देण्याची पध्दती आपल्यासारखीच आहे. नजर जाईल तिथपर्यंत तुम्ही गव्हाशिवाय काही पाहू शकत नाही. 





            लोकांचे राहणीमानदेखील सुधारलेले दिसून येत आहे. वाटेत लहानापासून मोठ्यापर्यंत "नर्मदे हर " म्हणून आदरातिथ्य करत होते. चहापान घेऊन जा असा आग्रह अनेकजण करत होते. आम्ही रामनगर येथे हरीओम पटेल यांच्याघरी ताकाचा आस्वाद घेतला.आज वाटेत अजेरा,भानपुर,गलचा, साकला, ईशरपूर, पामली, रामनगर आदी गावे लागली.आज आमचा मुक्काम सांगाखेडा येथील परमहंस आश्रमात आहे.हा आश्रम अगदी किनाऱ्यावर आहे.

         शेतीच्या दृष्टीने विचार केला तर नर्मदेच्या पाण्याने हा भाग समृध्द झालेला आहे. सर्वत्र गव्हाचे पीक डोलताना दिसत होते. सलग पीक पध्दतीचे अनेक फायदे आहेत. विशेषतः कीड नियंत्रण, सिंचन सुविधा, हार्वेस्टिंग, विक्री व्यवस्थापन, वेअर हाऊस सुविधा या सर्वांचाच फायदा होतो.

     आपणही आपल्या परिसरात जेवढे शक्य होईल तेवढ्या सलग पीक पध्दतीचा अवलंब करायला हवा असे मला वाटते.

    राजेंद्र पवार

   ९८५०७८११७८


 #narmada #narmadamai #narmadariver #narmadaparikrama #shivaputri #shiv #satarakar 

!!ग्रीन पुणे मान्सून हिल मॅरेथॉन२०२५ !!

 !!ग्रीन पुणे मान्सून हिल मॅरेथॉन२०२५ !!              आज रविवार दिनांक १३ जुलै २०२५ रोजी पुणे येथे" ग्रीन पुणे मान्सून हील मॅरेथॉनचे ...