मंगळवार, १५ मार्च, २०२२

!! आमची नर्मदा परिक्रमा !! (१०९)१५ मार्च

 !! आमची नर्मदा परिक्रमा !! (१०९)१५ मार्च 

              आमचा कालचा मुक्काम गजानन आश्रम, आवली घाट येथे होता. येथील आश्रमातील सर्वच सेवेकरी अतिशय सेवाभावी वृत्तीचे दिसून आले. काल एकादशी होती, आज आमचा उपवास सोडण्यासाठी सकाळी सहा वाजताच स्वयंपाक तयार केला. इतकेच नव्हे तर आम्हाला सकाळी रस्ता दाखवण्यासाठी एक किलोमीटर अंतरावर चौघेजण आले. या सर्वांवर कळस म्हणजे त्यांनी आमच्या बॅगा ४२ किलोमीटर अंतरावर असणाऱ्या आश्रमात पोहोच केल्या. संध्याकाळच्या भोजनाचीही व्यवस्था केली. भोजन प्रसाद घेऊन येणाऱ्या गाडीत स्वतः उमानाथ महाराज आले होते. त्यांच्याबरोबर ब्रजमोहन, ललित मालवीय, राजू पालिवाल, सुनिल मालवीय आदी आले होते. सेवा कशी करावी याचा वस्तूपाठच त्यांनी आज आम्हास दिला. आज दुपारचा भोजन प्रसाद चांदगढ कुटी येथील परमहंस अद्वेत आश्रम येथे घेतला. येथील आश्रमस्थळी शिव मंदिराबरोबर गजाननाचे मंदिर आहे. आश्रम परिसर अतिशय भव्य आहे.  





               आज मार्गात ग्वाडी, घोघरा, पेथोडा, बाबरी, चांदगढकुटी, भिलाडीया, कुंडाकला, हमीदपूर, अर्चनागाव आदी गावे लागली. आज आमचा मुक्काम गोदागाव येथील  गंगेसरी मठात आहे. गोमती, गंजाली व नर्मदेचा येथे त्रिवेणी संगम आहे. येथील मठ सहाशे वर्षापूर्वीचा  जुना आहे. या मठाची रचना ऐतिहासिक आहे.

              या परिक्रमेत "नर्मदे हर " हा अभिवादनाचा परवलीचा शब्द आहे. परिक्रमावासीयांना  खूपच आदराने वागवले जाते. लहानापासून थोरापर्यंत प्रत्येकजण " नर्मदे हर " असे म्हणतात. काहीजण महात्मा म्हणतात, गुरुजी म्हणतात, महंत म्हणतात, बाबाजी म्हणतात, प्रभू म्हणतात. थोडक्यात सर्वजण आदर देतात. आपणही एकमेकाला आदराने बोलवले पाहिजे. आदर दिला पाहिजे. वारकरी संप्रदायात "राम कृष्ण हरी" हाही असाच परवलीचा शब्द आहे. राम कृष्ण हरी उच्चारात देखील बरेच सामर्थ्य आहे. आपण बोलताना नमस्कार, जयहिंद, नमस्ते हेही अभिवादनाचे प्रकार वापरतो हेही चांगले आहेच. आपण "राम कृष्ण हरी " या अभिवादनाचा अधिकाधिक वापर करुया. आपण संभाषण करताना नेहमीच एकमेकास आदराने  वागवले पाहिजे. लहानपणीच अभिवादन करण्याची पध्दती अंगिकारली तर भविष्यात निश्चितच कमी अडचणी येणार यात शंका नाही.

           चला तर आपण लोकांना आदर देऊया. इंग्रजीत "Give respect, Take respect" असे म्हटले जाते. आपणास इतरांनी आदराने वागवावेसे वाटेत असेल तर आपणही इतरांनाआदर द्यायला शिकले पाहिजे असे वाटते.

    राजेंद्र पवार

 ९८५०७८११७८

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

!!ग्रीन पुणे मान्सून हिल मॅरेथॉन२०२५ !!

 !!ग्रीन पुणे मान्सून हिल मॅरेथॉन२०२५ !!              आज रविवार दिनांक १३ जुलै २०२५ रोजी पुणे येथे" ग्रीन पुणे मान्सून हील मॅरेथॉनचे ...