शुक्रवार, २४ जून, २०२२

!! वारी पंढरीची २०२२ !! (दिवस चौथा २४ जून )

 !! वारी पंढरीची २०२२ !! (दिवस चौथा २४ जून )

           आज सकाळी ६ वाजता ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे भवानी पेठेतील पालखी विठोबा मंदिरातून प्रस्थान झाले. आम्ही प्रस्थानापूर्वी तेथे हजर होतो. आम्ही लगेचच दिंडीत सहभागी झालो. कालच्या नियोजनाप्रमाणे पुलगेटजवळ शपथ घेण्याचा कार्यक्रम संतांच्या साक्षीने झाला.थोड्याच वेळात पालखी वानवडी जवळ आली. त्याठिकाणी परंपरागत आरती झाली. वारीत सर्वत्र टाळ मृदंगाचा गजर चालू असतो परंतु फक्त चोपदाराने दंड उंचावताच सर्वत्र शांतता प्रस्थापित होते. लाखोंचा जनसमुदाय एका क्षणात एकदम शांत होताना पाहिला. आज हडपसर, उरळी देवाची व झेंडेवाडी येथे छोटे विसावे होते. वडकीनाला याठिकाणी मोठा विसावा होता. वडकी नाल्यापासून दिवे घाट सुरु होतो. घाटात वारकऱ्यांची कसरत पाहायला मिळत होती. थोडासा ऊन सावलीचा खेळ चालू होता. 








             सगळे वारकरी पावसाची प्रतीक्षा करत होते पण पावसाने हुलकावनीच दिली. फक्त एका सरीने काय तो दिलासा दिला. पालखीच्या पुढे नगाऱ्याची गाडी असते. वारीत प्रत्येक दिंडीत हरिनामाचा गजर चाललेला दिसतो.दुपारनंतर आम्ही थोडं पुढे आल्याने प्रत्येक दिंडीमध्ये चालणाऱ्या भजनाचा आनंद लुटला. घाट चढून आल्यानंतर लगेचच फिजोथेरपीचे केंद्र होते. तेथे मसाजची सुविधा उपलब्ध करुन दिली होती. या सुविधेचा लाभ आम्ही घेतला. आजचा टप्पा ३५ किलोमीटरचा त्यातच अवघड घाट असल्याने प्रत्येकाच्या चेहऱ्यावर थकवा जाणवत होता याला फक्त तरुणांचा अपवाद असेल. पुरंदर तालुक्याच्या प्रवेशद्वारावर पांडुरंगाची मोठी मूर्ती असून ती लक्षवेधक होती. पुरंदर तालुक्याच्यावतीने सर्व वारकऱ्यांचे स्वागत केले जात होते. स्वागताचा मान विणेकऱ्याला दिला जातो.

            आज एकादशी असल्याने सर्वत्र फराळाचे वाटप केले जात होते. आज आम्हाला सकाळी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये कार्यरत असणारे ज्ञानेश्वर पवार यांच्याकडून फराळ मिळाला आणि याचवेळी मांजरी स्टड फार्ममध्ये कार्यरत असणारे मुख्य पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.दत्तात्रय भोसले यांचे विशेष सहकार्य लाभले.

            वारीच्या मार्गावर जसे फराळाचे वाटप होते अगदी त्याचप्रमाणे ठिक ठिकाणी वैद्यकीय सुविधा मोफत उपलब्ध करुन दिली जात होती. मीही या सुविधेचा लाभ घेतला. आजचा आमचा मुक्काम सासवडनगरीत आहे. आज घाटात सर्वत्र वेगवेगळ्या वाहिन्या वारीचे चित्रीकरण केले जात होते. थोडक्यात काय तर खाजगी संस्था असो किंवा शासकीय या यंत्रणांच्या माध्यमातून लोकांपर्यंत जाता येते. मी म्हणेन वारी ही आपणास समाजसेवेची संधी देते. आपणास देखील अशा संधी आल्या तर त्या संधीचे सोने करायला हवे. आपलं कामसुध्दा  वारीच्या माध्यमातून समाजापुढे नेण्याची संधी मिळते असे मला वाटते.

   राजेंद्र पवार 

 ९८५०७८११७८

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

!!ग्रीन पुणे मान्सून हिल मॅरेथॉन२०२५ !!

 !!ग्रीन पुणे मान्सून हिल मॅरेथॉन२०२५ !!              आज रविवार दिनांक १३ जुलै २०२५ रोजी पुणे येथे" ग्रीन पुणे मान्सून हील मॅरेथॉनचे ...