!! आमची नर्मदा परिक्रमा !! (४३ )
आमचा कालचा मुक्काम छोटे उदेपुर जिल्ह्यातील कुलवट या गावी अगदी नदीकिनारी होता. आश्रमापर्यंत नर्मदा नदीवरील धरणाच्या पाण्याचा फुगवटा आलेला होता. आज मार्गक्रमण करावयाचा रस्ता चांगला असल्याने आम्ही लवकर चालवयास सुरुवात केली. ५/६ किलोमीटरवर धार जिल्ह्याची हद्द लागली. जिल्ह्याची हद्द लागल्याचा बोर्ड पाहताच आमचे पूर्वज धार जिल्ह्यातील असल्याने रस्त्यावरील धूळ (माती) मस्तकी लावली. मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच धार जिल्ह्यात आलो.
कुलवट ते डही गाव हे अंतर १५ किलोमीटरचे होते. दुपारच्या भोजन प्रसादासाठी आम्ही डही या तालुक्याच्या ठिकाणी आलो. गावात प्रवेश करताच एक हॉटेल मालक सर्व परिक्रमावासीयांना भजी चहा देऊन सेवा करीत होते. आम्ही त्यांची सेवा घेतली. माझ्या घड्याळाचा पट्टा तुटलेला होता तो दुरुस्त केला.आज आम्ही आमच्याकडे जादा असणारे साहित्य पोस्ट पार्सलने गावाकडे पाठवले. हे साहित्य पाठवण्यासाठी मुस्लिम समाजातील दुकानदाराने खूपच सहकार्य केले. त्यांनी बॉक्स उपलब्ध करुन दिला. त्याचे पॅकिंग करण्यास मदत केली. एवढेच नव्हे तर तो बॉक्स पोस्ट ऑफिसपर्यंत स्वतः पोहोच केला.
डही हे गाव तालुक्याचे असले तरी एवढे विकसित वाटले नाही. या गावात मोठे पोस्ट ऑफिसदेखील नाही. आपल्याकडील नागठाणे गाव त्यापेक्षा निश्चितच जास्त विकास झालेले आहे.
आज आम्ही बडवान्या येथील राम मंदिरात आहे. मंदिरातील व्यवस्था खूपच छान आहे. आज आम्हाला या भागात प्रसिध्द असणाऱ्या दाल बाटीचे जेवण मिळाले आहे.शेतीचा विचार करता गव्हाचे पीक मोठ्या प्रमाणावर दिसून आले. ताडीची झाडे अनेक ठिकाणी पहावयास मिळाली. इतकेच नव्हे तर जागोजागी ताडी विक्रीसाठी ठेवलेली होती. काही भागात चढ उतार असणारी शेती पाहायला मिळाली. मिरचीचे पीक भरपूरच दिसून आले.
हिंदूधर्मीय लोक नर्मदा परिक्रमा करतात. आज आम्हाला वेगळा अनुभव आला. आज गावाकडे साहित्य पाठवण्यासाठी मुस्लिम समाजातील दुकानदाराने केलेली मदत खूपच भावली. आपण बऱ्याचवेळा धर्माधर्मात असंतोष पाहतो. कोणताही धर्म दुसऱ्याचा द्वेष करा असे म्हणत नाही. सगळ्यांनीच गुण्यागोविंदाने वागावे. प्रत्येकाने सर्वधर्मसमभावाची शिकवण अंमलात आणावी,कोणीच कोणाचा द्वेष करु नये असे मला वाटते.
राजेंद्र पवार
९८५०७८११७८
#shivaputri #narmada #narmadaparikrama #narmadariver #नर्मदापरिक्रमा #satara #satarakar
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा