!! आमची नर्मदा परिक्रमा !! (११०) १६ मार्च
आमचा कालचा मुक्काम गोंदागाव येथील आश्रमात होता. हा आश्रम खूपच जुना आहे. काल आम्ही ४२ किलोमीटर चाललो होतो. उष्णतेचा त्रास होऊ नये यासाठी परिक्रमा लवकर पूर्ण करण्याचा आमचा मानस होता. कालचे तपमाण ही ४० डिग्रीच्या जवळपास होते. आम्हाला हिट स्ट्रोक झाला असेच म्हणावे लागेल. आम्ही संवेदनशील असल्याने प्रतिकूल परिणाम शरीरावर लगेच जाणवला. आमचे दोन स्नेही श्री. गोरख चव्हाण व सौ. इंदुमती चव्हाण या दोघांनाही शारीरिक त्रास झाला. जवळच छिपानेर नावाचे गाव होते. तेथे डॉ. लखनसिंह राजपूत यांच्या दवाखान्यात उपचारासाठी आम्ही गेलो. तेथे नुसता उपचार घेतला नाही तर त्यांच्याकडेच अल्पोपहारही घेतला. शारीरिक त्रासामुळे बॅग घेऊन चालणे अवघडच होते, आमची अडचण डॉक्टरांच्या लक्षात आली. त्यांनी स्वतः आमची बॅग पुढे पाच किलोमीटरवर असणाऱ्या लछोरा आश्रमात पोहचवली. या डॉक्टरांनी एक परिक्रमा केलेली होती त्यामुळेच त्यांच्या शब्दांशब्दात सेवाभाव जाणवत होता.
आज वाटेत छिपानेर, लछोरा, समसाबाद, जलोदा, गोयत, सुरजना ही महत्त्वाची गावे लागली. आज आमचा मुक्काम मनोहरपुरा येथील नर्मदा मंदिरात आहे. आज दुपारचा भोजन प्रसाद हरदा जिल्ह्यातील लछोरा येथील मा रेवा कुटी आश्रमात घेतला. हा आश्रम पुण्यातील सौ. प्रतिभा चितळे चालवतात. प्रतिभाताईंनी पायी परिक्रमा केली आहे. परिक्रमा केल्यानंतर परिक्रमावासीयांच्या मनात सेवाभाव जागृत होतो. तो सेवाभाव त्यांच्या मनात जागृत झाला. त्यांनी तो प्रत्यक्ष अंमलात आणला. आपला स्वतःचा आश्रम सुरु करण्यापूर्वी त्यांनी एकदोन ठिकाणी सेवा दिली होती. महत्वाचे म्हणजे परिक्रमेबाबत यु ट्यूबच्या माध्यमातून त्या हजारो लोकांपर्यंत पोहोचल्या आहेत.
सौ. प्रतिभाताईंच्याकडे मुळातच अलौकिक "प्रतिभा " आहे. आज खऱ्याअर्थाने ताईंच्याबरोबर सत्संग झाला. या आश्रमात सेवा देण्यासाठी त्यांच्या कुटुंबातील सदस्याशिवाय त्यांच्या कामावर श्रध्दा असणारी काही मंडळी उपस्थित होती. त्यांच्या नातीने आण्विने आमचे विशेष लक्ष वेधून घेतले. अगदी सहा-सात वर्षांची मुलगी नर्मदा मातेचे गीत "मैय्या अमरकंटकवाली, तु है भोली भाली" हे गीत तर म्हटलेच, शिवाय " हनुमान चालीसा" हेही म्हणून दाखवले. हा सगळा सत्संगाचा परिणाम आहे असे वाटते.
सत्संगामुळे माणसे घडतात, अगदी वाल्याचा वाल्मिकी होतो हे आपणास विदित आहेच. सौ. प्रतिभाताई चितळे यांचा सत्संग संपूर्ण महाराष्ट्राला लाभला असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. यावर्षी महाराष्ट्रातील परिक्रमावासी जास्त आहेत त्यांचे बरेचसे श्रेय ताईंनाच जाते.
प्रत्येक कुटुंबाला अध्यात्माची बैठक असेल तर ते कुटूंब प्रगतीपथावर जाते. आपली मुले सर्वार्थाने पुढे जायची असतील तर ती कुणाच्या संगतीत वाढतात हे पाहणे महत्वाचे आहे. आपल्या मुलांना नेहमी " सत्संग " लाभेल याची काळजी घेऊया. महाराष्ट्राला पुढे न्यायचे असेल सौ. प्रतिभाताई चितळे सारख्या अनेक प्रतिभाताई तयार झाल्या पाहिजेत असे मला वाटते.
राजेंद्र पवार
९८५०७८११७८
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा