!! पाऊले चालती पंढरीची वाट!! (दिवस चौथा दि.२ जुलै)
मी प्रस्थानाच्या वेळी दिनांक २९ जून रोजी आळंदी येथे अल्पशी हजेरी लावली होती. दुसऱ्या दिवशी माझ्या वैयक्तिक अडचणीमुळे वारीत सहभागी होऊ शकलो नाही. आज प्रत्यक्ष वारीत सहभागी झालो. आज बरोबर ६ वाजता भवानी पेठेतून आरती होऊन पालखी मार्गस्थ झाली. आज ज्ञानेश्वर माऊली व तुकाराम महाराजांच्या पालख्या एकाच वेळी पुण्यात दाखल झाल्या असल्याने शहराला यात्रेचे स्वरूप आले होते. सर्वत्र भक्तिमय वातावरण तयार झाले होते. सगळीकडे ज्ञानोबा माऊलीचा गजर ऐकू येत होता. वारीच्या माध्यमातून आपणास लोकांपर्यंत पोहोचता येते. याचा सर्वांनीच लाभ घेतला होता. यामध्ये प्रामुख्याने राजकीय पक्षांचा समावेश झालेला दिसत होता. त्या त्या परिसरातील सार्वजनिक मंडळे वारकऱ्यांची सेवा करताना दिसत होते.
वारी मार्गस्थ होताना " मंगलाचरण पहिले"
मधील १० अभंग होतात. आपल्या माहितीसाठी पहिला अभंग.......
रुप पाहता लोचनी! सुख झाले हो साजणी !१!
तो हा विठ्ठल बरवा! तो हा माधव बरवा !२!
बहुत सुकृताची जोडी! म्हणूनि विठ्ठलिं आवडी!३!
सर्व सुखाचे आगर! बाप रुखुमादेविवर!४!
असे अभंग म्हणत विठ्ठल नामात तल्लीन होऊन वारकरी देहभान विसरून चालत होते.
सकाळचे साडेसात वाजता पालखी वानवडी येथे पोहचताच परंपरेनं येथे आरती झाली. वारीमध्ये शिस्तीला प्रथम प्राधान्य असते. चोपदाराने दंड उंचावतच सर्वत्र शांतता पसरते. सर्व वारकरी रांगेत उभे राहून आरती करतात. वारी हे समाज प्रबोधनाचे उत्तम माध्यम आहे. वारीत प्रत्येकजण आपआपल्या परीने सेवा करत असतात. संस्था तसेच वैयक्तिक स्वरूपात मदत करतात. यामध्ये,फराळ, फळांचे वाटप त्याचबरोबर चप्पल, बुट, बॅग दुरुस्ती अशी कामे केली जाते. वैद्यकीय सेवा मोफत सेवा दिली जाते.
दिवसभराचा विचार केला असता पहिला विसावा हडपसर येथे होता. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये कार्यरत असणारे व्ही. एस.पवार यांनी अल्पोप्रहराची व्यवस्था केली होती. नंतरचा विसावा उरळी येथे होता. तेथे आम्ही मंदिरातच थोडा वेळ विश्रांती घेतली. पावसाच्या एक दोनच सरी येऊन गेल्या त्यामुळे हवेत गारवा निर्माण झाला. पाऊस कमी असल्याने रस्त्यावर चिकचिक झाली होती. वडकी नाला येथे दुपारचा विसावा होता. स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या हस्ते "माऊलीं "चे स्वागत केले जात होते. दिवे घाटातील पालखीचा प्रवास खूपच विलोभनीय होता. चित्रीकरणासाठी सर्वच दूरचित्रवाहिनी यंत्रणा सज्ज होती. घाट चढून आल्यानंतर " विठ्ठल पार्क" मधील मूर्ती सर्व वारकऱ्यांचे लक्ष वेधून घेत होती. आज पालखी पालखी तळावर येण्यासाठी रात्रीचे दहा वाजले होते.
सासवडला शिवकृपाची शाखा असल्याने मुक्कामाची उत्तम व्यवस्था झाली. आजच्या दिवसाचा विचारत केला तर लोकांचा सेवा भाव खूपच भावला. आपण दुसऱ्याच्या उपयोगी पडावे, त्यांना मदत करावी, आपल्या उत्पन्नातील समाज कार्यासाठी वापरावा हा संकेतच मिळाला. आपणही आपल्या उत्पन्नातील काही हिस्सा समाजाच्या कामासाठी वापरावे असे वाटते.
राजेंद्र पवार
संचालक, शिवकृपा सहकारी पतपेढी लिमिटेड,मुंबई
९८५०७८११७८
८१६९४३१३०६
क्रमशः
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा