!! पाऊले चालती पंढरीची वाट (दिवस बारावा ११ जुलै)
सातारा जिल्ह्यातील शेवटचा मुक्काम बरड येथे असतो. नियोजित वेळेनुसार सकाळी साडेसहा वाजता पालखी मार्गस्थ झाली. आम्ही माऊली सोहळ्याबरोबर असल्याने अनेकदा माऊलीच्या दर्शनाचा योग येतो. तसाच आज सकाळी जवळून दर्शन घेण्याचा योग आला. आज पहिला विसावा राजुरी येथील साधू बुवाचा ओढा या ठिकाणी झाला. विसाव्याच्या सर्वच ठिकाणी पालखी रथातून उतरवून वाजत गाजत नेली जाते. हा सोहळा अतिशय विलोभनीय असतो. राजुरीपासून काही अंतरावरच सोलापूर जिल्ह्याची हद्द सुरु होते.
प्रशासनाच्यावतीने माऊलींचा स्वागत समारंभ फटाक्यांच्या आतशबाजीने संपन्न झाला. स्वागतासाठी राज्याच्यावतीने सोलापूरचे पालक मंत्री मा. चंद्रकांतदादा पाटील, माढा मतदार संघाचे लोकसभा सदस्य मा.धैर्यशील मोहिते पाटील, सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद व अनेक मान्यवरांच्या शुभहस्ते झाले. प्रत्येक दिंडीवर फुलांचा वर्षाव होत होता. सातारा पोलिसांच्यावतीने पालखी सोहळा सोलापूर पोलिसांच्या ताब्यात दिला.हा सोहळा धर्मपुरी येथे पार पडला.
आज दुपारचा विसावा कारुंडे या गावी होता. विसाव्याच्या ठिकाणच्या प्रत्येक गावाला यात्रेचे स्वरूप आलेले असते. शासनाच्या वतीने कॅनालला पाणी सोडलेले असल्याने लोकांच्या आंघोळीची व कपडे धुण्याची उत्तम सोय झाली आहे. आज उन्हाने फारसा त्रास दिला नाही. अधून मधून वाऱ्याच्या झुळका वारकऱ्यांना सुखावत होत्या.
दुपारनंतर पानसकरवाडी येथे माउलींनी विसावा घेतला. या विसाव्यापासून शिखर शिंगणापूर खूप जवळ आहे. आमच्या दिंडीत देहू येथील गुरुकुलचे विद्यार्थी चालत असल्याने अतिशय शिस्तीत मार्गक्रमण चालू असते. ही दिंडी ह .भ.प.पांडुरंग घुले महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली चालते. आज संध्याकाळी पालखी तळावर गेलो होतो. पालखी तळावर माऊलींच्या दर्शनासाठी हजारो भाविकांची उपस्थिती होती. पालखी तळावर पालखी वाजत गाजत नेली जाते. टाळ मृदंगाच्या गजरात सगळेच बेभान असतात.
वारीत चोपदाराला अनन्य साधारण महत्व असते. चोपदाराने दंड उंचवताच सर्वत्र शांतता पसरते. हरवलेल्या जिनसा, सापडलेल्या जिनसा यांचा उल्लेख होतो. ओळख पटवून देऊन, त्या घेऊन जाण्याचे आवाहन केले जाते. दुसऱ्या दिवशी पालखी सोहळा कधी मार्गस्थ होणार याची माहिती दिली जाते. वारीमध्ये स्वयंशिस्त असते. येथे पोलिसांना फारसा त्रास होत नाही. अशी शिस्त सर्वत्र राहिली तर गुन्हेगारी कमी व्हायला वेळ लागणार नाही. शिस्तीने राष्ट्र मोठे बनते असे म्हटले जाते. आपण आपल्या राज्याच्या भल्यासाठी स्वयंशिस्त पाळूया. आपल्या राज्याला प्रगती पथावर नेण्यासाठी प्रयत्नशिल राहूया.
राजेंद्र पवार
संचालक
शिवकृपा सहकारी पतपेढी लिमिटेड, मुंबई
९८५०७८११७८
८१६९४३१३०६
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा