!! आमची नर्मदा परिक्रमा !!(१०५ )११ मार्च
आमचा कालचा मुक्काम रामघाट माछा येथे होता. येथील आश्रमाचा परिसर भव्य आहे. या गावात सौ.मंजू व संतोषकुमार राय हे परिक्रमावासीयांना भोजन सुविधा उपलब्ध करुन देतात. त्यांचा सेवाभाव खूप काही शिकवून जातो. या परिसरातील लोक बोलत असलेली भाषा आपणास समजून येत नाही. ज्यांचे थोडेफार शिक्षण झाले आहे तेच काय म्हणत आहेत ते समजू शकते.आज नदीच्या कडेकडेने चाललो होतो.नदीत संगमावर स्नानाचा आनंद लुटला.आता या जिल्ह्यात फारसा चढ उतार नसलेली जमीन दिसून येते. यामुळे शेतीस पाणी देण्याची पध्दती आपल्यासारखीच आहे. नजर जाईल तिथपर्यंत तुम्ही गव्हाशिवाय काही पाहू शकत नाही.
लोकांचे राहणीमानदेखील सुधारलेले दिसून येत आहे. वाटेत लहानापासून मोठ्यापर्यंत "नर्मदे हर " म्हणून आदरातिथ्य करत होते. चहापान घेऊन जा असा आग्रह अनेकजण करत होते. आम्ही रामनगर येथे हरीओम पटेल यांच्याघरी ताकाचा आस्वाद घेतला.आज वाटेत अजेरा,भानपुर,गलचा, साकला, ईशरपूर, पामली, रामनगर आदी गावे लागली.आज आमचा मुक्काम सांगाखेडा येथील परमहंस आश्रमात आहे.हा आश्रम अगदी किनाऱ्यावर आहे.
शेतीच्या दृष्टीने विचार केला तर नर्मदेच्या पाण्याने हा भाग समृध्द झालेला आहे. सर्वत्र गव्हाचे पीक डोलताना दिसत होते. सलग पीक पध्दतीचे अनेक फायदे आहेत. विशेषतः कीड नियंत्रण, सिंचन सुविधा, हार्वेस्टिंग, विक्री व्यवस्थापन, वेअर हाऊस सुविधा या सर्वांचाच फायदा होतो.
आपणही आपल्या परिसरात जेवढे शक्य होईल तेवढ्या सलग पीक पध्दतीचा अवलंब करायला हवा असे मला वाटते.
राजेंद्र पवार
९८५०७८११७८
#narmada #narmadamai #narmadariver #narmadaparikrama #shivaputri #shiv #satarakar
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा