!!आमची नर्मदा परिक्रमा !! (१८ ) शूलपाणेश्वर
कालचा मुक्काम वडफळी (चापडी) येथील चैतन्य आश्रमात होता. हा आश्रम महाराष्ट्राच्या शेवटच्या टोकावर आहे. आज सकाळी लवकरच चालण्यास सुरुवात केली. संपूर्ण मार्ग जंगलातून होता. गोरा कॉलनीपर्यंत कनजी, माथासर, झरवानी अशी गावे लागली. या मार्गावर सागाचीच दाट झाडी सर्वत्र दिसून आली. सध्या येथे रस्त्यांची कामे प्रगतीपथावर असल्याची दिसून आली. या मार्गावर चालणं खूपच अवघड आहे. या परिसरात वन्यप्राणी देखील बऱ्यापैकी असल्याचे वन विभागाने फलक लावले आहेत. झरवानी परिसर पर्यटनासाठी प्रसिध्द आहे. मार्गावर गुजरात पर्यटन विकास महामंडळाच्या गाड्या सतत फिरताना दिसत होत्या. येथे फुलपाखरांसाठी खास उद्यान असल्याचे समजले. निवडुंगाच्या अनेक प्रजाती सर्वत्र दिसत आहेत. शेतीचा विचार केला तर पूर्ण डोंगर उतारावर शेती आहे. तूर, हायब्रीड पिके मोठ्या प्रमाणात घेतली जातात. शेती अतिशय कष्टाची आहे. सगळी वाहतूक डोक्यावरच होत असताना दिसते. घरांचा विचार केला तर बहुतेक ठिकाणी कुडाच्या भिंती दिसून आल्या. आम्ही गोरा कॉलनी येथे आल्याबरोबर शूलपाणेश्वराचे दर्शन घेतले. मंदिर परिसर अतिशय देखणा आहे.
शूलपाणेश्वर मंदिर माहिती .....
जुने शूलपानेश्वर मंदिर महाराष्ट्रातील मनीबेली या गावात होते. सरदार सरोवरामुळे ते धरणाच्या पाण्यात गेले. नवीन मंदिर गोरा या गावाजवळ गुजरात सरकारने १९९४ साली बांधले.
शुलापानेश्वर इतिहास
शंकराने त्रिशूळाने राक्षसाचा वध केला होता,त्यामुळे त्रिशूळाला रक्ताचे डाग लागले होते.ते डाग काही केल्या जात नव्हते, त्यामुळे भगवान शंकर सर्वत्र फिरत होते, याठिकाणी आल्यावर त्रिशूळ जमिनीवर आदळले तेव्हा त्यातून पाण्याची एक धार वरती आली व त्या पाण्याने त्रिशूळाचे रक्ताचे डाग धुतले गेले त्यामुळे शंकराची शूलपीडा दूर झाली. म्हणून याला शूलपाणेश्वर असे म्हटले जाते.
शूलपाणेश्वर मंदिर रात्रीच्या वेळी खूपच विलोभनीय दिसत आहे. रात्रीच्या वेळी घाटावर आरती होते त्या आरतीला हजेरी लावता आली. घाट परिसरात रंगीबेरंगी लाईटची व्यवस्था केली आहे. एका चांगल्या ठिकाणाला भेट देण्याचा योग आला त्यामुळे अतिशय आनंद झाला.
नर्मदा प्रकल्पामुळे गोरा कॉलनी विकसित झाली आहे. जाणीवपूर्वक प्रयत्न केला तर एखाद्या ठिकाणचे महत्व किती वाढते हे आज निदर्शनास आले. आपणही आपल्या भागाचा विकास करण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करायला हवेत असे मला वाटते.
राजेंद्र पवार
९८५०७८११७८
#नर्मदा #narmada