!! पुणे ते बारामती आरोग्यवारी १०० किलोमीटर (२८ जुलै २०२४)
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढ दिवसानिमित्त रिले रनचे आयोजन केले होते. यामध्ये स्पर्धक १०,२१,५० आणि १०० किलोमीटरमध्ये भाग घेऊ शकत होते.मी १०० किलोमीटरच्या स्पर्धेमध्ये भाग घेतला होता. ही स्पर्धा पहाटे ४ वाजता सारसबाग पुणे येथून मान्यवरांच्या हस्ते फ्लॅग ऑफने सुरु झाली. या स्पर्धेत प्रथम, द्वितीय, तृतीय असे क्रमांक काढले जाणार नव्हते. ही स्पर्धा पूर्ण करणे एवढेच अपेक्षित होते. ही स्पर्धा पूर्ण करणे हेच मोठे स्पर्धकापुढे आव्हान होते.
आपणा सर्वांच्या कृपाआशीर्वादाने ते आव्हान पूर्ण करता आले.स्पर्धा सुरु झाल्यानंतर स्पर्धकांच्यापुढे त्यांचा जोश वाढवण्यासाठी एका खास जीपचे आयोजन केले होते. त्यामध्ये गाणी वाजवली जात होती त्यामुळे गाण्यांच्या ताला - सुरावर स्पर्धकांचे पाय भिरकत होते. आजचा स्पर्धेचा मार्ग हा हडपसर, दिवेघाट, झेंडेवाडी, सासवड, मल्हारगड -जेजुरी, मोरगाव, कऱ्हावागज, नेवसेवस्ती, बारामती असा होता.
आज वातावरण खुपचं छान होते, निसर्गराजा जणू आमच्या स्वागतासाठी बरसात करत होता. संपर्ण स्पर्धा मार्गावर तुषार सिंचन होत होते असे म्हटले तर वावगे होणार नाही. पावसामुळे स्पर्धक चिंब होऊन जात होते.संपूर्ण दिवसभर सूर्य नारायणाचे दर्शन झाले नाही. ही बाब स्पर्धकासाठी पोषक ठरली. मला तर या वातावरणाचा फायदा झाला. मार्गामध्ये शारिरीक क्षमतेचा कस बघणारा दिवेघाट सर्व रनर्सची जणू कठीण परीक्षा घेत होता. बारामतीकरांचा रूट सपोर्ट हा नेहमीच छान असतो असे ऐकून होतो आज त्याचा प्रत्यय आला. प्रत्येक दोन किलोमीटरवर हायड्रेशन पॉईंट होते त्यामुळे शरीराला ऊर्जा मिळण्याची काहीच अडचण आली नाही. आज ही स्पर्धा पूर्ण झाल्यानंतरचा आनंद हा अवर्णनीय आहे. या वयात मोठ्या स्पर्धेत भाग घेणे आणि ती पूर्ण करणे हेच एक मोठे आव्हान असते. ते आव्हान लिलया पेलले.
१०० किलोमीटरची स्पर्धा पूर्ण झाल्यानंतर सत्कार समारंभाचे आयोजन नटराज सभागृहात करण्यात आले होते. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र राज्याचे क्रीडामंत्री आदरणीय संजय बनसोडेसाहेब उपस्थित होते त्यांच्या हस्ते आमचा सन्मान करण्यात आला.यावेळी जयदादा पवार, जिल्हा क्रीडाधिकारी, तालुका क्रीडाधिकारी, फाऊंडेशनचे अध्यक्ष सतिश ननावरे उपस्थित होते. फाऊंडेशनचे अध्यक्ष ननावरे सरांनी प्रास्ताविक केले. अजितदादा पवार यांना दीर्घायुष्य लाभावे यासाठी गत पाच वर्षापासून या स्पर्धेचे आयोजन केले जाते. त्याला उत्तम प्रतिसाद लाभत असल्याचे त्यांनी सांगितले. १०० किलोमीटर अंतर पूर्ण करणाऱ्यांचा सत्कार मा.क्रीडा मंत्री संजय बनसोडे व जयदादा पवार यांच्या हस्ते करण्यात आला. स्पर्धा मार्गावर जेजुरी जवळ आमचे बंधू डॉ. दत्ता भोसले आणि त्यांच्या सर्व कुटुंबीयांची भेट दिली. त्यांनी दिलेले प्रोत्साहन आणि इनर्जी फूडने आमचा उत्साह द्विगुणित झाला. आज प्रोत्साहन देण्यासाठी शिवकृपाचे संचालक रमेश चव्हाण हेही आले होते. आज माझ्यासोबत विशाल घोरपडे, ओंकार पोतेकर होते त्यांच्या साह्याने मला ही स्पर्धा नियोजित वेळेत पूर्ण करणे शक्य झाले. आरोग्यासाठी चालणे, धावणे हा उत्तम मार्ग आहे.
आपणही आपले आरोग्य चांगले राहावे यासाठी चालणे, धावणे किंवा कोणताही व्यायाम प्रकार निवडावा,त्यात भाग घ्यावा आपले आरोग्य चांगले राखावे असे वाटते.
राजेंद्र पवार
संचालक, शिवकृपा सहकारी पतपेढी लिमिटेड, मुंबई
९८५०७८११७८
८१६९४३१३०६