शुक्रवार, १८ मार्च, २०२२

!! आमची नर्मदा परिक्रमा !!(११२ ) १८ मार्च २०२२

 !! आमची नर्मदा परिक्रमा !!(११२ ) १८ मार्च २०२२ 

         आमचा कालचा मुक्काम हरदा जिल्ह्यातील पाचातलाई येथील आश्रमात होता. आम्ही सकाळी लवकरच निघालो. सुरुवातीला रस्ता चुकायला नको म्हणून भजनलाल बिष्णोई यांचे चिरंजीव अनिकेत रस्ता दाखवण्यासाठी दोन किलोमीटरपर्यंत पुढे आले. अनिकेत बी एस्सी. ऍग्रिचे विद्यार्थी आहेत. आम्ही थोडे अंतर गेल्यानंतर पुन्हा जंगल रस्ता आला. जंगल पायवाटेने जाताना अनेकदा वाट चुकण्याची शक्यता जास्त असते मात्र आम्ही सुरक्षितपणे देवपूरपर्यंत आलो. देवपूर गावात महेश विश्वकर्मा यांच्या घरी होळी ही साजरी केली. उन्हाचा तडाखा जबरदस्त वाढला असल्याने नऊच्या पुढे चालणे अतिशय कठीण होत आहे. दुपारी तीन तास तरी सक्तीची विश्रांती घ्यावीच लागते.





  आज खिडकियाच्या मार्गावर चालत असताना शरद तापडिया यांची भेट झाली. त्यांनी होळीच्या शुभेच्छा तर  दिल्याच शिवाय भोजन प्रसादासाठी घरी येण्याचा आग्रह केला. आम्ही त्यांच्या घरी दुपारचा भोजन प्रसाद घेतला. शरद तापडिया यांची मधुरवाणी सर्वांनाच मोहित करणारी आहे. ते मारवाडी असल्याने व्यवसायात आहेत.  व्यवसायात मधुरवाणीच गरजेची असते त्या वाणीने आम्हीही मोहित झालो.आज वाटेत बाबर, देवपूर, नागावा, पाहनपाट, चौकडी, खिडकिया, पोखरणी ही महत्वाची गावे लागली. आज आमचा मुक्काम खंडवा जिल्ह्यातील दगडखेडा गावातील दुर्गामाता मंदिरात आहे. या मंदिरात मुक्कामासाठी नाशिक जिल्ह्यातील चांदवडची सावता माळी यात्रा कंपनीची बस आलेली आहे. त्यांनी आमच्या संध्याकाळच्या भोजनाची व्यवस्था केली आहे.




    शेतीच्या दृष्टीने विचार केला तर हा भाग जास्त प्रगत वाटतो. इकडे शेतीही दरडोई जास्त आहे. आर्थिक विषमता मात्र खूप जाणवते. एकीकडे श्रीमंत जमीनदारांचा वर्ग तर दुसरीकडे मजूरवर्ग दिसून येतो. सध्या गहू कापणीचे काम जोरात सुरु आहे. सर्वत्र मशीनच्या साह्यानेच कापणी होताना दिसून येते. रस्त्यांनी मशीनची येजा होताना दिसत आहे. वेगवेगळ्या क्षमतेच्या मशीन दिसून येतात. मशीनच्या पाठीमागे गहू नेण्यासाठी ट्रेलर उभाच असतो. या परिसरात चारशेपाचशे क्विंटलपर्यंत गहू, दोनतीनशे क्विंटलपर्यंत हरभरा होणारे शेतकरी भरपूर आहेत. याठिकाणी गहू वाळवणे हा प्रकार कोठेच दिसत नाही. मुबलक प्रमाणात पाण्याची उपलब्धता, जमिनीची सुपीकता, साठवण्याची चांगल्या सोयी याचा फायदा शेतकऱ्यांना होताना दिसत आहे. या परिसरात कृषी यांत्रिकीकरण  मोठ्या प्रमाणात झालेले आहे. कृषी अवजारे घेण्यासाठी मोठया प्रमाणात अनुदान उपलब्ध करुन दिले आहे. काही शेतकऱ्यांना १००% अनुदानावर ट्रेलर मिळाले आहेत.


      

        आपल्या परिसरात ऊस शेती भरपूर आहे. ऊसासाठी लहान मोठ्या क्षमतेच्या हार्वेस्टिंग मशीन अनुदानावर उपलब्ध झाल्या पाहिजेत. इतर शेतीसाठी लहान मोठ्या क्षमतेची अवजारे उपलब्ध झाली पाहिजेत. सध्या कृषी यांत्रिकीकरणासाठी अनुदान उपलब्ध आहे. या अनुदानाचा लाभ अधिकाधिक शेतकऱ्यांना व्हायला हवा असे वाटते.

     राजेंद्र पवार 

९८५०७८११७८

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

!!ग्रीन पुणे मान्सून हिल मॅरेथॉन२०२५ !!

 !!ग्रीन पुणे मान्सून हिल मॅरेथॉन२०२५ !!              आज रविवार दिनांक १३ जुलै २०२५ रोजी पुणे येथे" ग्रीन पुणे मान्सून हील मॅरेथॉनचे ...