!! आमची नर्मदा परिक्रमा !! (१०८)१४ मार्च
आमचा कालचा मुक्काम नर्मदापुरम पूर्वीचे होशंगाबाद जिल्ह्यातील महायोगाश्रम येथे होता. हा आश्रम लोकनाथतीर्थ स्वामी महाराज आश्रम या नावानेही ओळखला जातो. हा आश्रम अगदीच नर्मदा किनाऱ्यावर आहे. सध्या सकाळी लवकर चालण्यास सुरुवात करत आहोत. आता उन्हाचा चटका जबरदस्त असल्याने फारसे चालणे होत नाही. दुपारी सक्तीची विश्रांती घ्यावी लागते.
आज वाटेत डोंगरवाडा, रंढाल, खोकसर, टिकरीया, नानपा, कुल्हडा आदी महत्वाची गावे लागली. आम्ही दुपारचा भोजन प्रसाद खोकसर येथील आश्रमात घेतला. हा आश्रम खूपच सुंदर आहे. येथे शिवलिंग तर आहेच परंतु येथे अखंड ज्योत प्रज्वलित असते. आपण एखाद्या बागेत आलो आहोत असेच वाटते. येथे सी.सी.टी.व्ही. सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. सदाव्रत आणि आमची खूपच जवळीक वाढली आहे. या तटावर तयार भोजन फार कमी वेळा मिळाले आहे. कालच आमची कजलास या गावातील गजराज कीर यांची ओळख झाली होती. आज त्यांनी आमच्या बॅगा त्यांच्या गावापासून पाच किलोमीटर अंतरावर असणाऱ्या आश्रमात नेण्यासाठी मदत केली. परिक्रमेत अनेक लोक आपणास वेगवेगळ्या पध्दतीने मदत करत आहेत.
आज आम्ही आवली घाटावरील गजानन आश्रमात थांबलो आहोत. येथे विठ्ठल, रुक्मिणी, नर्मदा माता, महाकाल, गजानन आदी मूर्ती असून लवकरच भव्य शिवलिंगाची प्रतिष्ठापना होत आहे. हे शिवलिंग पूर्ण नर्मदा परिक्रमा करुन आणले आहे. पलीकडच्या तीरावर असतानाही या घाटावर मुक्काम केला होता. या घाटाची माहिती आपणास यापूर्वी दिलेली होतीच त्यामुळे पुनरावृत्ती टाळत आहे.
आज खोकसर येथील आश्रमाने आमचं लक्ष वेधून घेतले. या ठिकाणची स्वच्छता, बाग, सर्व सुविधा इतर आश्रमापेक्षा कितीतरी पटीने जास्त आहेत. काम एकाच प्रकारचे पण काम करण्याची पध्दती खूप वेगळी असेल तर ते काम लक्ष वेधक होते. आपणही आपल्या जीवनात आपल्या वाट्याला आलेले काम अतिशय सौंदर्यदृष्टीने केले तर कामाचा आनंद तर मिळतोच, शिवाय इतरांच्या चेहऱ्यावर आनंद फुलतो. मग काम करताना स्वतः ही आनंदी होऊया व इतरांना आनंदी करुया.
राजेंद्र पवार
९८५०७८११७८
#narmada, #narmadamai, #narmadaparikrama, #narmadariver, #satarakar #shiv, #shivaputri
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा