!! वारी पंढरीची २०२२ !! ( दिवस नववा २९ जून )
आज ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचा मुक्काम लोणंद येथे आहे.लोणंदला पालखीचा मुक्काम दोन दिवस असल्याने शेजारच्या तालुक्यातील असंख्य भाविक माऊलींच्या दर्शनासाठी येत असतात. आज दर्शनरांगा किमान एक किलोमीटरपर्यंत असाव्यात. दर्शन रांगेत असतानाही भाविक ज्ञानोबा तुकारामांचा जयघोष करत होते. दर्शन सुलभ व्हावे यासाठी पोलीस प्रशासन काळजी घेताना दिसत होते. आम्हालाही पोलीस प्रशासनामुळे आजही सुलभ दर्शन मिळाले.
वारी हे लोक शिक्षणाचे उत्तम माध्यम आहे. चित्ररथाच्या माध्यमातून समाज प्रबोधन करण्याचे काम चालते. आज असाच ग्रामविकास विभागाचा चित्ररथ पहावयास मिळाला. त्याची माहिती पुढीलप्रमाणे....
महाराष्ट्र शासन ग्रामविकास व पंचायत राज विभाग,राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियान,शाश्वत विकास ध्येयावर आधारित ग्रामपंचायत विकास..... यावर्षीपासून सुधारित राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियानाच्या माध्यमातून शाश्वत विकास ध्येयांचे स्थानिकीकरण करण्यासाठी शाश्वत विकास संकल्पनाच्या अंमलबजावणीद्वारे ग्रामपंचायतीची क्षमता बांधणी आणि सशक्त ग्रामपंचायतीसाठी शाश्वत विकास संकल्पनावर आधारित ग्रामपंचायत विकास आराखडे तयार करणे व पुढील काळात प्रत्यक्ष अंमलबजावणी करणे हे अभियानाचे स्वरुप आहे.
विकासासाठी खालील बाबी विचारात घेतल्या आहेत.
#गरिबी मुक्त गाव
#बालस्नेही गाव
#स्वच्छ आणि हरित गाव
#आरोग्यदायी गाव
#जल समृध्द गाव
#स्वयंपूर्ण पायाभूत सुविधायुक्त गाव
# सुशासनयुक्त गाव
#सामाजिकदृष्ट्या सुरक्षित गाव
आपलं गाव सक्षम करण्यासाठी सर्वजण प्रयत्नशील राहूया.
प्रत्येक दिंडीत किर्तनाचा कार्यक्रम असतोच. आज वाई तालुक्याच्या दिंडीला भेट देण्याचा योग आला. आपण पुरुष कीर्तनकार अधिक प्रमाणात पाहतो. आता स्त्री किर्तनकारही आपणास पाहायला मिळतात. मात्र हे प्रमाण नगण्य आहे. आज मात्र वाईच्या दिंडीत महिला टाळकऱ्यांचं प्रमाण मोठे आढळून आले. थोडक्यात काय तर महिला टाळकऱ्यांचं प्रमाण काकणभर जास्तच होत. आपण स्त्री- पुरुष समानतेच्या गप्पा मारतो , मात्र तशी संधी देत नाही. संधी दिली तर स्त्रिया संधीचे सोने करतात हेच या प्रसंगी दिसून आले. प्रत्येक क्षेत्रात स्त्रिया काम करताना दिसत आहेत. समान संधीच्या दिशेने पावलं उचलली जात आहेत.आपणही स्त्रियांचा सन्मान करुन, वेगवेगळ्या क्षेत्रात त्यांना काम करण्याची संधी द्यायला हवी असे वाटते.
राजेंद्र पवार
९८५०७८११७८
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा