!! पाऊले चालती पंढरीची वाट दिवस दहावा १० जुलै !!
आमचा तरडगावचा मुक्काम जितेंद्र गाडे यांच्या घरी होता. त्यांनी आमची केलेली सेवा शब्दात व्यक्त करता येणार नाही. आज पालखी समाजआरती होऊन सकाळी ६ वाजता मार्गस्थ झाली. सर्वच विसाव्याच्या ठिकाणी पालखी रथातून उतरवून नेली जाते. आज काळज, सुरवडी, निंभोरे, वडजल या ठिकाणी माउलींनी विसावा घेतला.
पहिला विसावा दत्त मंदिर काळज येथे होता. आम्ही आज सकाळी दिंडीतील मुलांच्याबरोबर अल्पोप्रहार घेतला. आजचे सर्वच विसावे थोडे जवळ वाटले. सुरुवातीचा काही काळ निसरड्या वाटेने चालावे लागले. आज ढगाळ वातावरण होते त्यामुळे चालताना कोणताही त्रास जाणवला नाही. पावसाची एकच सर येऊन गेली पण वातावरण बदलून गेली. चालण्यापेक्षा उभे राहण्याचा त्रास जास्त जाणवतो.
दुपारचा विसावा निंभोरे येथे होता. ज्ञानदीप को -operative क्रेडिट सोसायटी मधील शाखा प्रमुख किशोर मोरे यांच्या घरी विसावलो. दुपारचे जेवण खंडाळा तालुक्याच्या दिंडीत घेतले. यावेळी ज्ञानदिपचे संस्थापक व्ही.जी.पवार आणि शिवकृपाचे संस्थापक गोरख चव्हाण यांची गळाभेट एक वेगळेच आत्मीयतेचे नाते सांगून गेली. वारीच्या मार्गावर प्रत्येकजण आपापल्यापरीने सेवा देत असतात.
वारी समाज प्रबोधनाचे उत्तम माध्यम आहे. प्रत्येक विभाग विविध चित्ररथाच्या माध्यमातून आपल्या योजना लोकांच्या पर्यन्त नेण्याचा प्रयत्न केला जातो. आज शिक्षण विभागाचा एक स्टॉल पाहायला मिळाला. शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकारी महेश पालकर यांची भेट झाली. त्यांनी आमचा सत्कारही केला. उल्लास - नवभारत साक्षरता कार्यक्रम लोकांच्या पर्यन्त नेण्याचा प्रयत्न केला. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण -२०२० मधील शिफारशीनुसार व संयुक्त राष्ट्राच्या शाश्वत विकास ध्येयानुसार ,२०३० पर्यंत सर्व तरुण आणि प्रौढ, पुरुष आणि स्त्रीया अशा सर्वांनी १०० टक्के साक्षरता आणि संख्याज्ञान अपेक्षित आहे.
"गेले सांगून ज्ञाना - तुका, झाला उशीर तरी शिका....!"
थोडक्यात काय शिक्षणापासून कोणीही वंचित राहू नये. आपल्या परिसरातील असाक्षर व्यक्तींची लगतच्या शाळेकडे त्यांचे कुटुंबीय,नातेवाईक, समाजातील नागरिकांनी तात्काळ नोंदणी करावी त्यांना शिक्षणाची संधी उपलब्ध व्हावी असे वाटते.
राजेंद्र पवार
संचालक
शिवकृपा सहकारी पतपेढी लिमिटेड, मुंबई
९८५०७८११७८
८१६९४३१३०६
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा