!!त्रंबकेश्वर पारायण सोहळा!!(८)
ह.भ.प.श्री.श्रावण महाराज अहिरे यांचे आज कीर्तन झाले होते. त्यांनी सावता महाराज यांचा अभंग किर्तनसेवेसाठी घेतला होता. तो खालीलप्रमाणे--
नामाचिया बळे न भिऊ सर्वथा।कळीकाळाच्या माथा सोठे मारु।१।
वैकुंठीचा देव आणू या किर्तनी।विठ्ठल गाऊनी नाचो रंगी।धृ।
सुखाचा सोहळा करुनी दिवाळी।प्रेमे वनमाळी चित्ती धरु।३।
सावता म्हणे ऐसा भक्तिमार्ग धरा।तेणे भक्तीद्वारा वोळगंती।४।
अभंगाचे निरुपण करताना श्रावण महाराज अहिरे म्हणाले की, श्रवण, कीर्तन नामस्मरण असे भक्तिमार्गाचे अनेक प्रकार आहेत.नामस्मरण या भक्तिमार्गामध्ये देखील प्रचंड ताकद आहे. या ताकदीमुळे मनुष्य निर्भय बनतो. त्याच्या मार्गात कोणी अडथळा आणण्याचा प्रयत्न केला तर त्याला तसेच सडेतोड उत्तर देतो.
सावता महाराज म्हणतात , तुम्ही भक्तीचा मार्ग धरा. भक्ती केली तरच माणसाला मुक्ती मिळते. चरित्राविषयी माहिती सांगताना अहिरे
महाराज म्हणाले की, इतर संताप्रमाणे सावता महाराज यांनाही लोकांच्या त्रासाला सामोरे जावे लागले आहे. सावता महाराज यांचे कुटुंब मुळचे औसाचे,नंतर ते आरणगाव येथे स्थलांतरीत झाले. त्यांच्या कुटुंबातील सदस्य विठ्ठलभक्त होते. त्यांचा जन्म १२५० साली झाला.सावता महाराज हेदेखील पंढरीचे वारकरी होते.ते उत्तम शेतकरी होते. त्यांच्यादृष्टीने शेती हीच पोथी होती.त्यांचा व्यवसाय कृषी,वागण्यात ऋषी त्यामुळे देवांची खुशी त्यांना प्राप्त झाली होती.
संत सावता यांना दोन अपत्ये होती. त्यांना केवळ ४५ वर्षाचे आयुष्य लाभले.दरवर्षी वारीच्या वेळी पंढरीला शेकडो पालख्या जात असतात परंतू आरणगावहुन पंढरपूरला पालखी जात नाही.याउलट पंढरपूरहून आरणगावला पालखी
येते.थोडक्यात प्रत्यक्ष पांडुरंगच सावता माळी यांच्या भेटीस येतो.
कीर्तनाचे महत्व सांगताना महाराज म्हणतात, नुसत्या कीर्तन श्रवनाणे आपल्यातील दोष कळतात आणि ते दोष दूर करण्यासाठी संबधित व्यक्ती प्रयत्न करते. कीर्तनात देव नाचतात असेही या अभंगात म्हटले आहे.
सावता महाराजांना शेतीची प्रचंड आवड होती. "कांदा, मुळा,भाजी,अवघी विठाई माझी",प्रत्यक्ष कामात परमेश्वर शोधणारे सावता महाराज आहेत.
आपण आपले काम प्रामाणिकपणे करावे,हाच संदेश आज मिळाला असे वाटते.
शब्दांकन-राजेंद्र पवार
९८५०७८११७८