रविवार, १३ मार्च, २०२२

!! आमची नर्मदा परिक्रमा !!(१०६ ) १२ मार्च

 !! आमची नर्मदा परिक्रमा !!(१०६ ) १२ मार्च 

       आमचा कालचा मुक्काम परमहंस आश्रम सांगाखेडा येथे होता.आजचा बराचसा रस्ता चांगला असल्याने चालताना कोणताही त्रास जाणवला नाही.आज वाटेत मारा, सर्रा, बछवाडा, नशिराबाद, गणेरा, नगवाडा, बागलखेडी, बिकोरा, घानसी ही महत्वाची गावे लागली.

       आमचा आजचा मुक्काम हौशंगाबाद जिल्ह्यातील सुरज कुंड येथे आहे. पश्चिम वाहिनी असणारी नर्मदा मैय्या  येथे पूर्णपणे उत्तरवाहिनी झालेली आहे.या ठिकाणचे दृश्य खूपच विलोभनीय आहे. याठिकाणी भारतीय पुरातत्व खात्याला राक्षसांच्या अस्थी सापडल्याचे सांगितले गेले. हे कुंड मध्यप्रदेश सरकारने पर्यटन स्थळ म्हणून विकसित केले आहे.







      आज नगवाडा नावाच्या गावात राजू मीना यांनी ताक प्यायला दिले. उन्हात ताक प्यायला मिळणे ही आम्हाला मेजवानीच वाटते. आज दुपारचा भोजन प्रसाद घेण्यासाठी बिकौर गावातील ग्रामपंचायत कार्यालयात थांबलो होतो. आपण येथेच थांबा, मी जेवण घेऊन येतो असे सांगून मुकेश नावाचा माणूस गेला तो काही परत आमच्या भेटीस आलाच नाही. आम्ही वाट पाहून शेजारीच असणाऱ्या प्राथमिक शाळेतून माध्यान्ह भोजन आहारातील भोजन मागून घेतले आणि आमची गरज भागवली, असे वेगवेगळे अनुभव  परिक्रमेत येत असतात. आज बरेचसे चालणे बर्गी डाव्या कॅनॉलने झाले. कॅनॉलला नियमित पाणी येत असावे असे स्पष्टपणे दिसून येते. बऱ्याच ठिकाणी पाटातील पाणी घेण्यासाठी कायमच्या पाईप टाकलेल्या दिसल्या.  पाण्याचे योग्य वितरण होण्यासाठी हे काही योग्य वाटले नाही. थोडक्यात येथे पाण्याचे योग्य वितरण होत नसावे त्याचा परिणाम म्हणून लोकांनी विंधन विहिरी घेतलेल्या आहेत. 

      प्रत्येक शासकीय योजना अगदी सामान्यातील सामान्य माणसाचा आर्थिक स्तर उंचावण्यासाठी असते. सर्व योजना चांगल्याच असतात पण त्याची अंमलबजावणी योग्य होत नसेल तर त्याचा लाभ सामान्यांना होत नाही.  सामान्य जनतेला शासकीय योजनेचा लाभ  कसा होईल यासाठी आपण प्रयत्नशील असायला हवे असे मला वाटते.

     राजेंद्र पवार 

   ९८५०७८११७८

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

!!ग्रीन पुणे मान्सून हिल मॅरेथॉन२०२५ !!

 !!ग्रीन पुणे मान्सून हिल मॅरेथॉन२०२५ !!              आज रविवार दिनांक १३ जुलै २०२५ रोजी पुणे येथे" ग्रीन पुणे मान्सून हील मॅरेथॉनचे ...