!! आमची नर्मदा परिक्रमा !! (५१) दगडात नैसर्गिकरित्या हजारो शिवलिंग कोरली गेली आहेत
आमचा कालचा मुक्काम खरगोन जिल्ह्यातील सुलगाव येथे होता. हा आश्रम अगदीच नदीकाठी वृक्षराजीने वेढला होता. सकाळी लवकरच आम्ही मार्गस्थ झालो. सुलगाव,पथराड,बहेगाव,कवडिया या सर्वच ठिकाणी थोडा थोडा अल्पोपहार घ्यावा लागला. आजचा सर्व मार्ग पायवाटेचा होता. काटेरी झुडुपे, डगरट यामधून बराचसा रस्ता होता.शेतीच्या दृष्टीने हा भाग प्रगतच आहे. येथे शतप्रतिशत बागायत आहे. पन्नासपन्नास एकरात बांध दिसत नाही. गहू, हरभरा, लसूण तसेच भाजीपाला पिके मोठ्या प्रमाणात दिसत होती. आपल्या भागात लसूण लावला जातो तर येथे तो पेरला जातो.
आम्ही बहेगावला अल्पोपहार घेण्यासाठी थांबलो होतो. वेळ साडेदहाची होती. आमच्या अगोदर महाराष्ट्रातील आळंदीचे चंद्रकांत थोरवे तेथे थोडा वेळ थांबून पुढे गेले होते मात्र त्यांचे छोटे आसन (बैठकीचे साहित्य) ते विसरले होते. कोणाचे तरी आसन विसरले आहे ते देण्यासाठी गणेश केवट(नावाडी )एक किलोमीटर मोटारसायकलने आले. गणेश केवट सकाळपासून येणाऱ्या परिक्रमावासीयांना चहापान करत असतात. जर कोणाला जेवण करायचे असेल तर त्यांना सदाव्रत(भोजनाचे साहित्य) देतात.आम्ही दुपारचे भोजन पिटामली या गावात घेतले. थोडी विश्रांती घेऊन पुढील मार्गक्रमण केले.
धारेश्वरच्या एक किलोमीटर पाठीमागे दगडात नैसर्गिकरित्या हजारो शिवलिंग कोरली गेली आहेत तीही पाहण्याची संधी मिळाली. आज आम्ही धारेश्वर येथे मुक्कामाला थांबलो आहे. या स्थानाला सुरुवातीला दारुकेश्वर महादेव असे म्हटले जात होते. याठिकाणी भगवान शंकर यांची अर्धनारी नटेश्वर मूर्ती तसेच शिवलिंग आहे.भगवान श्रीकृष्णाचे सारथी दारुक याने शिवलिंगाची प्रतिष्ठापना केली होती. थोडासा अपभ्रंश होऊन सध्या धारेश्वर महादेव या नावाने हे मंदिर ओळखले जाते. उत्तर तटावरील हे प्रसिध्द स्थान आहे.
आज सकाळची कृती मनाला खूपच भावली. एक छोटीसी वस्तू देण्यासाठी गणेश केवट एक किलोमीटर गाडीवर येतात, ही वस्तू तुमची विसरली आहे असे म्हणतात, यावरुन ते परिक्रमावासीयांची किती काळजी घेतात, त्यांच्याप्रती असणारी त्यांची भावना व्यक्त होते. आपणही आपल्याकडे चुकून एखाद्याची वस्तू राहिली किंवा सापडली तर संबंधित व्यक्तीचा शोध घेऊन त्याला परत दिली पाहिजे असे प्रकर्षाने वाटते.
राजेंद्र पवार
९८५०७८११७८
#shivaputri #narmada #narmadaparikrama #narmadariver #नर्मदापरिक्रमा #satara #satarakar
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा