!! वारी पंढरीची २०२२ !! (दिवस सहावा २६ जून )
आज सकाळी ७ वाजता सासवडहून संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे प्रस्थान झाले. सासवड शहरातून पालखी मिरवणुकीने मुख्य मार्गावर आली. रथ मुख्य रस्त्यावरच उभा होता. सासवड नगरवासीयांनी दुतर्फा उभे राहून माऊलींचे स्वागत केले जात होते. समाजसेवी संस्थांच्या माध्यमातून खाऊची पाकिटे आणि पिण्याच्या पाण्याचे वाटप केले जात होते. सासवड शहरात हिंदवी स्वराज्याचे पहिले सर सेनापती वीर बाजी पासलकर यांची छत्रपती शिवाजी महाराजांनी १६४९ मध्ये समाधी बांधली आहे. सासवडमध्ये शिवसृष्टीही आकाराला आली आहे. ती आम्हाला पाहण्याचा योग आला नाही.
आज पहिला विसावा बोरावके मळा तर दुपारनंतरचा विसावा साकुर्डे या गावी होता. दुपारची विश्रांती यमाईची शिवरी या ठिकाणी होता. नेहमीप्रमाणे गायकवाड यांच्या घरी विश्रांतीची व्यवस्था झालेली होतीच. मात्र दुपारच्या भोजनाची व्यवस्था पुरंदर तालुक्यातील वीर येथील संजय धुमाळ यांनी केली होती. आज बराच काळ ढगाळ वातावरण होते. आम्ही सर्वजण पावसाच्या प्रतीक्षेत होतो. पावसाने फक्त पालखी मार्गावर जलाभिषेक केला. प्रत्येकाला पावसाची खूप ओढ लागली आहे.
पालखी मार्गावर विविध समाजसेवी संस्था जनतेचे प्रबोधन करत असतात. आज दोन वेगवेगळ्या बाबी प्रकर्षाने जाणवल्या. दोन्हीही खूपच हृदयस्पर्शी होत्या. काही युवक व्यसनमुक्तीसाठी काही कार्यक्रम सादर करत होते. खर तर व्यसनापासून प्रत्येकाने दूर राहायला हवे. व्यसनामुळे घराची राखरांगोळी होते. आपण सर्वजणच व्यसनापासून दूर राहूया.
आमचा आजचा मुक्काम श्री क्षेत्र जेजुरी येथे आहे. आमच्या निवासाची शाही व्यवस्था बाळासाहेब जगताप यांनी केली आहे. जेजुरी येथे खंडोबाचे जागृत देवस्थान आहे. खंडोबा हे महाराष्ट्राचे कुलदैवत आहे ते संपूर्ण महाराष्ट्राला सुपरिचित आहे.
उंच डोंगरावर असलेल्या कडेपठार या ठिकाणी जुने खंडोबाचे स्थान होते. परंतु जेजुरीला अहिल्याबाई होळकर यांनी नव्याने देऊळ बांधले. तेही आता तीन शतकांपूर्वीचे म्हणजे सन १७१२ सालचे हे देऊळ आहे. मोगलांच्या सैन्याने मंदिर उद्ध्वस्त केल्याचे इतिहास सांगतो. परंतु, औरंगजेबाने १,२५,००० चांदीच्या मोहरा देऊन, या देवळातील उठलेल्या पोळ्यातील माशा शांत होण्यासाठी खंडोबालाच साकडे घातले, असाही उल्लेख सापडतो. देवळासमोर दगडी दीपमाळा आहेत. सुमारे २००पायऱ्या चढून वर गेल्यावरच मल्हारी मार्तंडाचे म्हणजेच खंडोबाचे दर्शन होते. नवलाख पायरीचा (नऊ लाख पायऱ्या) डोंगर असेही या देवस्थानच्या डोंगरास म्हटले जाते. देऊळ अतिशय सुंदर आहे. सभामंडप आणि गाभारा असलेल्या या देवळात खंडोबाची मूर्ती आहे. म्हाळसा, मणिमाला आणि खंडोबा अशा तीन सुबक मूर्ती देवळात आहेत. देवळात तलवार, डमरू आणि परळ या पुरातन वस्तू जतन केलेल्या आहेत. दसऱ्याच्या दिवशी मोठी यात्रा इथे भरते. तसेच सोमवती अमावास्येलाही भाविक येथे दर्शनासाठी गर्दी करतात.
जेजुरीचे मंदिर हा महाराष्ट्राच्या मंदिरवास्तुकला परंपरेच्या प्रगतीचा महत्त्वाचा टप्पा आहे. खंडोबाचे हे जागृत समजले जाणारे देवस्थान आहे. धनगर, आगरी, कोळी व इतर अनेक लोकांचे हे आराध्यदैवत असून सन १६०८ मध्ये या देवळाचे बांधकाम झाले. सभामंडप व इतर काम सन १६३७ साली राघो मंबाजी या मराठा सरदाराने केले, तर सभोवारच्या ओवऱ्या व इतर वास्तू होळकरांनी बांधल्या. सन १७४२ मध्ये होळकरांनी दगडी खांब बांधले. सभोवारच्या तटबंदीचे व तलावाचे काम सन १७७० मध्ये पूर्ण झाले.
निसर्गाच्या सान्निध्यात नैसर्गिक वाटणाऱ्या वास्तुकलेचे जेजुरीच्या खंडोबाचे देवालय हे उत्तम उदाहरण आहे. खंडोबा हे शिव, भैरव व सूर्य या तीन देवतांचे एकत्रित स्वरूप आहे व म्हणूनच खंडोबाचा उपास रविवार या सूर्याचे वारी करण्याचा प्रघात असावा. गेल्या अनेक शतकात धनगर व इतर जमातींच्या भक्तांनी दगडी पायऱ्या, दीपमाळा, व कमानी उभारल्या आहेत. या सर्व बांधकामात मराठी वास्तुकला व निसर्गाशी समरसता दिसून येते. दीपमाळांचे अनेक प्रकार, कमानीवरील उत्तम भित्तिचित्रे व नक्षी हे पाहिल्यावर जेजुरीच्या गतवैभवाची थोडी कल्पना येते.
आज जेजुरी नगरीत भंडाऱ्याची उधळण करत ग्रामवासीयांनी ज्ञानेश्वर माऊलींचे उत्साहात स्वागत केले. "सदानंदाचा येळकोट, येळकोट, येळकोट येळकोट जय मल्हार" अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला होता. यावर्षी जेजुरी येथे नव्याने पालखी तळ विकसित केला आहे. प्रसिध्द उद्योजक बाळासाहेब भानगीरे यांनी ९ एकर जमीन पालखी तळाशी दिल्यामुळे गैरसोय कायमची दूर झाली आहे.
आज सकाळी खळद गावाजवळ लेक लाडकी अभियानच्या प्रवर्तक वर्षा देशपांडे यांनी आपल्या सहकाऱ्यांना बरोबर घेऊन मुलगी वाचवा, देश वाचवा, स्त्री भ्रूण हत्या थांबवा,महिलांना सन्मानाने वागवा. तिला स्थावर, जंगम मालमत्तेत मालक करा अशा विषयाचे प्रबोधन करणारे ड्रेस परिधान केले होते.
आपणही आपल्या कुटूंबातील, समाजातील स्त्रियांना सन्मानाची वागणूक देऊया.स्त्री-पुरुष समानता खऱ्याअर्थाने अंमलात आणूया.
राजेंद्र पवार
९८५०७८११७८
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा