!! पाऊले चालती पंढरीची वाट ( दिवस अकरावा १० जुलै)
कालचा मुक्काम फलटण येथे होता. फलटण हे सातारा जिल्ह्यातील एक मोठे शहर आहे.
प्रथम फलटण विषयी थोडक्यात माहिती....
फलटण हे भारतातील एक पुरातन शहर आहे. महानुभाव पंथीयांची दक्षिणकाशी म्हणून फलटण ओळखले जाई. दरवर्षी चैत्र वद्य प्रतिपदेला फलटणला घोड्यांची जत्रा होते. या जत्रेला पंजाब, बिहार, उत्तरी भारतातून भाविक मोठ्या प्रमाणात सहभागी होतात. येथे एक प्रसिद्ध श्रीराम मंदिर आहे. ते फलटणचे ग्रामदैवत म्हणून ओळखले जाते. दर वर्षी नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात श्रीराम रथोत्सव साजरा केला जातो. यालाच रामयात्रा व रामदिवाळी असे देखील म्हणतात. या यात्रेला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लोक येतात. फलटण येथील पुरातन हेमाडपंथी जबरेश्वर मंदिरही प्रसिद्ध आहे. ऐतिहासिक वारसा असलेला तालुका आहे.
फलटण हे हिंदुस्थानातील एक संस्थान होते. नाईक-निंबाळकर हे संस्थानचे राजे होते. फलटण ही महानुभाव संप्रदायाचे चक्रपाणी महाराज यांची जन्मभूमी आहे. फलटण येथील राम मंदिर आणि मुधोजी मनमोहन राजवाडा ह्या अति प्राचीन वास्तू जतन केल्या आहेत. कैक चित्रपट/दूरचित्रवाणी मालिका ह्यांचे चित्रीकरण आजही ह्या वास्तूंमध्ये होत असते.
आता पालखी विषयी...
आज सकाळी साडेसहा वाजता पालखी सोहळा मार्गस्थ झाला. बराच वेळ फलटण शहरात पालखी सोहळा थांबला होता. रस्त्याच्या दुतर्फा उभे राहून लोक माऊली, माऊली असा जयघोष करीत होते. आज दुपारच्या विसाव्यापर्यंत भयंकर ऊन लागत असल्याने चालताना त्रास जाणवत होता. आज पालखीने विडणी, पिंप्रद, वाजेगाव या ठिकाणी विसावा घेतला. आमची विसाव्याची ठिकाणची विश्रांती स्थळे निश्चित ठरलेली आहेत. पहिल्या विसाव्याच्या वेळी मिसाळ यांच्या घरी छानपैकी पिठलं भाकरी खायला मिळाले. त्यांच्या घरची गरिबी असून देखील त्यांचा सेवा करण्याचा भाव मन हेलावून टाकणारा होता.दुपारी तर आम्हाला बारामती वरुन भोजन आले होते. मूळचे बिजवडीचे असणारे रामचंद्र भोसले सर यांनी पिंप्रद येथे ही सेवा केली होती. दुपारनंतर ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने चालताना काहीच त्रास जाणवला नाही.
आजचा पालखी बरड मुक्कामी आहे. आम्ही मात्र मुक्कामासाठी पवार वस्ती निंबळक येथे ज्ञानेश्वर पवार यांच्या घरी आलो होतो. ज्ञानेश्वर पवार वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट येथे शास्त्रज्ञ म्हणून कार्यरत आहेत. आज उन्हामुळे लोकांची आजारी पडण्याचे प्रमाण जास्त होते. मार्गात अनेक ठिकाणी मेडिकल कॅम्प दिसून आले. आम्ही वैष्णव मेडिकल कॅम्पला भेट दिली. सगळे डॉक्टर वैद्यकीय सेवा करण्यात मग्न होते.
वैष्णव मेडिकल गेली ३१ वर्षे वारकऱ्यांची सेवा करीत आहे. या सेवेचे श्रेय विजय कासूर्डे आणि त्यांच्या टीमला जाते. आज संस्थेचे उपाध्यक्ष ऍड. दादासाहेब खरमाटे तसेच म्हसवड येथील प्रतितयश डॉ.मोडासे यांचीही भेट झाली. रुग्ण सेवा ही खऱ्या अर्थाने ईश्वर सेवा होय. वैष्णव मेडिकल ट्रस्ट करीत असलेले काम समाजाला प्रेरणादायी आहे. हे कामच ईश्वराचे आहे.
"Service to man is Service to God"असेही म्हटले जाते. आपणही जिथे जिथे संधी मिळेल तिथे तिथे सेवेची संधी घेतली पाहिजे आणि परमेश्वराची सेवा केली पाहिजे. संत सावता माळी यांच्या भाषेत सांगायचे म्हटले तर " कांदा मुळा भाजी, अवघी विठाई माझी. थोडक्यात आपण करीत असलेले काम प्रामाणिकपणे करा ,ती परमेश्वर सेवा आहे असे वाटते.
राजेंद्र पवार
संचालक
शिवकृपा सहकारी पतपेढी लिमिटेड,मुंबई
९८५०७८११७८
८१६९४३१३०६
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा