!! आमची नर्मदा परिक्रमा !! (११६ ) २२ मार्च
आम्ही दिनांक २१ मार्च रोजी पायी परिक्रमा पूर्ण केली ही परिक्रमा सर्वांच्या शुभेच्छामुळेच पूर्ण झाली असे मनोमन वाटते. कालच संकल्पपूर्तीची पूजाही झाली. आज सकाळी ओंकारेश्वर येथे दर्शन घेऊन चार महिन्यापूर्वी पूजनासाठी घेतलेले जल त्याचा जोतिर्लिंगाला जलाभिषेक केला. परिक्रमा पूर्ण केल्यानंतर मांधाता परिक्रमा करण्याचा प्रघात आहे तोही सोपस्कार पार पाडला, इतकेच नव्हेतर कन्यापूजनही केले.
आपल्या भारतभूमीचा विचार करता जरी सर्व नद्या पवित्र असल्यातरी फक्त नर्मदेचीच परिक्रमा केली जाते. देशातील अनेक साधूंनी, महंतांनी नर्मदाकाठी तपचर्या केली आहे. महाराष्ट्रापुरता विचार केला तरी शिर्डीचे साईबाबा, शेगावचे गजानन महाराज, अक्कलकोटचे स्वामी समर्थ, ब्रम्हचैतन्य महाराज गोंदवलेकर, टेम्बे स्वामी महाराज यासारख्या अनेक साधूंनी नर्मदाकाठी तपचर्या केली आहे. आजही काही साधू तपचर्या करत आहेत. साधूंच्या चरणस्पर्शाने पावन झालेल्या भूमीतून गेल्यानंतर आपलंही जीवन उजळून निघावे, अंगी असणारे दोष कमी व्हावेत हाच परिक्रमा करण्याचा प्रधान हेतू असतो, तोच हेतू आमचा होता. ही परिक्रमा जीवन जगण्याची आदर्श पाठशाळा आहे असे वाटते.
या परिक्रमेत अनेक गोष्टींची कसोटी लागते. पंढरपूरची पायी वारी करणे वेगळे आणि परिक्रमा करणे वेगळं. वारीत सर्व काही निश्चित असते. कोठे मुक्काम, कोठे विसावा हे सर्व ठरलेले असते. वारी व्यवस्थित पार पडावी यासाठी प्रशासनदेखील सज्ज असते. परिक्रमेत मात्र सगळंच अनिश्चित, कोठे भोजन, कोठे अल्पोपहार, कोठे विसावा हे ठरलेलं नसते. अनेक कटूगोड अनुभव येत असतात. येथे तुमच्या संयमाची, सहनशीलतेचीही कसोटी लागलेली असते. परिक्रमा पूर्ण केलेली व्यक्ती कोणत्याही प्रसंगाला सामोरे जाण्यासाठी सक्षम झालेली असते असं म्हटलंतरी वावगं ठरणार नाही. लिहिण्यासारखं खूप आहे परंतु आपण कोठेतरी थांबायला हवे.
थोडंस माझ्यासाठी....
आध्यात्माचा फारसा गंध नसलेला मी मात्र सत्संगामुळे बदलून गेलो. माझ्या आध्यत्मिक बदलाचे सारे श्रेय एकंबेचे माझे स्नेही श्री गोरख चव्हाण यांना जाते. ते माझे आध्यात्मिक गुरु आहेत. या परिक्रमेतदेखील त्यांनी व त्यांच्या सौभाग्यवती इंदुमती चव्हाण यांनी अनेक गोष्टी माझ्याकडून करुन घेतल्या. श्रीयुत चव्हाणसाहेबांनी आबापुरीच्या डोंगरावरील देवासाठी भव्य मंडप उभारला आहे हे आपणास ज्ञात आहेच.
या परिक्रमेत मला आलेले अनुभव, एखाद्या प्रसंगाविषयी मला काय वाटले ते आपणापर्यंत आणण्याचा प्रामाणिक प्रयत्न मी केला आहे. सगळ्याच गोष्टी सगळ्यांना पटतील असं मलाही वाटत नाही परंतु माझ्या परिक्रमेमुळे आपणात थोडासा जरी सकारात्मक बदल झाला तरी ही माझी परिक्रमा यशस्वी झाली असे मी म्हणेन. आपलं असंच प्रेम माझ्यावर राहू द्या.
राजेंद्र पवार
९८५०७८११७८