!! वारी पंढरीची २०२२ !! (दिवस दहावा ३० जून )
दोन दिवसांच्या लोणंद मुक्कामानंतर ज्ञानेश्वर माऊलींची पालखी दुपारी एक वाजता तरडगावच्या दिशेने मार्गस्थ झाली. फलटण तालुक्यात पालखीचे आगमन झाल्यानंतर प्रशासनाच्यावतीने जोरदार स्वागत करण्यात आले. फक्त ५ किलोमीटरवर चांदोबाचा लिंब हे ठिकाण असून येथे पहिले उभे रिंगण होते. रिंगणाच्या मार्गावर सर्वत्र रांगोळी काढली होती. रिंगणात चोपदारांचा अश्व पुढे व माऊलींचा अश्व मागे असतो. हे दोन्ही अश्व धावत असताना प्रत्येकजण माऊली, माऊली असा जयघोष करीत असतात. हा सोहळा अतिशय नयनरम्य होता. हे रिंगण पाहण्यासाठी परिसरातील तसेच आसपासच्या तालुक्यातील भाविक आलेले होते. लोणंद ते तरडगाव हे अंतर केवळ ८ किलोमीटर असून, हा सगळ्यात छोटा टप्पा आहे. बरेच लोक लोणंद ते तरडगाव हा टप्पा पायी चालतात. वारी सुरु झाल्यापासून या गावाने नेहमीच वारीला सहकार्याची भूमिका घेतली असल्याने या गावाला हा खूप मोठा मान मिळाल्याचे दिसते.येथील पालखीतळही साडेबारा एकरावर विस्तारलेला आहे.
तरडगाव गावाबाबत थोडीसी माहिती सांगितलीच पाहिजे.....
या गावाजवळ रथ आल्यानंतर पालखी रथातून उतरवली जाते. गावातील तरुण पालखी वाहण्याचे काम करतात. या गावात विठ्ठल मंदिर,पवारवाडा, चाफळकर वाडा,सावता माळी मंदिर याठिकाणी पालखी थांबते. इतकेच नव्हे तर ती खाली ठेऊन तिची पूजा केली जाते. या गावावर वारकरी संप्रदायाचा मोठा प्रभाव जाणवतो. वर्षभरात ५ वेळा या गावात ज्ञानेश्वरी पारायणे होतात. गावातील ६०% लोक हे माळकरी आहेत. फलटण-कोरेगाव मतदार संघाचे आमदार दिपक चव्हाण यांचे हे गाव असून हे गाव प्रगत असल्याचे स्पष्टपणे दिसून येते. या गावातील गावकरी ठिकठिकाणी खाऊ तसेच पाणी वाटप करताना दिसून आले.
आज आमचा मुक्काम अनिल गाडे या किराणा दुकानदाराकडे आहे. या कुटुंबाचा सेवाभाव खूप काही शिकवून गेला.या कुटुंबाने आमची शाही व्यवस्था केली त्यामुळे त्यांच्या ऋणातच सदैव राहावे असे वाटते.
पालखी तळावर पालखी आल्यानंतर ती वाजत गाजत तंबूकडे नेली जाते. यावेळी वाद्यांचा गजर आणि मुखाने ज्ञानबा तुकाराम यांच्या नामाचा जयघोष चालू होता. संपूर्ण पालखी मार्गावर चोपदारांचे राज्य चालू असते. जणू काही ते अनभिषिक्त सम्राटच असतात असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. चोपदारांनी दंड उंचावताच सर्वत्र शांतता पसरते. जर एखाद्या दिंडीची काही तक्रार असेल तर ते वाद्यांचा गजर चालूच ठेवतात. आज एक नंबरच्या दिंडीने गजर चालू ठेवला होता. त्यांची तक्रार चोपदारांनी ऐकून घेतली. यावेळी हरवलेल्या जिनसा व सापडलेल्या जिनसा यांचा उल्लेख केला जातो. ज्याच्या जिनसा आहेत त्यांना ओळख पटवून घेऊन जाण्याचे आवाहन केले जाते. वारीत एखाद्याला वस्तू सापडली तर सोहळ्याच्या कार्यालयात जमा केली जाते. थोडक्यात वारीत भौतिक वस्तूंचा मोह सोडला जातो.
वारीत लाखो वारकरी सहभागी होतात. येथे स्वयंशिस्तीला प्राधान्य असते. स्वयंशिस्त असेल तर कितीही अवघड काम सहज शक्य होते. आपणही आपल्या जीवनात स्वयंशिस्तीला प्राधान्य द्यावे असे मला वाटते.
राजेंद्र पवार
९८५०७८११७८