!! आमची नर्मदा परिक्रमा !! (६ )
२७ तारखेचा रात्रीचा मुक्काम लेपा याठिकाणी होता. लेपा याठिकाणचे अन्नछत्र मांगीलाल वर्मा हे चालवतात. मांगीलाल वर्मा हे अगदीच तरुण असून गेल्या चार वर्षांपासून हे अन्नछत्र चालवतात. रोज परिक्रमावासीयांची व्यवस्था करणे ही सोपी गोष्ट नाही. आर्थिक तरतूद करायची आणि लोकांची सेवा करायची तीही सातत्याने. आपल्या घरी आकस्मितपणे चार पाहुणे आले तर घरातील परिस्थिती बदलते. नर्मदामाईवर श्रद्धा असेल तर ते काम सहजपणे होते हेच मांगीलालने दाखवून दिले. लेपा हे गाव नर्मदा प्रकल्पात बुडीत जाणार असल्याने ४ किलोमीटरवर लेपाचे पुनर्वसन होत आहे. काही ग्रामस्थ तेथे राहायलादेखील गेले आहेत.
पुनर्वसित लेपामध्ये नाशिकच्या भारती ठाकूर यांनी आदिवासी समाजातील लोकांसाठी फार मोठे काम केले आहे.भारतीदिदींचा सुरुवातीचा काळ रामकृष्ण मिशनमध्ये गेला होता.भारती दीदींनी सुरु केलेल्या नर्मदालयात पहिलीपासून १० वी पर्यंतची वसतिगृहयुक्त शाळा आहे.या शाळेत कौशल्य शिक्षण देऊन मुलांना स्वावलंबी बनवले जात आहे. महाराष्ट्रातील पाबळ येथील ग्रामीण विकास केंद्राच्या धर्तीवर येथे शिक्षण दिले जाते. अशा प्रकारचे व्यवसाय शिक्षण वर्णे येथील हायस्कूलमध्ये दिले जात असल्याचा मला अभिमान वाटला.आम्ही काही काळ प्रार्थना चालू असताना थांबलो होतो. भारतीदीदी यांनी प्रार्थनेचे महत्व पटवून दिले. प्रार्थना आपलं हृदय शुध्द करते. शुध्द हृदयात शुध्द विचार येतात आणि आपल्या हातून चांगली कृती होते म्हणून आपण प्रार्थना म्हटली पाहिजे. दिदींच्या अनुपस्थितीत देखील ताल, सूर, लयात प्रार्थना ऐकायला मिळाली.भारतीदिदी मध्यप्रदेशात अशा अनेक शाळा चालवतात.
आजही लेपा कठोरा मार्गावर अनेक ठिकाणी चहापानासाठी आग्रह केला. कठोरा येथे पुन्हा सदाव्रताचा अनुभव घेतला. आमचे सहकारी श्री पुंडलिक पाखरे,सौ. इंदुमती चव्हाण व शिवाजी चव्हाण यांनी स्वयंपाक केला. आम्ही सर्वांनी दुपारच्या भोजन प्रसादाचा आनंद लुटला. दुपारच्या वेळी एखादी नदी लागली तर आम्ही आनंद लुटत आहोत.
दुपारच्या विश्रांतीनंतर पुन्हा पुढील दिशेने मार्गस्थ झालो. थोड्याच अंतरावर मांडव्य ऋषी गुफा आश्रम आढळला. पूर्वीच्या काळी साधू कसे ध्यानस्थ होत याचा प्रत्यक्ष गुफेत जावून अनुभव घेतला.
वाटेत पलकेश नावाचा इंदोरचा तरुण भेटला,आपली परिक्रमा पूर्ण होण्याबद्दल त्याच्या मनात शंका उत्पन्न झाली. पण आईने परिक्रमा पूर्ण झाल्याशिवाय घरी परतायचे नाही मग कितीही वेळ लागला तरी चालेल असे ठणकावून सांगितले. जर अशा आई असतील तर चांगली मुलं घडायला अडचण येणार नाही. मुलं घडवण्यात आईची भूमिका किती महत्वाची असते हेच पलकेशच्या भेटीतून दिसून आले.
आजचा मुक्काम नर्मदेच्या दक्षिण तटावर शालिवाहन येथे आहे तर त्याच्या अगदी समोर महेश्वर घाट आहे. प्रत्यक्ष त्या घाटावर नंतर जाता येईलच. रात्रीच्या वेळी घाटाचा परिसर वीज प्रकाशाने उजळून निघाला होता. घाट परिसर एकदमच विलोभनीय वाटत होता.आज घाटाचा फोटो अलीकडच्या तिरावरून घेतला. नर्मदेच्या तीरावर अनेक ठिकाणी घाट आहेत. त्यापैकी अनेक घाट अहिल्याबाई होळकर यांनी बांधले आहेत. आज सेवाभाव कसा असावा हे मांगीलालकडून शिकायला मिळाले तर भारतीदीदींनी शिस्तीबरोबर जीवनात कौशल्य शिक्षण महत्वाचे असल्याचे पटवून दिले. आपणही आपल्या मुलांना कौशल्य शिक्षण द्यायला हवे असे वाटते.
राजेंद्र पवार
९८५०७८११७८
#narmadaparikrama #narmada #narmadamai #narmadariver #parikrama #shalivahan #maheshwar