रविवार, १३ मार्च, २०२२

!! आमची नर्मदा परिक्रमा !! (१०७)१३ मार्च

 !! आमची नर्मदा परिक्रमा !! (१०७)१३ मार्च 

            आमचा कालचा मुक्काम होशंगाबाद जिल्ह्यातील सुरज कुंड येथे होता. सुरज कुंड येथे दर रविवारी स्नानासाठी प्रचंड गर्दी असते, आजही ती गर्दी आम्हास जाणवली. येथील आश्रमात सूर्यनारायण, नर्मदा माता, राधाकृष्ण या मूर्ती आहेत. आज सकाळी लवकर चालण्यास सुरुवात केली.लवकरच  बांद्राभान येथील आश्रमात पोहोचलो. बांद्राभान येथे नर्मदा व तवा नदीचा संगम आहे. बहुतांशी वेळा आम्ही संगमस्नान केलेलेच आहे, आजही संगम स्नानाचा आनंद लुटला.

             येथील आश्रमातच दुपारचा भोजन प्रसाद घेतला. या आश्रम परिसरात एक साधू दररोज एक ते तीन या वेळात अनुष्ठान करत असतात. या साधूंनी आपल्यासमोर होम पेटवलेला होता. त्यामध्ये आहुती टाकत होते ,काही वेळाने संपूर्ण शरीराभोवती होमामधील अग्नी गोलाकार ठेवला त्याचबरोबर एका पात्रात डोक्यावर घेतला. अशा उन्हात पाचदहा मिनिटे थांबणे अवघड आहे आणि असे साधू दोन दोन तास अनुष्ठान करत असतात हे निश्चितच असामान्य आहे. आज आम्हाला  हौशंगाबाद  शहरात मनमोहन केवट यांनी ऊसाचा रस दिला, सामान्य माणसे देखील कसे आदरातिथ्य करतात याचा प्रत्यक्ष अनुभव आला. आदरातिथ्य तर लोक करतातच शिवाय वर दक्षिणाही देतात.





            आज वाटेत गुढली, शुक्करवाडा, गोरा,सांगाखेडा,बांद्राभान,धनबाड अशी महत्वाची गावे लागली. मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या सरकारने हौशंगाबाद शहराचे नाव बदलले असून ते "नर्मदापुरम" असे केले आहे. बदललेल्या नावाचे फलक शहरात दिसू लागले आहेत. आज आमचा मुक्काम लोकनाथतीर्थ स्वामी महाराज आश्रम हौशंगाबाद येथे आहे. हा आश्रम महाराष्ट्रीयन आश्रम म्हणूनच ओळखला जातो.

            हौशंगाबाद येथे अनेक घाट आहेत परंतु येथील सेठानी घाट खूपच  मोठा, प्रमुख आणि प्रसिध्द असा आहे. सेठानी घाटाच्या आजूबाजूस अनेक प्राचीन मंदिरे आहेत. या घाटावर महिलांसह लहानथोर स्नानाचा आनंद घेतात. येथे सांयकाळी अनेक लोक फिरायला येतात.या घाटावर नर्मदाजीचे, शंकराचे, हनुमानाचे व राधाकृष्णाचे तसेच गायत्री शक्तीपीठ मंदिर आहे. याशिवाय पर्यटन घाट, कोरी घाट, मंगलवाडा घाट, गोल घाट, नर्मदा घाट असे अनेक घाट आहेत.



          अशा तीर्थक्षेत्रांना, पर्यटन स्थळांना आपण भेटी द्यायला हव्यात, तेथील माहिती जाणून घ्यायला हवी असे मला वाटते.

    राजेंद्र पवार 

 ९८५०७८११७८

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

!!ग्रीन पुणे मान्सून हिल मॅरेथॉन२०२५ !!

 !!ग्रीन पुणे मान्सून हिल मॅरेथॉन२०२५ !!              आज रविवार दिनांक १३ जुलै २०२५ रोजी पुणे येथे" ग्रीन पुणे मान्सून हील मॅरेथॉनचे ...