!! आमची नर्मदा परिक्रमा !! (४८ )
आमचा कालचा मुक्काम धार जिल्ह्यातील मांडव या ऐतिहासिक गावी होता. थंड हवेचे ठिकाण म्हणूनच हे गाव प्रसिद्ध आहे. अतिशय कडाक्याच्या थंडीलाआम्हाला सामोरे जावे लागले. सकाळी साडेनऊ वाजेपर्यंत रस्त्याच्या कडेला शेकोटी पेटवलेल्या दिसत होत्या. आम्ही सकाळी लवकरच रेवा कुंड येथे आलो. याठिकाणी आरती करुन राणी रूपमती महाल दुरुनच पाहून मार्गस्थ झालो.
रेवा कुंड व राणी रुपमती महालाविषयी माहिती......
रेवा कुंड - रेवा कुंड हे सम्राट बाज बहादूर यांनी त्यांच्या प्रिय राणी रुपमतीच्या राजवाड्यात पुरेसा पाण्याचा स्त्रोत निर्माण व्हावा म्हणून बांधले होते.
राणी रुपमती महाल - समुद्र सपाटीपासून ३६५ मीटर उंचीवर वसलेला हा राजवाडा बाज बहादूरने राणी रुपमतीसाठी बांधला होता. यासह मांडूच्या सुरक्षा व्यवस्थेवर लक्ष ठेवण्यासाठी सैनिकांसाठी हे एक चांगले ठिकाण म्हणूनदेखील वापरले गेले. असे म्हणतात की राणी रुपमती सकाळी उठून आई नर्मदेचे दर्शन घेतल्यानंतरच अन्नपाणी घेत असे त्यामुळे रुपमतीला नर्मदा दर्शन घेता यावे यासाठी बाज बहादूरने उंचावर असलेला महाल बांधला होता.
मांडवहून खाली उतरण्याचा मार्ग खूपच अवघड होता.डोंगर उतरल्यानंतर आळंदीच्या सदगुरुजोग महाराज संस्थेच्यावतीने हिरापूरा येथे आश्रम सुरु केला आहे. तेथे तात्पुरत्या स्वरूपाचा तंबू उभारला आहे. आणखी निवारा तयार करण्याचे काम ग्रामस्थांच्या सहकार्याने चालू होते. या आश्रमाचे व्यवस्थापन कुणाल महाराज करतात. कुणाल महाराज यांची यापूर्वी खलघाट येथे भेट झाली होती.आज एकादशी असल्याने फराळाच्या पदार्थांची मेजवानीच याठिकाणी झाली. कुणाल महाराज आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे आदरातिथ्य पाहून आम्ही सर्वजण भारावून गेलो.
जवळच धरमपुरी तालुक्यातील बगवान्या नावाचे गाव आहे. या गावात श्रीराम मंदिर आहे तेथे थोडी विश्रांती घेतली. अल्पोपहार घेतला. या गावात बेंजोचा आवाज येत होता. नवरदेव मिरवणुकीने चालले होते. महिला मिरवणुकीत नाचत होत्या. नवरदेवाचा चेहरा मुंडावल्यामुळे दिसत नव्हता.प्रत्येक ठिकाणच्या चालीरीती वेगळ्या असतात हेच याठिकाणी दिसून येते.
आज मार्गावर मांडव येथील गजानन गारमेंटचे मालक गोकुळप्रसाद शर्मा यांनी दूध तर बगवान्या येथील सीताराम बेनल यांनी फराळाची सोय केली. त्यांचे आदरातिथ्य आम्ही विसरु शकत नाही. शेतीचा विचार केला तर नर्मदेच्या पाण्याने हा भाग विकसित होताना दिसत आहे. सीताफळ लागवड केलेली दिसून आली. कांदा, गहू पीक मोठ्या प्रमाणावर दिसून आले.
आज सदगुरु जोग महाराज यांच्या नावाने सुरु होत असलेल्या आश्रमाने आमचे लक्ष वेधून घेतले. लोकांना योग्य मार्गदर्शन केले,त्यांचा विश्वास संपादन केला तर त्यांचे आपणास सहकार्य मिळते. आपण प्रत्येकानेच लोकांचा विश्वास संपादन करण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावेत असे मला वाटते.
राजेंद्र पवार
९८५०७८११७८
#shivaputri #narmada #narmadaparikrama #narmadariver #नर्मदापरिक्रमा #satara #satarakar
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा