!! पाऊले चालती पंढरीची वाट (दिवस चौदावा १३ जुलै)
काल माऊलींचा मुक्काम माळशिरस येथे होता. माळशिरस येथे शिवकृपा पतपेढीची शाखा तसेच विभागीय कार्यालय आहे. पतपेढीच्या वतीने वारकऱ्यांना पाणी, केळी, चिक्कीचे वाटप संस्था अध्यक्ष मा. गोरख चव्हाण, संचालक शिरीष देशमुख, संचालक राजेंद्र पवार, संचालक संतोष चव्हाण, ज्ञानदीपचे माजी अध्यक्ष दिलीप चव्हाण आदींच्या शुभहस्ते करण्यात आले. मार्गावर दोन्ही संस्थांच्या वतीने आमची सोय होत आहे त्याचा आम्हास आनंद आहे. आज सकाळी साडेसहा वाजता ज्ञानेश्वर माऊलींची पालखी माळशिरसहून मार्गस्थ झाली. ग्रामस्थ भाविक मोठ्या संख्येने स्वागतासाठी रस्त्याच्या दुतर्फा उभे होते. माऊली, माऊली असा गजर सर्वत्र ऐकू येत होता. आज सकाळी खुडुस येथे गोल रिंगण झाले. रिंगण सोहळा पाहण्यासाठी सर्वच ठिकाणी प्रचंड गर्दी असते. चेंगरा चेंगरीच्या भितीने गर्दीत जाणे आम्ही टाळतो. खुडूसमध्ये आमचे विद्यार्थी नाथाजी केंजळे यांची भेट झाली. ते वारीत वाहतूक मुक्तीदलाच्या माध्यमातून वाहतूक नियंत्रणासाठी पोलिसांना मदत करत असतात. वारीतील त्यांचे कार्य इतरांना प्रेरणादायी आहे.
आज दुपारी विझोरी येथे पालखीने विसावा घेतला. आज सकाळपासून चालण्यासाठी पोषक वातावरण होते. मधेमधे वाऱ्याच्या झुळका आम्हाला सुखावत होत्या. वेळापूरला गावाजवळ तीव्र उतार आहे. या उतारावरून चालत असताना संत तुकाराम महाराजांना विठ्ठल मंदिराचा कळस दिसला, प्रत्यक्ष पांडुरंगाच्या भेटीने आसुसलेले तुकाराम महाराज कळस निदर्शनास येताच धावू लागले. आजही या तीव्र उतारावर दिंड्या धावतात. आता पंढरपूर एकदम जवळ आल्याचा हा संकेत आहे.
आम्ही रथापुढील तीन नंबरच्या दिंडीतून चालत आहोत. वेळापूर येथे तीन नंबरच्या दिंडीला भारुड सादर करण्याचा मान आहे. यावेळी कलाकारांनी आपल्या कला सादर केल्या. इतकेच नव्हे तर येथे मराठा आरक्षणालाही वाचा फोडली. वारी हे प्रबोधनाचे उत्तम माध्यम आहे. आज आय. टी. क्षेत्रातील अनेक तरुण तरुणी वारीत सहभागी झाले होते.
सध्या मुलींच्या जन्मदराचा प्रश्न गंभीर आहे. साधारण तीस चाळीस वर्षांपासून ही समस्या भेडसावत आहे. बऱ्याच मुलांना लग्नाशिवाय राहावे लागत आहे ही वस्तुस्थिती आहे. आज शासन जशी काळजी घेत आहे तशी काळजी त्यावेळीच घेतली असती तर ही समस्या भेडसावली नसती. पण एखाद्या बाबीचे विदारक परिणाम निदर्शनास आल्याशिवाय आपण काळजी घेत नाही. स्त्री पुरुष जनन दर समान असणे गरजेचे आहे. पण आजही तो नाही. इंडियन मेडिकल असोशियशन अकलूज यांच्या माध्यमातून डॉ. रेवतीताई राणे, डॉ.संतोष खडतरे यांनी लेक लाडकी मोहीम राबवली होती.
"लेक लाडकी मोहीम, लेकच वाढवते वंशाला, लेकच आधार मायबापाला"
अशा आशयाचे फलक डॉक्टर मंडळींनी धारण केले होते. स्त्रीला समाजात आदराचे स्थान मिळावे यासाठी मुख्यमंत्री लाडकी बहिण ही योजना नुकतीच राज्य सरकारने आणली आहे. थोडक्यात काय मुलीचे महत्व समाजाला पटावे यासाठी सगळा प्रपंच.
आपण सगळेजण मुलीच्या जन्माचे स्वागत करुया. त्यांना आदराचे स्थान देऊया. मुलामुलींना समान न्यायाने वागवूया. थोडं अधिक महत्व मुलींना देऊया.
राजेंद्र पवार
संचालक, शिवकृपा सहकारी पतपेढी लिमिटेड, मुंबई
९८५०७८११७८
८१६९४३१३०६
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा