!! जीवन बदलाची वारी -कार्तिकीची !!
(एकादशी -१५ नोव्हेंबर २०२१)
कार्तिकी एकादशीनिमित्त मी कुटूंबियांसमवेत पंढरपुरला आलो होतो.माझ्या समवेत वर्णे येथून माझी सौभाग्यवती सौ. कुसुमताई आणि वर्णे गावचे माजी सरपंच तथा श्री काळभैरवनाथ देवस्थान ट्रस्ट वर्णे आबापुरीचे विश्वस्त हणमंतराव पवार (तात्या ),एकंबे येथून श्री गोरख चव्हाण, सौ. इंदुमती चव्हाण व सापहून माझी ज्येष्ठ मेहुणी सौ. शांताताई कदम आदी मंडळी बरोबर होती.
आम्ही सर्वजण पंढरपूर येथील वैष्णव सदन (शेगाव दुमाला ) येथे उतरलो होतो. एकादशीदिवशी प्रचंड गर्दी असल्याने रांगेतून लवकर दर्शन होणे अवघड असल्याने नगरप्रदक्षिणा व मंदिर प्रदक्षिणेचा मार्ग निवडला. कळसाचेच दर्शन घेतले. एकादशीदिवशी रात्री गाथा मंदिर देहूचे अध्यक्ष ह.भ.प. पांडुरंग महाराज घुले यांचे कीर्तन झाले. महाराजांनी कीर्तन सेवेसाठी तुकाराम महाराजांचा अभंग घेतला होता. तो खालीलप्रमाणे......
!!आम्ही तेने सुखी! म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी !!१ !!
!! तुमचे येर वित्त धन! ते मजमृत्तिकेसमान !! २ !!
!!कंठी मिरवा तुलसी! व्रत करा एकादशी !!३ !!
!!म्हणवा हरीचे दास! तुका म्हणे मज ही आस !!४ !!
प्रस्तूतचा अभंग प्रासंगिक स्वरुपाचा आहे. संत तुकाराम महाराज व छत्रपती शिवाजी महाराज समकालीन,महाराजांची कीर्ती शिवरायांच्यापर्यंत पोहचली होती. शिवरायांना संत तुकाराम महाराजांच्या सामाजिक कार्याबद्दल पूर्णपणे कल्पना होती. सामाजिक जीवनातील व्यस्ततेमुळे संत तुकाराम महाराजांच्या कुटूंबाची दुर्दशा झाली होती. त्या दयनीय अवस्थेतुन महाराज बाहेर पडावेत यासाठी आपल्या नोकराकरवी तुकाराम महाराजांना भेट म्हणून नजराणा पाठवतात. त्या नजरण्याचा ते स्वीकार करत नाहीत. ते म्हणतात, संतांचे हित समाजहितातच लपले आहे. आपलं जीवन जगत असताना लोकांनी परमेश्वराचे नामस्मरण करावे त्यातच संतांचे सुख आहे असे अभंगाच्या पहिल्या चरणात सांगितले आहे. तुकाराम महाराज म्हणतात, शिवरायांनी पाठवलेले जडजवाहीर आम्हाला मातीसमान आहे. आम्हाला अशा कोणत्याही धनाची आसक्ती नाही. येथे शिवाजी महाराजांच्या दूताबरोबर चर्चा झाल्याचे म्हटले आहे. शिवरायांचा नोकर म्हणतो, आपलं हिततरी नेमकं कशात आहे. गळ्यात तुळशी माळ घालावी, एकादशीचे व्रत करावे. स्वतःला मालक न समजता स्वतःला हरीचे दास म्हणवून घ्यावे. थोडक्यात काय तर मी कोणी वेगळा आहे असे समजू नये. स्वतःला सामान्य म्हणवून घ्यावे, या गोष्टींची आस संतांना लागलेली असते. आपण संतांना आवडणारे जीवन जगले पाहिजे. आपल्या हातून समाजविघातक कृत्य घडू नये याची काळजी घेतली पाहिजे.संत तुकाराम महाराज म्हणतात त्याप्रमाणे आज परिस्थिती राहिलेली नाही. आधुनिक संत आज समाजातून सामाजिक कार्यासाठी धनाचा स्वीकार करतात. या धनातूनच मंदिरे, घाट, शाळा महाविद्यालये, आरोग्य विषयक उपक्रम राबवलेलं दिसत आहेत.
या कीर्तनाचा प्रभाव माझ्यावर पडलाच, तत्पूर्वीच गोरख चव्हाण व सौ.इंदुमती चव्हाण यांनी माझी मानसिक तयारी केली होती. किर्तनानंतर ह.भ.प. पांडुरंग महाराज घुले यांच्या हस्ते मी माळ घातली. माळ घालताना वरील सर्व मंडलीसह रंगनाथ हांडे (मामा), राजू वाघ, श्री तानाजी निकम आदी उपस्थित होते.
आजची कार्तिकी एकादशी माझ्या जीवनात परिवर्तन घडवून आणणारी ठरली. जीवनातील पुढील सर्व कार्य पांडुरंग करवून घेईल यात संदेह नाही.
राजेंद्र पवार
९८५०७८११७८
#pandurang #pandharpur #wari #pandharpurwari #kritikiwari #ekadashi
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा