सोमवार, ८ नोव्हेंबर, २०२१

!!महर्षी धोंडो केशव कर्वे स्मृतिदिन !! (९ नोव्हेंबर )

 

!!महर्षी धोंडो केशव कर्वे स्मृतिदिन !!
    (९ नोव्हेंबर )



महर्षी धोंडो केशव कर्वे जन्म:१८ एप्रिल
१८५८ मृत्यू:९ नोव्हेंबर १९६२
             आधुनिक भारतातील एक श्रेष्ठ व कर्ते समाजसुधारक होते. महर्षी अण्णासाहेब कर्वे या नावानेच ते सर्वांना परिचित आहेत. त्यांचा जन्म कोकणातील मुरुड या गावी एका गरीब कुटुंबात झाला. शालेय शिक्षण मुरुड व रत्नागिरी येथे झाला. १८९१ मध्ये मुंबई येथून ते बी. ए. झाले. त्याच वर्षी लो. टिळकांनी फर्ग्युसन कॉलेजमधील आपल्या जागेचा राजीनामा दिल्यावर नामदार गोखल्यांनी त्यांची गणिताचे प्राध्यापक म्हणून नेमणूक केली. त्यानंतरच त्यांच्या समाजकार्यास चालना मिळाली.
              महर्षी धोंडो केशव कर्वे यांची पहिली पत्नी वारल्यानंतर १८९१ मध्ये त्यांनी पंडिता रमाबाईंच्या ‘शारदा सदन’ या संस्थेतील एका विधवेशी पुनर्विवाह केला. आनंदीबाई तथा बाया कर्वे यांनी कर्व्यांना आयुष्यभर साथ दिली. या पुनर्विवाहामुळे कर्व्यांना तत्कालीन ब्राह्मण समाजाने वाळीत टाकले पण तरीही न डगमगता त्यांनी विधवांच्या उद्धाराचे कार्य चालूच ठेवले. १८९३ साली त्यांनी ‘विधवाविवाह प्रतिबंध निवारक मंडळ’ काढले आणि पुनर्विवाहितांचे कुटुंब-मेळेही भरविले. याच दिशेने विधवांच्या शिक्षणासाठी त्यांनी १८९९ साली ‘अनाथबालिकाश्रम’ या संस्थेची स्थापना केली. पुण्याजवळील हिंगणे येथे १९०० सालापासून हा आश्रम सुरू झाला. पुढे सुगृहिणीपदाच्या दृष्टीने योग्य असेच शिक्षण स्त्रियांना दिले पाहिजे, या जाणिवेने ते स्वतंत्र महिला विश्वविद्यालयाच्या स्थापनेसाठी प्रयत्न करू लागले. त्यातूनच ठाकरसी कुटुंबाच्या आर्थिक मदतीने १९१६ मध्ये श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ उभे राहिले. या विद्यापीठातील अभ्यासक्रमामध्ये स्त्रीजीवनाशी संबद्ध अशा विविध विषयांचा समावेश असून शिक्षणाचे माध्यम मातृभाषा आहे. अनाथ बालिकाश्रम आणि महिला विद्यापीठ या संस्थांतून महाराष्ट्रातील हजारो स्त्रियांनी आपले शिक्षण पुरे केले आहे. या दोन संस्थांच्या उभारणीसाठी आणि आर्थिक स्थैर्यासाठी अण्णासाहेब कर्व्यांनी आयुष्यभर स्वदेशात आणि परदेशातही  मिशनरी बाण्याने वणवण केली.
          महर्षी कर्वे यांचे आयुष्य संस्थामय होते. वरील संस्थांखेरीज १८८६ मध्ये ‘मुरुड फंड’ ,१९१० मध्ये स्त्रियांच्या उद्धारासाठी आमरण कार्य करणारे कार्यकर्ते निर्माण व्हावेत म्हणून काढलेला ‘निष्काम मठ’ ,१९३६ मध्ये ग्रामीण शिक्षणासाठी ‘महाराष्ट्र ग्राम प्राथमिक शिक्षण मंडळ’ , जातिभेद आणि अस्पृश्यता यांच्या निर्मूलनाच्या उद्दिष्टाने काढलेला  १९४४ मध्ये‘समता-संघ’ इ. संस्था त्यांनी स्थापन केल्या. त्यांचे आत्मवृत्त १९१५ मध्ये प्रकाशित झाले असून ते अत्यंत उद्बोधक आहे.
            आधुनिक भारताच्या सामाजिक सुधारणेच्या इतिहासात व विशेषतः स्त्रीशिक्षण, विधवाविवाह या बाबतींत कर्व्यांनी आपल्या आमरण कार्याने, चिकाटीने आणि ध्येयवादाने एक अपूर्व आदर्श निर्माण केला. या शतायुषी महर्षीचा गौरव भारत सरकारने १९५५ मध्ये पद्मविभूषण ,१९५८ मध्ये भारतरत्न  या पदव्या देऊन केला. त्यांच्या कार्याचे दिग्दर्शन करणारा एक अनुबोधपटही सरकारने काढलेला आहे.
               महर्षी धोंडो केशव कर्वे यांना स्मृतिदिनाच्या निमित्ताने विनम्र अभिवादन.
            संकलक: राजेंद्र पवार
            ९८५०७८११७८

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

!!ग्रीन पुणे मान्सून हिल मॅरेथॉन२०२५ !!

 !!ग्रीन पुणे मान्सून हिल मॅरेथॉन२०२५ !!              आज रविवार दिनांक १३ जुलै २०२५ रोजी पुणे येथे" ग्रीन पुणे मान्सून हील मॅरेथॉनचे ...