!! आमची नर्मदा परिक्रमा !! (११४ ) २० मार्च
आमचा कालचा मुक्काम खंडवा जिल्ह्यातील मांडला या गावी असणाऱ्या हनुमान मंदिरात होता. हे गाव आध्यात्मिक वातावरणाने भारले आहे असेच वाटले. येथेही सदाव्रतच होते मात्र दोन एमपीमधील बंधूंनीच आमची सेवा केली. आजही आम्ही उन्हापासून आपले संरक्षण व्हावे यासाठी लवकरच चालण्यास सुरुवात केली. आम्ही लवकरच देवला गावी आलो. त्या गावात सकाळची प्रभातफेरी चालली होती. या राज्यात बहुतांशी गावात पहाटे प्रभातफेरी असते. याबाबत मी पाठीमागे उल्लेख केला होता. त्याच गावातील श्रध्दा श्रीमाली यांनी आम्हास दूध बिस्किटे दिली. आज वाटेत मुंदी नावाचे शहर लागले. तुलनात्मक विचार करता हे शहर स्वच्छ वाटले. येथील माता मंदिरात आम्ही बालभोग (अल्पोपहार ) घेतला.
आज दुपारचा भोजन प्रसाद भमौरी गावातील उमाबाई गुजर, मुन्शीजी गुजर यांच्या घरी मिळाला. बऱ्याच दिवसांनी ज्वारीची भाकरी खायला मिळाली त्यामुळे आनंदच झाला. आज वाटेत सहेजला, देवला, माथनी, पालसुद, मुंदी, केनूद, भमौरी, जलवा ही गावे लागली. या भागात मोहाची झाडे भरपूर आहेत. मोहाच्या झाडाखाली सर्वत्र फुलांचा सडा पडला होता. ही फुले वेचण्याचे काम चालले होते. या फुलांपासून मद्य निर्मिती केली जाते. मद्य निर्मितीला परवानगी नसली तरी घरोघरी निर्मितीचे काम चालत असल्याचे सांगितले. आज आमचा मुक्काम देवला रयत या गावी आहे. येथील सर्वच व्यवस्था एखाद्या हॉटेलला लाजवेल अशी आहे.
आता आमची परिक्रमा अंतिम टप्प्यात आहे. आम्ही ओंकारेश्वरजवळ पोहोचलो आहोत. थोडेसे परिक्रमेबाबत सांगितलेच पाहिजे. परिक्रमा करणे मनात येणे, प्रत्यक्ष कार्यवाहीला प्रारंभ होणे हा पूर्वपुण्याईचा भाग आहे असे वाटते. महाराष्ट्रातील बहुतेक जण ओंकारेश्वरपासून परिक्रमेस प्रारंभ करतात. परिक्रमा संकल्प आणि पूर्ती यामध्ये बरेच अडथळे आहेत. यामध्ये बऱ्याच वेळा आपण ग्रुपने निघतो. हा ग्रुप फार काळ टिकत नाही. कोणत्याही दोन व्यक्तींचे विचार एकसारखे असत नाहीत. काहीना काही अडचणीमुळे ग्रुप टिकत नाही हे वास्तव आहे. आपण पायी परिक्रमा करण्याचा कितीही निर्धार करावयाचा म्हटले तरी शरीर प्रकृती साथ देईल असे नाही. शारीरिक वेदनेतून कोणाचीही सुटका नाही.
मी सहजच परिक्रमा पार करेन असे कोणी म्हणत असेल त्याचा अहंकार लगेचच उतरतो. आम्ही ही परिक्रमा जास्तीत जास्त किनाऱ्याने केली आहे त्यामुळे आमचा वेळ वाढला आहे. परंतु किनाऱ्याचा आनंद लुटला आहे. प्रचंड इच्छाशक्ती,परमेश्वरावर श्रद्धाभाव, शारीरिक क्षमता या सर्वांची योग्य सांगड असेल तरच ही परिक्रमा पूर्ण होते. पायी परिक्रमा पूर्ण करण्याचे प्रमाण सहा सात टक्क्यांपर्यंत आहे. जसा सी. ए. परीक्षेचा निकाल अत्यल्प लागतो तेच प्रमाण पायी परिक्रमा पूर्ण करणाऱ्यांचे आहे.
आपणास जीवनात यशस्वी व्हायचं असेल तर प्रचंड इच्छाशक्ती, कोणतेही अडथळे पार करायची तयारी असेल तर आणि तरच आपण यशस्वी होतो अन्यथा नाही. कोणत्याही क्षेत्रात उच्चपदी जायचे असेल तर कष्टाशिवाय पर्याय नाही, आपली चिकाटी कमी होता कामा नये हेच परिक्रमेतून आम्हाला शिकायला मिळाले.
आपण प्रत्येकाने आपापल्या क्षेत्रात करिअर करण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावेत, तसे प्रयत्न आपण सर्वजण करुया.
राजेंद्र पवार
९८५०७८११७८
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा