सोमवार, ३१ जानेवारी, २०२२

!! आमची नर्मदा परिक्रमा !!(५२ )बर्फानी बाबा यांचे दर्शन

!! आमची नर्मदा परिक्रमा !!(५२ )बर्फानी बाबा यांचे दर्शन

   आमचा कालचा मुक्काम खरगोन जिल्ह्यातील धारेश्वर येथे होता. रस्ता पायवाटेचा असल्याने सकाळी उशिरा चालण्यास सुरुवात केली.आज वाटेत गंगाखेडी,सेमलदा, विमलेश्वर,मेहता खेडी ही गावे लागली. आज आमचा मुक्काम श्री श्रीराम महाराज संस्थान,नावघाट खेडी(बडवाह) येथे आहे. खेडीघाट येथे नव्याने  श्रीराम महाराजांच्या समाधी मंदिराचे बांधकाम चालू आहे.







              आज दुपारी बर्फानी बाबा यांचे दर्शन झाले. परिक्रमेत बर्फानी बाबांच्याबाबत खूप ऐकले होते. त्यांनी शिर्डीच्या साईबाबा समवेत दोन वर्षे साधनेत घालवली होती. साईबाबा आपल्यातून निघून गेलेल्याला सव्वाशे वर्षाचा कालावधी लोटला आहे. आपणच कल्पना करा बाबांचे वय किती असेल ते?

             आता बाबांनी आपले उत्तराधिकारी नेमले आहेत. थोडक्यात बाबांनी आपली निर्गमनाची तयारी केली आहे. त्यांच्याबरोबर  अध्यात्माची चर्चा झाली. आपला भारत देश महान आहे. इतर देशांनी जरी भौतिक प्रगती केली असली तरी आध्यात्मिक प्रगतीत आपण पुढे असल्याने त्यांना आपलेच विचार अंगिकरावे लागतील ही वस्तूस्थिती आहे. माझ्या पश्चात हे स्थळ शिर्डीसारखे होईल असेही ते म्हणाले. एका सिध्दपुरुषाचे आज दर्शन झाले त्यामुळे आम्ही कृतकृत्य झालो असे वाटते.

            आज संध्याकाळी सदगुरु श्री श्रीराम महाराज यांच्या सुविध्य पत्नी जानकीदेवी (आईसाहेब) यांचे दर्शन झाले. श्रीराम महाराज श्री ब्रम्हचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचे अनुयायी होत. ते मूळचे आपल्याच जिल्ह्यातील फलटणचे, सुरुवातीचा काळ आपल्या सातारा जिल्ह्यात गेला होता. त्यांचे सर्व शिक्षण महाराष्ट्रातच झाले होते. सुरुवातीला ते नाशिकजवळ तपोवनातील एका शेतात साधना करत होते. त्यांनी तीन वेळा नर्मदा परिक्रमा केली होती. १९८३ ला ते नर्मदातिरी आले व जपसाधना पूर्ण केली.

           महाराजांनी आपल्या हयातीत प्रभू रामचंद्र, ब्रम्हचैतन्येश्वर महादेव,गोंदवलेकर महाराज, हनुमंत आदींच्या मूर्तींची स्थापना केली होती. चार वर्षांपूर्वी कर्नाटकातून गोंदवले येथे येत असताना त्यांचा मायणीजवळ अपघात झाला. त्यांना सातारा येथे दवाखान्यात आणत असताना त्रिपुटीजवळ"राम" म्हणून त्यांनी प्राण सोडला. त्रिपुटी येथे समाधीस्थळ बांधण्याचा मानस आईसाहेब यांनी बोलून दाखवला. आमच्याबरोबर परिक्रमेत असणारे बीडचे पुंडलिक पाखरे यांनी महाराजांच्या समवेत  ४० वर्षांपूर्वी काही काळ घालवला होता. त्या सर्व गोष्टींना आज उजाळा मिळाला. आज आईसाहेब यांनी पाखरेमाऊलींची मुलाखतही घेतली.

      आज सत्संगाने माणूस कसा घडतो याची प्रत्यक्ष अनुभूती आली. प्रत्येकाने आपल्याला सत्संग कसा लाभेल यासाठी जाणिपूर्वक प्रयत्न करायला हवेत असे वाटते.

    राजेंद्र पवार 

    ९८५०७८११७८

  #shivaputri #narmada #narmadaparikrama #narmadariver #नर्मदापरिक्रमा #satara #satarakar

रविवार, ३० जानेवारी, २०२२

!! आमची नर्मदा परिक्रमा !! (५१)

 

!! आमची नर्मदा परिक्रमा !! (५१) दगडात नैसर्गिकरित्या हजारो शिवलिंग कोरली गेली आहेत

            आमचा कालचा मुक्काम खरगोन जिल्ह्यातील सुलगाव येथे होता. हा आश्रम अगदीच नदीकाठी वृक्षराजीने वेढला होता. सकाळी लवकरच आम्ही मार्गस्थ झालो. सुलगाव,पथराड,बहेगाव,कवडिया या सर्वच ठिकाणी थोडा थोडा अल्पोपहार घ्यावा लागला. आजचा सर्व मार्ग पायवाटेचा होता. काटेरी झुडुपे, डगरट यामधून बराचसा रस्ता होता.शेतीच्या दृष्टीने हा भाग प्रगतच आहे. येथे शतप्रतिशत बागायत आहे. पन्नासपन्नास एकरात बांध दिसत नाही. गहू, हरभरा, लसूण तसेच भाजीपाला पिके मोठ्या प्रमाणात दिसत होती. आपल्या भागात लसूण लावला जातो तर येथे तो पेरला जातो.






            आम्ही बहेगावला अल्पोपहार घेण्यासाठी थांबलो होतो. वेळ साडेदहाची होती. आमच्या अगोदर महाराष्ट्रातील आळंदीचे चंद्रकांत थोरवे तेथे थोडा वेळ थांबून पुढे गेले होते मात्र त्यांचे छोटे आसन (बैठकीचे साहित्य) ते  विसरले होते. कोणाचे तरी आसन विसरले आहे ते देण्यासाठी गणेश केवट(नावाडी )एक किलोमीटर मोटारसायकलने आले. गणेश केवट सकाळपासून येणाऱ्या परिक्रमावासीयांना चहापान करत असतात. जर कोणाला जेवण करायचे असेल तर त्यांना सदाव्रत(भोजनाचे साहित्य) देतात.आम्ही दुपारचे भोजन पिटामली या गावात घेतले. थोडी विश्रांती घेऊन पुढील मार्गक्रमण केले.

           धारेश्वरच्या एक किलोमीटर पाठीमागे दगडात नैसर्गिकरित्या हजारो शिवलिंग कोरली गेली आहेत तीही पाहण्याची संधी मिळाली. आज आम्ही धारेश्वर येथे मुक्कामाला थांबलो आहे. या स्थानाला सुरुवातीला दारुकेश्वर महादेव असे म्हटले जात होते. याठिकाणी भगवान शंकर यांची अर्धनारी नटेश्वर मूर्ती तसेच शिवलिंग आहे.भगवान श्रीकृष्णाचे सारथी दारुक याने शिवलिंगाची प्रतिष्ठापना केली होती. थोडासा अपभ्रंश होऊन सध्या धारेश्वर महादेव या नावाने हे मंदिर ओळखले जाते. उत्तर तटावरील हे प्रसिध्द स्थान आहे. 

           आज सकाळची कृती मनाला खूपच भावली. एक छोटीसी वस्तू देण्यासाठी गणेश केवट एक किलोमीटर गाडीवर येतात, ही वस्तू तुमची विसरली आहे असे म्हणतात, यावरुन ते परिक्रमावासीयांची किती काळजी घेतात, त्यांच्याप्रती असणारी त्यांची भावना व्यक्त होते. आपणही आपल्याकडे चुकून एखाद्याची वस्तू राहिली किंवा सापडली तर संबंधित व्यक्तीचा शोध घेऊन त्याला परत दिली पाहिजे असे प्रकर्षाने वाटते.

     राजेंद्र पवार

  ९८५०७८११७८

#shivaputri #narmada #narmadaparikrama #narmadariver #नर्मदापरिक्रमा #satara #satarakar

!! आमची नर्मदा परिक्रमा !! (५०)

 !! आमची नर्मदा परिक्रमा !! (५०) अतिशय दानशूर, कर्तृत्ववान, धर्मपरायण व कार्यक्षम राज्यकर्ती म्हणून अहिल्याबाई होळकर

                आमचा कालचा मुक्काम महेश्वर येथील सप्तमातृका मंदिराच्या आश्रमात होता. आज नर्मदा नदीवर स्नानाचा आनंद लुटला. काल बराचसा भाग पहायचा राहिला होता. राजराजेश्वर प्राचीन हनुमान मंदिर, मातंगेश्वर महादेव, गुप्तेश्वर महादेव, दत्त मंदिर अशी अनेक मंदिरे महेश्वरमध्ये आहेत. महेश्वर म्हटले की अहिल्याबाई होळकर यांचे नाव प्रथम घेतले जाते. आज त्यांचा राजवाडा पाहिला, त्या वापरत असलेल्या वस्तू, शस्त्रे पाहता आली. रोज येथे शिवलिंगे बनवली जातात.









   अहिल्याबाई होळकर यांची माहिती तुम्हाला दिलीच पाहिजे.....

अहिल्याबाई होळकर

जन्म:३१ मे १७२५ मृत्यू:१३ ऑगस्ट १७९५. एक अतिशय दानशूर, कर्तृत्ववान, धर्मपरायण व कार्यक्षम राज्यकर्ती म्हणून अहिल्याबाई होळकर हे नाव मराठ्यांच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिले गेले आहे. त्यांचा जन्म चौंडी या छोट्याशा गावात जिल्हा अहमदनगर येथे झाला.  धनगर समाजात जन्मलेल्या अहिल्याबाईंचे लग्न वयाच्या आठव्या वर्षी सुभेदार मल्हारराव होळकर यांच्या मुलाशी, खंडेरावांशी झाले.

                 मल्हारराव होळकर यांचा आपल्या सूनबाईंवर  मोठा विश्वास होता, खूप महत्त्वाचा पत्रव्यवहार ते अहिल्याबाईंवरच सोपवीत असत. खंडेरावांपासून त्यांना दोन अपत्ये झाली. मालेराव हा मुलगा आणि मुक्ताबाई ही कन्या. अहिल्याबाईंना वयाच्या अठ्ठाविसाव्या वर्षी वैधव्याला सामोरे जावे लागले. पती खंडेराव कुंभेरी येथे लढाईत मरण पावले. त्यावेळच्या प्रथेप्रमाणे त्या सती जायला निघाल्या. पण सासरे म्हणाले, “प्रजाहितासाठी तरी तुम्ही सती जाऊ नये. हे राज्य सांभाळायचे आहे.”

          आपल्या सासऱ्यांच्या इच्छेचा अहिल्याबाई होळकरांनी मान राखला आणि सती न जाता राज्यकारभारावर आपले लक्ष केंद्रित केले. मल्हारराव ज्यावेळी मोहिमेवर असत, तेव्हा स्वतः अहिल्याबाई राज्याचा बंदोबस्त चोख राखीत असत. मल्हाररावांच्या सल्ल्यानुसार वागत असत.

          मल्हारराव होळकरांना पेशव्यांनी इंदूर संस्थानची जहागीर दिली होती. दौलतीचा कारभार मोठा होता. पण १७६६ मध्ये त्यांचे निधन झाले आणि अहिल्याबाईंवर फार मोठी जबाबदारी येऊन पडली. त्यांचा पुत्र मालेराव यांना जरी सुभेदारीची वस्त्रे मिळाली, तरी ती सांभाळण्याची त्यांच्यात कुवत नव्हती. लवकरच त्यांचे देहावसान झाले. अहिल्याबाई आता खऱ्या अर्थाने राज्यकर्ती झाल्या. पुढील अठ्ठावीस वर्षे त्यांनी राज्यकारभाराचा गाडा सैन्याच्या सहकार्याने अतिशय कुशलपणे चालविला. तिजोरीत भर घालीत त्यांनी प्रजाहिताकडे जाणीवपूर्वक लक्ष दिले.

          अहिल्याबाई होळकर हे नाव मराठ्यांच्या इतिहासात अमर झाले. त्याला त्यांची धर्मपरायण आणि उदारवृत्ती कारणीभूत ठरली. बाई काय राज्य कारभार करणार  ही दरबारी मंडळींची अटकळ त्यांनी सपशेल खोटी ठरविली. अशी शंका घेणाऱ्यात त्यांचा जुना दिवाण गंगाधर यशवंत चंद्रचूड उर्फ गंगोबा तात्या हा प्रमुख होता. राघोबादादांशी त्यांनी अहिल्याबाईंविरुद्ध संधान बांधले आणि इंदूर बळकावण्यासाठी त्यांना प्रोत्साहित केले.

          अहिल्याबाईंना हे कळले तेव्हा त्या युद्धास तयार असल्याचे त्यांनी राघोबादादास कळविले. राघोबांना ते अडचणीचे झाले. हरलो तर बाईकडून हरलो आणि जिंकलो तरी बाईशी युद्ध करण्यात कोणती मोठी मर्दुमकी  शेवटी राघोबांना माघार घ्यावी लागली. त्यांचा उत्तम पाहुणचार अहिल्याबाईंनी इंदुरात केला. अशा रीतीने बाईंच्या लौकिकात आणखीच भर पडली.

          अहिल्याबाईंच्या आयुष्यातील एक अविस्मरणीय घटना त्यांचा लौकीक वाढविणारी आहे. आपली कन्या मुक्ताबाई हिचे स्वयंवर घोषित करताना त्यांनी जाहीर केले की, जो कोणी चोर, लुटारु, दरोडेखोर यांचा राज्यात बंदोबस्त करील, त्या शूर व्यक्तीशी मुक्ताबाईचा विवाह लाविला जाईल. त्यावेळी जातपात बघितली जाणार नाही. हा अलौलिक विचार जाहीर करून त्या थांबल्या नाहीत, तर त्यांनी कृतीही तशीच केली. यशवंतराव फणसे या गुणी, शूर तरुणाशी त्यांनी मुलीचा विवाह करून दिला.

          अहिल्याबाई एक चाणाक्ष आणि सुधारणावादी राज्यकर्ती होत्या. सन१७७२ मध्ये अहिल्याबाईंनी राजधानी इंदूरहून नर्मदातीरी महेश्‍वरला हलविली. तिथे अनेक वास्तू बांधल्या. राजवाड्यात प्रशस्त देवघर होते. नदीला घाट बांधले. मंदिरांचा जीर्णोद्धार केला व पूर्वजांच्या स्मरणार्थ छत्र्या बांधल्या. महेश्‍वर हे विणकरांचे मध्यवर्ती केंद्र होते. बाईंनी वस्त्रोद्योगास उत्तेजन दिले, कोष्ट्यांची वसाहत स्थापन केली आणि उत्तम हातमाग पेठ तयार केली. त्यांचा मूळ स्वभाव सौम्य असला, तरी राज्यकारभारात त्यांनी मनरूपसिंगसारख्या कुविख्यात डाकूला फाशी दिली. 

          त्यांच्या धर्मपरायणतेला प्रांत मर्यादा नव्हती. त्यामुळे त्यांचे नाव आसेतू हिमाचल घेतले जाते. त्यांनी अन्नछत्रे उघडली, राज्यातून विहिरी खोदून त्या चिरेबंद बांधून दिल्या. उन्हाळ्यात राज्यातून प्रवास करणाऱ्यांसाठी पाणपोया, धर्मशाळा बांधल्या. जनावरांसाठी डोण्या बांधून घेतल्या. पशुपक्ष्यांसाठी रुग्णोपचारांची व्यवस्था केली. सर्पदंशावर लगोलग उपचार व्हावेत म्हणून हकीम-वैद्य नेमले. स्त्रियांना सुरक्षित स्नानासाठी, कपडे बदलण्यासाठी बंदिस्त ओवऱ्या ठेवल्या. मुंग्यांना साखर आणि जलचरांना कणकेच्या गोळ्या खाऊ घालण्यापर्यंत त्यांचा दानधर्म सढळ होता. गोरगरिबांना सणासुदीला त्या अन्नदान करीत, कपडे वाटत, थंडीच्या दिवसात घोंगड्या वाटल्या जात. 

              अहिल्याबाईंनी प्रमुख तीर्थक्षेत्री विशेषतः अयोध्या, नाशिक, द्वारका, पुष्कर, हृषीकेश, जेजुरी, पंढरपूर, गया, उदेपूर, चौंढी येथे मंदिरे बांधली. यांशिवाय सोरटी सोमनाथ, ओंकारेश्वर,मल्लिकार्जुन, औंढानागनाथ, काशीविश्वेश्वर, विष्णुपाद, महाकाळेश्वर आदी मंदिरांचा जीर्णोद्धार केला.वाराणसी, प्रयाग, पुणतांबे, चौंढी, नाशिक, जांब (इंदूर), त्र्यंबकेश्वर येथे नदीला विस्तीर्ण घाट बांधले.

          अखेरच्या दिवसांत त्यांना दुःख आणि संघर्षाला तोंड द्यावे लागले. त्यांचे दोन भाऊ वारले. मुलीचा मुलगा नाथ्याबा१७९०मध्ये ऐन तारुण्यात गेला . त्यानंतर जावई यशवंतराव फणसे अचानक गेले आणि मुक्ताबाई सती गेली. अशा बिकट परिस्थितीत शिंद्यांचा सरदार गोपाळराव याने १७९२ मध्ये होळकरांच्या फौजेवर हल्ला केला. तेव्हा तरुणासही लाजवील अशा तडफदारीने त्यांनी शिंद्यांचा पराभव केला. त्यांच्या राज्यात सुबत्ता, संपन्नता व शांती होती. त्या अजातशत्रू होत्या; पण राज्यावर गुदरलेल्या संकटांना त्यांनी चोख उत्तर दिले. मध्यम उंचीची, सावळ्या वर्णाची, डोईवर पदर घेतलेली ही स्त्रीकर्तृत्व आणि विचार या दोन्ही दृष्टींनी केवढ्या उंचीची होती, हे त्यांचे आयुष्यच सांगते. महेश्वर येथे वृद्धापकाळाने त्यांचे निधन झाले.

       आज दुपारी मंडलेश्वर येथे आलो.तेथे गोंदवलेकर महाराज्यांच्या शिष्याने राम मंदिर बांधले आहे. ते अतिशय सुंदर आहे. वासुदेवानंद महाराज (टेम्बे स्वामी ) यांची कुटी पाहिली.आजचा मुक्काम नर्मदातिरी सुलगावला आहे. याठिकाणी थंडी भरपूर आहे.

       अहिल्याबाई होळकर या अतिशय पुरोगामी विचारांच्या होत्या. एक महिला असूनदेखील अतिशय उत्कृष्ट राज्यकर्ती म्हणून नाव कमावले. सासर्यांनी त्यांच्यावर विश्वास दाखविला. सती जाण्यापासून परावृत्त केले. जर महिलांना संधी उपलब्ध करुन दिली तर त्या नाव कमावतात. आपणही महिलांना विविध क्षेत्रात संधी उपलब्ध करुन दिल्या पाहिजेत असे  मला वाटते.

     राजेंद्र पवार 

९८५०७८११७८


  #shivaputri #narmada #narmadaparikrama #narmadariver #नर्मदापरिक्रमा  #satara #satarakar 

!! आमची नर्मदा परिक्रमा !! (४९ )

 

!! आमची नर्मदा परिक्रमा !! (४९ )

         आमचा कालचा मुक्काम धामनोद येथील अलबेला हनुमान मंदिराच्या आश्रमात  होता. आश्रमातील व्यवस्था चांगली होती. या मंदिरात अखंड ज्योत प्रज्वलित असते. सकाळी आम्हाला जलकोटी येथील सहस्त्रधारा पाहायला जायचे होते. आम्ही राजमार्ग सोडून मधल्यामार्गाने जायचा निर्णय घेतला. महेश्वर गावात गोपाल रेस्टॉरंट मध्ये दूध,त्याच गावात विविध ठिकाणी दक्षिणा दिली जात होती.जलकोटा नावाच्या गावात तर आमचे जोरदार स्वागत झाले. घरोघरी आम्हास चहापाणास बोलवत होते. दोन घरात आम्ही थांबलो होतो. त्यापैकी शिवराम चाकरे व कामिनी मंडलोई यांचा खास उल्लेख करावा लागेल. शिवराम चाकरे हे ब्रह्माकुमारीज (माऊंट अबूशी ) निगडित आहेत. अतिशय प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी मुलाला शिकवले. ते आता पोलीस खात्यात अधिकारी आहेत.त्या कुटुंबातील विनम्रता खूप शिकवून गेली. कामिनी मंडलोईला आम्ही रस्ता विचारत होतो तिने आम्हाला प्रथम घरी बोलवले, दूध दिलं, जिलेबी दिली शिवाय दक्षिणा दिली.











            खरी कसरत हे गाव सोडल्यानंतर झाली. आमचा मार्ग चुकला, रस्त्यात भरकटलो.आज सण असल्याने शेतात कोणीही नव्हते. अनेक वेळा नर्मदे हर अशी गर्जना करुनदेखील लवकर कोणाचीच मदत मिळाली नाही. शेवटी दीपक पटेल यांचे सहकार्य झाले आणि एकदाचे दत्तधाम आश्रमात पोहोचलो.

            नारायणपुरच्या महाराजांनी जलकोटी ( महेश्वर) येथे आश्रम बनवला आहे. आश्रमाचा परिसर खूपच मोठा  आहे. त्याठिकाणीच दुपारचा भोजनप्रसाद घेतला. जवळच सहस्त्रधारा हे ठिकाण आहे. खडकातून नदी वाहत असल्याने फार मोठा आवाज येथे होतो. याठिकाणी पर्यटकांची खूप गर्दी होती.जलकोटी ते महेश्वर हे अंतर ५ किलोमीटरचे आहे. वाटेत आम्हाला चार मोटेची प्राचीन विहीर पाहता आली.

    आज आम्ही सप्तमातृका मंदिराच्या आश्रमात थांबलो आहे. संध्याकाळी नर्मदा स्नान करून शहरात फेरफटका मारला. महेश्वर हे प्राचीन शहर आहे. अहिल्याबाई होळकर यांचे काम याठिकाणी खूपच मोठे आहे. येथील घाट, राजवाडा, मंदिरे खूपच कलाकुसरीची आहेत.दगडावरचे कोरीव काम आपलं लक्ष वेधून घेतात. हे शहर हातमागासाठी प्रसिद्ध आहे. घरोघरी हातमाग दिसत आहेत. महेश्वरी साड्या आपल्या भागात खूपच प्रसिध्द आहेत.


     आज महेश्वर फारसे फिरुन बघता आले नाही. राहिलेला भाग उद्या पाहणार आहोत. आज जलकोटा येथील प्रसंग मनाला खूपच भावला. आदरातिथ्य काय असते ते आम्ही चांगले अनुभवले. घरात चांगले संस्कार असतील तर मुलं कशी संस्कारक्षम घडतात हे जवळून पाहिले. आम्ही घरातून बाहेर पडताना कामिनीच्या घरातील सर्व सदस्य निरोप देण्यासाठी बाहेर आले होते. त्याघरी केवळ त्या मुलीमुळे गेलो होतो. सुसंस्कारित मुले घडण्यासाठी पालकांनी जाणीवपूर्वक प्रयत्न करणे गरजेचे आहे असे मला वाटते.

     राजेंद्र पवार 

    ९८५०७८११७८


  #shivaputri #narmada #narmadaparikrama #narmadariver #नर्मदापरिक्रमा  #satara #satarakar

शुक्रवार, २८ जानेवारी, २०२२

!! आमची नर्मदा परिक्रमा !! (४८ )

!! आमची नर्मदा परिक्रमा !! (४८ )

   आमचा कालचा मुक्काम धार जिल्ह्यातील मांडव या ऐतिहासिक गावी होता. थंड हवेचे ठिकाण म्हणूनच हे गाव प्रसिद्ध आहे. अतिशय कडाक्याच्या थंडीलाआम्हाला सामोरे जावे लागले. सकाळी साडेनऊ वाजेपर्यंत रस्त्याच्या कडेला शेकोटी पेटवलेल्या दिसत होत्या. आम्ही सकाळी लवकरच रेवा कुंड येथे आलो. याठिकाणी आरती करुन राणी रूपमती महाल दुरुनच पाहून मार्गस्थ झालो. 








रेवा कुंड व राणी रुपमती महालाविषयी माहिती......

रेवा कुंड - रेवा कुंड हे सम्राट बाज बहादूर यांनी त्यांच्या प्रिय राणी रुपमतीच्या राजवाड्यात पुरेसा पाण्याचा स्त्रोत निर्माण व्हावा म्हणून बांधले होते.

राणी रुपमती महाल - समुद्र सपाटीपासून ३६५ मीटर उंचीवर वसलेला हा राजवाडा बाज बहादूरने राणी रुपमतीसाठी बांधला होता. यासह मांडूच्या सुरक्षा व्यवस्थेवर लक्ष ठेवण्यासाठी सैनिकांसाठी हे एक चांगले ठिकाण म्हणूनदेखील वापरले गेले. असे म्हणतात की राणी रुपमती सकाळी उठून आई नर्मदेचे दर्शन घेतल्यानंतरच अन्नपाणी घेत असे त्यामुळे रुपमतीला नर्मदा दर्शन घेता यावे यासाठी बाज बहादूरने उंचावर असलेला महाल बांधला होता.

         मांडवहून खाली उतरण्याचा मार्ग खूपच अवघड होता.डोंगर उतरल्यानंतर आळंदीच्या सदगुरुजोग महाराज संस्थेच्यावतीने  हिरापूरा येथे आश्रम सुरु केला आहे. तेथे तात्पुरत्या स्वरूपाचा तंबू उभारला आहे. आणखी निवारा तयार करण्याचे काम ग्रामस्थांच्या सहकार्याने चालू होते. या आश्रमाचे व्यवस्थापन कुणाल महाराज करतात. कुणाल महाराज यांची यापूर्वी खलघाट येथे भेट झाली होती.आज एकादशी असल्याने फराळाच्या पदार्थांची मेजवानीच  याठिकाणी झाली. कुणाल महाराज आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे आदरातिथ्य पाहून आम्ही सर्वजण भारावून गेलो.

          जवळच धरमपुरी तालुक्यातील बगवान्या नावाचे गाव आहे. या गावात श्रीराम मंदिर आहे तेथे थोडी विश्रांती घेतली. अल्पोपहार घेतला. या गावात बेंजोचा आवाज येत होता. नवरदेव मिरवणुकीने चालले होते. महिला मिरवणुकीत नाचत होत्या. नवरदेवाचा चेहरा मुंडावल्यामुळे दिसत नव्हता.प्रत्येक ठिकाणच्या चालीरीती वेगळ्या असतात हेच याठिकाणी दिसून येते.

        आज मार्गावर मांडव येथील गजानन गारमेंटचे मालक गोकुळप्रसाद शर्मा यांनी दूध तर बगवान्या येथील सीताराम बेनल यांनी फराळाची सोय केली. त्यांचे आदरातिथ्य आम्ही विसरु शकत नाही. शेतीचा विचार केला तर नर्मदेच्या पाण्याने हा भाग विकसित होताना दिसत आहे. सीताफळ लागवड केलेली दिसून आली. कांदा, गहू पीक मोठ्या प्रमाणावर दिसून आले.

         आज सदगुरु जोग महाराज यांच्या नावाने सुरु होत असलेल्या आश्रमाने आमचे लक्ष वेधून घेतले. लोकांना योग्य मार्गदर्शन केले,त्यांचा विश्वास संपादन केला तर त्यांचे आपणास सहकार्य मिळते. आपण प्रत्येकानेच लोकांचा विश्वास संपादन करण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावेत असे मला वाटते.

    राजेंद्र पवार

   ९८५०७८११७८


  #shivaputri #narmada #narmadaparikrama #narmadariver #नर्मदापरिक्रमा  #satara #satarakar

बुधवार, २६ जानेवारी, २०२२

!! आमची नर्मदा परिक्रमा !!(४७ ) चतुर्भुज श्रीराम मंदिराबाबतची माहिती..

 

!! आमची नर्मदा परिक्रमा !!(४७ )  चतुर्भुज श्रीराम मंदिराबाबतची माहिती..

          आमचा कालचा मुक्काम रामाधामा या आदिवासीप्रणित गावात होता.या गावातून कालीबावडी या गावी यायचे होते वाटेतच राजा धनगर या दूध विक्रेत्याची भेट झाली. त्यांनी आम्हास पैसे न घेता लिटरभर दूध दिले ते गरम करुन आम्ही त्याचा आस्वाद घेतला. कालाबावडी येथे श्रीरामाचे मंदिर आहे तेथे दर्शन घेऊन आश्रमात आलो. या आश्रमात फारसा वेळ न घालवता अल्पोपहार घेऊन पुढील दिशेने मार्गस्थ झालो.पुढील सर्व मार्गच घाटाचा होता. घाटरस्ता राज्य मार्ग ३९ असा होता. 

           मांडव हे ऐतिहासिक शहर आहे. आपल्याकडील महाबळेश्वर पाचगणी सारखे थंड हवेचे ठिकाण आहे. घाट संपल्यानंतर सुरुवातीला नीलकंठ महादेवाचे मंदिर आहे. ते १६ व्या शतकात बांधले आहे.वास्तूशैली देखणी आहे. हा परिसर रमणीय आहे. या शहरात अनेक प्राचीन इमारती आहेत. येथे मोगल राजवटीचा प्रभाव जास्त जाणवतो. याठिकाणी अनेक मशिदीदेखील आहेत. हॉटेल मांडवगढ रेसीडेन्सीमध्ये परिक्रमावासीयांना मोफत जेवण दिले जाते.आम्ही त्या ठिकाणी जेवण घेतले. या हॉटेलचे मालक धार येतील असल्याचे सांगितले. मांडव येथे अतिप्राचीन चतुर्भुज श्रीराम मंदिर आहे. ते अतिशय भव्य आहे.

 चतुर्भुज श्रीराम मंदिराबाबतची माहिती..







           पुणेस्थित रघुनाथदासजी महाराज यांच्या स्वप्नांत जाऊन प्रत्यक्ष प्रभू रामचंद्रानी मांडव येथे पूर्व दिशेला उंबराच्या झाडाखाली भैरवनाथाची प्रतिमा आहे. त्याच्या तळघरात  जसा मी स्वप्नांत दिसतो आहे तशी प्रतिमा तुम्हाला मिळेल. ती तळघरातून काढून जनकल्याणार्थ ठेवण्यात यावी. त्यानुसार महंत रघुनाथदासजी महाराज मांडवगढ येथे आले व उंबराच्या झाडाचा शोध घेतला. स्वप्नात दिसल्याप्रमाणे व  सर्व चिन्हे जुळली. धार येथील महाराणी शकुबाई पवार यांना भेटले.पडलेले स्वप्न कथन केले. 

          महाराणी धार्मिक वृत्तीच्या असल्याने रघुनाथदास यांच्या कथनावर विश्वास ठेवून मांडवगढ येथे खोदण्याचे काम सुरू केले. खुदाईमध्ये सध्या दिसणाऱ्या मूर्ती सापडल्या. त्या तळघरातून काढून संवत्सर १८२३ मध्ये प्रस्तुत मंदिराचे बांधकाम करुन महंत रघुनाथदासद्वारा त्यांची प्रतिष्ठापना केली. मूर्तीचे वर्णन असे आहेकी प्रभू रामचंद्रांची मूर्ती चतुर्भुज स्वरूपात आहे. उजव्या हाताला धनुष्य असून डाव्या हातात बाण आहे. ज्या हातात धनुष्य आहे त्याच्या खालच्या हातात कमळाचे फूल आहे. आणि ज्या हातात बाण त्याच्या खालच्या हातात जपमाळ आहे. उजव्या हाताखाली हनुमानजी व डाव्या हाताखाली अंगदजी आहेत. त्यांच्या चरणाजवळ सात वानर कोरले आहेत. त्याच्याखाली संवसर ९५७ हा वनवासाचा कालावधी निर्देशित केला आहे. लक्ष्मणच्या मूर्तीच्या पायाजवळ नल आणि निल यांच्या प्रतिमा आहेत. प्रभू रामचंद्रांच्या डाव्या हाताला जानकी मातेची मूर्ती आहे. मंदिराच्या समोरच भक्त हनुमानजी जवळच सूर्यनारायण भगवान, श्री लक्ष्मी नारायण यांच्या अष्ट धातूंच्या मूर्ती आहेत.

              याठिकाणचा बराचसा भाग पुरातत्व खात्याच्या ताब्यात आहे. प्राचीन वास्तूंचे जतन करुन ठेवले जात आहे. पुढील पिढीला ऐतिहासिक वारसा देण्यासाठी आपण त्या बाबी / वास्तू जतन करुन ठेवणे गरजेचे आहे. हे काम शासनाच्या माध्यमातून होत आहे. आपणही आपल्यापरीने जुन्या काळातील वास्तू जपून ठेवण्यासाठी प्रयत्न करुया.

    राजेंद्र पवार

 ९८५०७८११७८

 #shivaputri #narmada #narmadaparikrama #narmadariver #नर्मदापरिक्रमा  #satara #satarakar

!! आमची नर्मदा परिक्रमा !! (४६ )

!! आमची नर्मदा परिक्रमा !! (४६ )

             आमचा कालचा मुक्काम सिर्वी समाजाने चालवलेल्या अजंदा येथील आश्रमात होता. आजचा परिक्रमा मार्ग चांगला असल्याने आम्ही लवकरच चालण्यास सुरुवात केली. आम्ही सकाळी लवकरच बाकानेर येथील खेडापती हनुमान मंदिरात आलो. हनुमान मंदिराचा परिसर खूपच मोठा आहे. येथे आम्ही बालभोग (अल्पोपहार ) घेतला. बाकानेर हे बाजारपेठ असणारे गाव आहे. आम्ही येथे थोडी खरेदी केली. याठिकाणी सर्वत्र आदरातिथ्य केले जात होते. अल्पोपहार व पूजेचे साहित्य तसेच दक्षिणा दिली जात होती त्या सर्वच बाबींचा आम्ही स्वीकार केला.








          आम्ही दुपारचा भोजन प्रसाद मनावर तालुक्यातील लुनहेरा येथील हनुमान मंदिरात घेतला. हे मंदिर खूपच प्राचीन आहे. याठिकाणी थोडी विश्रांती घेऊन पुढील गावी जाण्यासाठी मार्गस्थ झालो. पुढील सर्व मार्ग पायवाटेचा होता. शेती माळरानाची होती.  या परिसरात सर्वत्र बडीशेपची लागवड केलेली दिसून आली.हा भाग आदिवासीप्रणित आहे.

           आज आम्ही रामाधामा नावाच्या गावात थांबलो आहे. या गावात आदिवासी समाजाचा नेता तंट्या भिल्ल यांचा पुतळा दिसून आला. आज सदाव्रताचा आनंद लुटला. या भागात महिलांचं शेतीमधील योगदान जास्त असावे असे वाटते. काही महिला बैल गाड्या घेऊन येताना दिसल्या.

           महिला कोठेच कमी नाहीत हेच या दृश्यातून दिसून आले.आज महिला सर्व क्षेत्रात काम करताना दिसून येत आहेत. आपणही स्त्री शक्तीचा सन्मान करायला हवा असे मला वाटते.

     राजेंद्र पवार

     ९८५०७८११७८


 #shivaputri #narmada #narmadaparikrama #narmadariver #नर्मदापरिक्रमा  #satara #satarakar

!! आमची नर्मदा परिक्रमा !! (४५ )

  !! आमची नर्मदा परिक्रमा !! (४५ )

             आम्ही कालचा मुक्काम धार जिल्ह्यातील पिपल्या गावी केला होता. आजचा संपूर्ण रस्ता चांगला असल्याने आम्ही लवकरच मार्गस्थ झालो.गणपूर येथे सकाळचा बालभोग एका घरी घेतला.आम्हाला त्याच घरातून पिण्याचे पाणी हवे होते. घरात पाणी नसताना देवपूजेसाठी घेतलेले पाणी त्यांनी आम्हास दिले. यामधून त्यांचा सेवाभाव स्पष्टपणे दिसून येतो.आजचा संपूर्ण परिसर शेतीच्यादृष्टीने अतिशय विकसित वाटला. वाटेत भाजीपाल्याची पिके मोठया प्रमाणात दिसून आली. याठिकाणी भेंडी, वांगी, दोडका ही भाजीपाल्याची पिके, मोसंबी, लिंबू, केळी आदि बागा, लसूण, हरबरा ही पिके मोठ्या प्रमाणात दिसून आली. येथे शेतीचे दरडोई क्षेत्रही जास्त आहे. एकेक प्लॉट वीस पंचवीस एकरचा आहे.







            आम्ही बडगाव खेडी येथे कमलेश पाटीदार यांच्या घरी थोडा वेळ थांबलो होतो. शेतीविषयक चर्चा झाली. त्यांच्याकडे १२५ एकर शेती होती.भाजीपाला व हरबरा शेती ते मोठ्या प्रमाणात करतात. त्यांच्याकडे एक ५० एकरचा प्लॉट असल्याचे सांगितले. घरसुद्धा एखाद्या संस्थानिकासारखे होते. येथील पाटीदार समाज अधिक श्रीमंत असल्याचे जाणवले. प्रत्येक खेड्यावर शहरीकरणाचा परिणाम जाणवला. लोकवस्ती बऱ्यापैकी दाट वाटली.

           आम्ही दुपारचा भोजन प्रसाद मा. नर्मदा अन्न क्षेत्र ( पाटीदार समाज ) गायत्री मंदिर करोली येथे घेतला. हे अन्न क्षेत्रही खूपच मोठे आहे. आजचा मुक्काम धार जिल्ह्यातील मनावर तालुक्यातील अजंदा येथील क्षत्रिय सिर्वी समाजाच्या ( आई माता मंदिरात ) केला. येथील आई माता मंदिर खूपच मोठे आहे. आज आम्हाला घरच्यासारखे गरमागरम जेवण मिळाले.येथील लोकांचा सेवाभावही खूपच मनाला भावला.

          चांगली शेती, सिंचनाची उत्तम व्यवस्था यामुळे सगळ्यांची आर्थिक वृध्दी झालेली दिसून येते. शेतीत प्रगती व्हायची असेल तर बारमाही सिंचनाची सोय होणे गरजेचे आहे. ज्या ठिकाणी सोय नसेल तेथे शासनाच्या माध्यमातून सोय उपलब्ध करुन दिली पाहिजे असे  मला वाटते.

    राजेंद्र पवार 

    ९८५०७८११७८


 #shivaputri #narmada #narmadaparikrama #narmadariver #नर्मदापरिक्रमा  #satara #satarakar

!!आमची नर्मदा परिक्रमा !! (४४ )

!!आमची नर्मदा परिक्रमा !! (४४ )  सुंदरकांड

       आमचा कालचा मुक्काम बडवाण्या गावात होता. त्या आश्रमात सुंदरकांड चालू होते.सुंदरकांड हे रामचरीतमानस मधील एक भाग आहे. तुलसीदास यांनी लिहिलेल्या रामायणातील विविध कांडापैकी हे एक कांड आहे. उदा.  बालकांड, अयोध्याकांड, किष्किंधाकांड, अरण्यकांड, सुंदरकांड, लंकाकांड, उत्तरकांड इत्यादी.

 सुंदरकांड बाबत माहिती ...

           सुंदरकांडामध्ये सीता शुद्धीकरणासाठी वानरसेनेतील वीरांना आवाहन केलेले आहे. परंतु आपापल्या शक्तीवर व देण्यात आलेल्या कामावर तुलनात्मकदृष्ट्या विचार करून प्रत्येक वीर आपल्या स्वतःच्या शक्तीची उणीव दाखवतात. अशा वेळी हनुमानजी एकांतात वेगळ्या ठिकाणी बसलेले असताना त्यांना त्यांच्या शक्तीची जाणीव करून देण्यात येते. त्यानंतर त्यांची शापित शक्ती जागृत होऊन महाकायरुप धारण करून प्रचंड गर्जना करतात. त्यांच्यावर ते काम सोपवले जाते. अशाच प्रकारे सर्व वानरांना तुकडी तुकडीने विविध दिशेला पाठवण्यात येते. मात्र हनुमानजी दक्षिण दिशेकडे असलेल्या समुद्रापलीकडील लंकेच्या दिशेने झेपावतात.  लंकेत प्रवेश करण्यासाठी अनंत अडचणी येतात. त्या सर्वांवर मात करून हनुमान सीतेला भेटतात. याकामी फक्त बिभीषणाचे सहकार्य होते. सीतेला भेटून हनुमानजी परत रामाकडे येतात. सर्व हकीकत प्रभू रामचंद्रांना सांगितली जाते. अशा प्रकारचा भाग सुंदरकांडात आहे. सर्व माहिती खूपच मोठी आहे. फक्त लंकेतील स्थिती येथे वर्णन केलेली आहे.







          आज सकाळी लवकरच चालण्यास सुरुवात केली.पडियाल गावात आम्ही बालभोग  घेतला. पडियालपासून परिक्रमेचे अनेक मार्ग आहेत. आम्ही भवरियामार्गे आलो. भवरीया गावात चौकात फळ विकण्यासाठी एक महिला बसली होती.त्या महिलेने आम्हा प्रत्येकाला एक एक पपई भेट दिली. तिची परिस्थिती फार चांगली  होती असे नाही पण मनाने खूपच श्रीमंत होती. भवरीया गावात शिव मंदिराचे बांधकाम चालू होते. शेजारीच अनेक देवतांच्या मूर्ती होत्या.

          आम्ही दुपारी  कोटेश्वर महादेव (कनक बिहारीजी आश्रम )येथे गेलो. आश्रम खूपच मोठा होता.  या आश्रमात अखंड रामधुन चालू असते.तेथे दुपारचा भोजन प्रसाद घेतला. याठिकाणी भोजन प्रसाद घेतल्यानंतर आपण जेवण केलेली जागा पाणी लावून स्वच्छ करण्याची पध्दत आहे. आम्ही आमची जागा स्वच्छ केली. याठिकाणी पाण्याची चांगली सुविधा असल्याने कपडे धुण्याचाही आनंद लुटला. येथे मोठी गोशाळादेखील आहे. वाटेतच शनीदेवाचे मोठे मंदिर आहे. आम्ही निसरपूरहून पिपल्या गावाच्या दिशेने वाटचाल करत असताना त्याच गावचे जगदीशभाई पाटीदार, राजेशभाई, महादेव मास्टर, शांतीलाल राजाजी ही मंडळी ४ किलोमीटर अगोदरच भेटली. त्यांनी आपल्या गावात थांबण्याचा आग्रह केला.आम्ही त्यांच्या विनंती नुसार पिपल्या गावात मुक्कामासाठी थांबलो. त्यांनी आम्हास जेवणाची मेजवानीच दिली. एखाद्या विवाह समारंभात असावे असे जेवण दिले. त्यांचे टीमवर्क खूपच छान होते. कोणत्याही कामात टीमवर्क असेल तर ते काम शतप्रतिशत यशस्वी होते.

         कोणतेही काम यशस्वी व्हायचे असेल तर टीमवर्क महत्वाचे आहे. आपणही संघशक्तीचा उपयोग करुन मोठी मोठी कामे पुर्णत्वास नेण्याचा प्रयत्न करावा असे वाटते.

      राजेंद्र पवार 

    ९८५०७८११७८


  #shivaputri #narmada #narmadaparikrama #narmadariver #नर्मदापरिक्रमा  #satara #satarakar

!! आमची नर्मदा परिक्रमा !! (४३ )

!! आमची नर्मदा परिक्रमा !! (४३ )

            आमचा कालचा मुक्काम छोटे उदेपुर जिल्ह्यातील कुलवट या गावी अगदी नदीकिनारी होता. आश्रमापर्यंत नर्मदा नदीवरील धरणाच्या पाण्याचा फुगवटा आलेला होता. आज मार्गक्रमण करावयाचा रस्ता चांगला असल्याने आम्ही लवकर चालवयास सुरुवात केली. ५/६ किलोमीटरवर धार जिल्ह्याची हद्द लागली. जिल्ह्याची हद्द लागल्याचा बोर्ड पाहताच आमचे पूर्वज धार जिल्ह्यातील असल्याने रस्त्यावरील धूळ  (माती) मस्तकी लावली. मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच धार जिल्ह्यात आलो.






            कुलवट ते डही गाव हे अंतर १५ किलोमीटरचे होते. दुपारच्या भोजन प्रसादासाठी आम्ही डही या तालुक्याच्या ठिकाणी आलो. गावात प्रवेश करताच एक हॉटेल मालक सर्व परिक्रमावासीयांना भजी चहा देऊन सेवा करीत होते. आम्ही त्यांची सेवा घेतली. माझ्या घड्याळाचा पट्टा तुटलेला होता तो दुरुस्त केला.आज आम्ही आमच्याकडे जादा असणारे साहित्य पोस्ट पार्सलने गावाकडे पाठवले. हे साहित्य पाठवण्यासाठी मुस्लिम समाजातील दुकानदाराने खूपच सहकार्य केले. त्यांनी बॉक्स उपलब्ध करुन दिला. त्याचे पॅकिंग करण्यास मदत केली. एवढेच नव्हे तर तो बॉक्स पोस्ट ऑफिसपर्यंत स्वतः पोहोच केला. 

          डही हे गाव तालुक्याचे असले तरी एवढे विकसित वाटले नाही. या गावात मोठे पोस्ट ऑफिसदेखील नाही. आपल्याकडील नागठाणे गाव त्यापेक्षा निश्चितच जास्त विकास झालेले आहे.

         आज आम्ही बडवान्या येथील राम मंदिरात आहे. मंदिरातील व्यवस्था खूपच छान आहे. आज आम्हाला या भागात प्रसिध्द असणाऱ्या दाल बाटीचे जेवण मिळाले आहे.शेतीचा विचार करता गव्हाचे पीक मोठ्या प्रमाणावर दिसून आले. ताडीची झाडे अनेक ठिकाणी पहावयास मिळाली. इतकेच नव्हे तर जागोजागी ताडी विक्रीसाठी ठेवलेली होती. काही भागात चढ उतार असणारी शेती पाहायला मिळाली. मिरचीचे पीक भरपूरच दिसून आले.

         हिंदूधर्मीय लोक नर्मदा परिक्रमा करतात. आज आम्हाला वेगळा अनुभव आला. आज गावाकडे साहित्य पाठवण्यासाठी मुस्लिम समाजातील दुकानदाराने केलेली मदत खूपच भावली. आपण बऱ्याचवेळा धर्माधर्मात असंतोष पाहतो. कोणताही धर्म दुसऱ्याचा द्वेष करा असे म्हणत नाही. सगळ्यांनीच गुण्यागोविंदाने वागावे. प्रत्येकाने सर्वधर्मसमभावाची शिकवण अंमलात आणावी,कोणीच कोणाचा द्वेष करु नये असे मला वाटते.

     राजेंद्र पवार 

     ९८५०७८११७८


 #shivaputri #narmada #narmadaparikrama #narmadariver #नर्मदापरिक्रमा  #satara #satarakar

सोमवार, २४ जानेवारी, २०२२

!! आमची नर्मदा परिक्रमा !! ( ४२)

 !! आमची नर्मदा परिक्रमा !! ( ४२)

     आमचा कालचा मुक्काम कोसरिया गावातील  नर्मदा मंदिरात झाला.आम्हाला टेमला गावी जायचे होते. संपूर्ण रस्ता चांगला असल्याने आम्ही सहा वाजता निघालो. विंध्यचल पर्वतरांग असल्याने सर्वत्र डोंगररांगा दिसत होत्या. सकाळी सकाळी ९ वाजताच उमरट गावात आलो. आमचे परिक्रमावासीबंधू पाठीमागे असल्याने कपडे धुण्याचा निर्णय घेतला. परिक्रमेत आपल्याजवळील वस्तू विसरणे हा एक प्रकार असतो. त्यामधून बहुतेक कोणाची सुटका होत नाही. लहान मोठी वस्तू कोठे ना कोठे विसरत असतेच. माझीही त्यातून सुटका झाली नाही.


           आम्ही टेमला गावी बारा वाजता पोहोचलो. तेथे पुरुषोत्तम राठोड गेले कित्येक वर्षे परिक्रमावासीयांना सेवा देत आहेत. किती मूर्ती (लोक ) आश्रमात भोजन प्रसादासाठी येणार याचा अंदाज व्हाट्सग्रुपच्या माध्यमातून त्यांना येत असतो. त्याप्रमाणे भोजन बनवले जाते. येथे भोजन प्रसाद तर घेतलाच तसेच दोन वाजेपर्यंत विश्रांती घेतली. 



           दुपारनंतरचा प्रवास फारच खडतर होता. दगडधोंड्यातून, डोंगर दऱ्यातून वाट तुडवत आम्ही कुलवट येथील हनुमान मंदिरात पोहोचलो. हे मंदिर नदीकाठी आहे. हा परिसर उत्तर तटावरील शूलपानीचा भाग आहे यामधून एकट्याने चालणे खूपच धोक्याचे आहे. आज आम्ही २७ किलोमीटर चाललो. पुढे निवासाची जवळपास सोय होणार नसेल तर चार वाजल्यानंतर लगेचच  थांबण्याचा निर्णय घ्यावा लागतो. उजेड आहे म्हणून चालता येत नाही.

         आज चाललेला सर्व परिसर आदिवासींचा आहे .त्यांचे लोकजीवन, संस्कृती, राहणीमान जवळून पाहता आले. घराचा परिसर स्वच्छ तर आहेच, भिंती कुडाच्या, काही ठिकाणी चांगली घरे असे स्वरुप आहे. घरासाठी पंतप्रधान आवास योजनेतून बऱ्याच लोकांना साह्य झालेले दिसत आहे. येथे शिक्षणाकडे फारसे लक्ष दिले जात नाही असे दिसते. एका आदिवासी वसतिगृहात गेलो. तेथे ५० विद्यार्थ्यांची क्षमता असताना केवळ १४ विद्यार्थी होते.याठिकाणी शाळेत रोज येजा करणे अवघड आहे त्यामुळे वसतिगृहात राहण्याशिवाय पर्याय नाही.



     आज एका गोष्टीने विशेष लक्ष वेधून घेतले. आम्ही ज्याठिकाणी मुक्कामाला थांबलो होतो तेथे सकाळी सहा वाजता घरातील गृहिणी दरवाज्याजवळ रांगोळी काढत होती. शिक्षण कमी असले तरी संस्कृती संवर्धनात आम्ही कोठेही कमी नाही हेच त्या गृहीनीने दाखवून दिले. आपण प्रत्येकाने संस्कृती संवर्धनासाठी प्रयत्न करावेत असे मला वाटते.

      राजेंद्र पवार 

 ९८५०७८११७८


#shivaputri #narmada #narmadaparikrama #narmadariver #नर्मदापरिक्रमा  #satara #satarakar

!!ग्रीन पुणे मान्सून हिल मॅरेथॉन२०२५ !!

 !!ग्रीन पुणे मान्सून हिल मॅरेथॉन२०२५ !!              आज रविवार दिनांक १३ जुलै २०२५ रोजी पुणे येथे" ग्रीन पुणे मान्सून हील मॅरेथॉनचे ...