!! आमची नर्मदा परिक्रमा !! (४९ )
आमचा कालचा मुक्काम धामनोद येथील अलबेला हनुमान मंदिराच्या आश्रमात होता. आश्रमातील व्यवस्था चांगली होती. या मंदिरात अखंड ज्योत प्रज्वलित असते. सकाळी आम्हाला जलकोटी येथील सहस्त्रधारा पाहायला जायचे होते. आम्ही राजमार्ग सोडून मधल्यामार्गाने जायचा निर्णय घेतला. महेश्वर गावात गोपाल रेस्टॉरंट मध्ये दूध,त्याच गावात विविध ठिकाणी दक्षिणा दिली जात होती.जलकोटा नावाच्या गावात तर आमचे जोरदार स्वागत झाले. घरोघरी आम्हास चहापाणास बोलवत होते. दोन घरात आम्ही थांबलो होतो. त्यापैकी शिवराम चाकरे व कामिनी मंडलोई यांचा खास उल्लेख करावा लागेल. शिवराम चाकरे हे ब्रह्माकुमारीज (माऊंट अबूशी ) निगडित आहेत. अतिशय प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी मुलाला शिकवले. ते आता पोलीस खात्यात अधिकारी आहेत.त्या कुटुंबातील विनम्रता खूप शिकवून गेली. कामिनी मंडलोईला आम्ही रस्ता विचारत होतो तिने आम्हाला प्रथम घरी बोलवले, दूध दिलं, जिलेबी दिली शिवाय दक्षिणा दिली.
खरी कसरत हे गाव सोडल्यानंतर झाली. आमचा मार्ग चुकला, रस्त्यात भरकटलो.आज सण असल्याने शेतात कोणीही नव्हते. अनेक वेळा नर्मदे हर अशी गर्जना करुनदेखील लवकर कोणाचीच मदत मिळाली नाही. शेवटी दीपक पटेल यांचे सहकार्य झाले आणि एकदाचे दत्तधाम आश्रमात पोहोचलो.
नारायणपुरच्या महाराजांनी जलकोटी ( महेश्वर) येथे आश्रम बनवला आहे. आश्रमाचा परिसर खूपच मोठा आहे. त्याठिकाणीच दुपारचा भोजनप्रसाद घेतला. जवळच सहस्त्रधारा हे ठिकाण आहे. खडकातून नदी वाहत असल्याने फार मोठा आवाज येथे होतो. याठिकाणी पर्यटकांची खूप गर्दी होती.जलकोटी ते महेश्वर हे अंतर ५ किलोमीटरचे आहे. वाटेत आम्हाला चार मोटेची प्राचीन विहीर पाहता आली.
आज आम्ही सप्तमातृका मंदिराच्या आश्रमात थांबलो आहे. संध्याकाळी नर्मदा स्नान करून शहरात फेरफटका मारला. महेश्वर हे प्राचीन शहर आहे. अहिल्याबाई होळकर यांचे काम याठिकाणी खूपच मोठे आहे. येथील घाट, राजवाडा, मंदिरे खूपच कलाकुसरीची आहेत.दगडावरचे कोरीव काम आपलं लक्ष वेधून घेतात. हे शहर हातमागासाठी प्रसिद्ध आहे. घरोघरी हातमाग दिसत आहेत. महेश्वरी साड्या आपल्या भागात खूपच प्रसिध्द आहेत.
आज महेश्वर फारसे फिरुन बघता आले नाही. राहिलेला भाग उद्या पाहणार आहोत. आज जलकोटा येथील प्रसंग मनाला खूपच भावला. आदरातिथ्य काय असते ते आम्ही चांगले अनुभवले. घरात चांगले संस्कार असतील तर मुलं कशी संस्कारक्षम घडतात हे जवळून पाहिले. आम्ही घरातून बाहेर पडताना कामिनीच्या घरातील सर्व सदस्य निरोप देण्यासाठी बाहेर आले होते. त्याघरी केवळ त्या मुलीमुळे गेलो होतो. सुसंस्कारित मुले घडण्यासाठी पालकांनी जाणीवपूर्वक प्रयत्न करणे गरजेचे आहे असे मला वाटते.
राजेंद्र पवार
९८५०७८११७८
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा