!! आमची नर्मदा परिक्रमा !!(५२ )बर्फानी बाबा यांचे दर्शन
आमचा कालचा मुक्काम खरगोन जिल्ह्यातील धारेश्वर येथे होता. रस्ता पायवाटेचा असल्याने सकाळी उशिरा चालण्यास सुरुवात केली.आज वाटेत गंगाखेडी,सेमलदा, विमलेश्वर,मेहता खेडी ही गावे लागली. आज आमचा मुक्काम श्री श्रीराम महाराज संस्थान,नावघाट खेडी(बडवाह) येथे आहे. खेडीघाट येथे नव्याने श्रीराम महाराजांच्या समाधी मंदिराचे बांधकाम चालू आहे.
आज दुपारी बर्फानी बाबा यांचे दर्शन झाले. परिक्रमेत बर्फानी बाबांच्याबाबत खूप ऐकले होते. त्यांनी शिर्डीच्या साईबाबा समवेत दोन वर्षे साधनेत घालवली होती. साईबाबा आपल्यातून निघून गेलेल्याला सव्वाशे वर्षाचा कालावधी लोटला आहे. आपणच कल्पना करा बाबांचे वय किती असेल ते?
आता बाबांनी आपले उत्तराधिकारी नेमले आहेत. थोडक्यात बाबांनी आपली निर्गमनाची तयारी केली आहे. त्यांच्याबरोबर अध्यात्माची चर्चा झाली. आपला भारत देश महान आहे. इतर देशांनी जरी भौतिक प्रगती केली असली तरी आध्यात्मिक प्रगतीत आपण पुढे असल्याने त्यांना आपलेच विचार अंगिकरावे लागतील ही वस्तूस्थिती आहे. माझ्या पश्चात हे स्थळ शिर्डीसारखे होईल असेही ते म्हणाले. एका सिध्दपुरुषाचे आज दर्शन झाले त्यामुळे आम्ही कृतकृत्य झालो असे वाटते.
आज संध्याकाळी सदगुरु श्री श्रीराम महाराज यांच्या सुविध्य पत्नी जानकीदेवी (आईसाहेब) यांचे दर्शन झाले. श्रीराम महाराज श्री ब्रम्हचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचे अनुयायी होत. ते मूळचे आपल्याच जिल्ह्यातील फलटणचे, सुरुवातीचा काळ आपल्या सातारा जिल्ह्यात गेला होता. त्यांचे सर्व शिक्षण महाराष्ट्रातच झाले होते. सुरुवातीला ते नाशिकजवळ तपोवनातील एका शेतात साधना करत होते. त्यांनी तीन वेळा नर्मदा परिक्रमा केली होती. १९८३ ला ते नर्मदातिरी आले व जपसाधना पूर्ण केली.
महाराजांनी आपल्या हयातीत प्रभू रामचंद्र, ब्रम्हचैतन्येश्वर महादेव,गोंदवलेकर महाराज, हनुमंत आदींच्या मूर्तींची स्थापना केली होती. चार वर्षांपूर्वी कर्नाटकातून गोंदवले येथे येत असताना त्यांचा मायणीजवळ अपघात झाला. त्यांना सातारा येथे दवाखान्यात आणत असताना त्रिपुटीजवळ"राम" म्हणून त्यांनी प्राण सोडला. त्रिपुटी येथे समाधीस्थळ बांधण्याचा मानस आईसाहेब यांनी बोलून दाखवला. आमच्याबरोबर परिक्रमेत असणारे बीडचे पुंडलिक पाखरे यांनी महाराजांच्या समवेत ४० वर्षांपूर्वी काही काळ घालवला होता. त्या सर्व गोष्टींना आज उजाळा मिळाला. आज आईसाहेब यांनी पाखरेमाऊलींची मुलाखतही घेतली.
आज सत्संगाने माणूस कसा घडतो याची प्रत्यक्ष अनुभूती आली. प्रत्येकाने आपल्याला सत्संग कसा लाभेल यासाठी जाणिपूर्वक प्रयत्न करायला हवेत असे वाटते.
राजेंद्र पवार
९८५०७८११७८
#shivaputri #narmada #narmadaparikrama #narmadariver #नर्मदापरिक्रमा #satara #satarakar
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा