!! वारी पंढरीची २०२२ !! (दिवस अकरावा १ जुलै )
आज सकाळी सहा वाजता तरडगावहून संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचे प्रस्थान झाले. दत्त मंदिर देवस्थान काळज येथे पालखीने पहिला विसावा घेतला. तर दुसरा विसावा सुरवडी येथे होता. तरडगावपासून फलटणपर्यंत रस्त्याच्या दुतर्फा बऱ्याचशा औद्योगिक वसाहती दिसून आल्या. परिणामी या टप्प्यात वारकऱ्यांना मोठया प्रमाणात खाऊ तसेच बिसलेरी बॉटलचे वाटप होताना दिसत होते. वारकऱ्यांना सेवा देण्यासाठी खूप दुरहून लोक आलेले दिसत होते. पालखीची दुपारची विश्रांती निंभोरे येथे होती. दुपारनंतर वडजल येथे पालखीने विसावा घेतला. या पालखी मार्गावर पर्यटन विकास महामंडळाकडून देखील वारकऱ्यांचे स्वागत केले जात होते. या मार्गावर फलटणजवळ क्रेनच्या साह्याने माऊलीच्या रथास पुष्पहार घालण्यात आला. तरडगाव ते फलटणची पायी वारी अगदी सहजरीत्या झाली. फलटण कधी आले ते कळलेही नाही. आज दुपारी निंभोरे येथे किशोर मोरे यांच्या घरी भोजनाचा आस्वाद घेतला तर आजचा मुक्काम फलटणला आशिष कणसे यांच्या घरी आहे. वारीच्या मार्गावरील स्थानिक लोकांना वारकरी भोजनासाठी आपल्या घरी यावेत अशी अपेक्षा असते त्याचाही प्रत्यय आज आला. वारकऱ्यांच्या रुपाने ज्ञानेश्वर माऊलीच आपल्या घरी येतात असे त्यांना वाटते यासाठी आपल्या घरी येण्याचा त्यांचा जास्त आग्रह असतो. "साधूसंत येती घरा तोचि दिवाळी दसरा" हेच येथे दिसून येते.
वारीच्या माध्यमातून अनेक गोष्टी शिकायला मिळतात. आज सहकार क्षेत्रातील दोन दिगग्ज ज्ञानदीपचे व्ही. जी. पवार व शिवकृपाचे संस्थापक व माजी अध्यक्ष गोरख चव्हाण यांची दिलखुलास चर्चा होताना दिसून आली. वारीत अनेक लोक भेटत असतात. प्रत्येकाने आपापली प्रगती कशी केली हेही आपणास कळते. अडचणी आल्या तर मार्ग कसा काढावा हे सुध्दा आपल्याला समजते.
फलटण शहराच्या प्रवेशद्वारावर महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्व. यशवंतराव चव्हाण आणि त्यांच्या सौभाग्यवती वेणूताई चव्हाण यांचा पुतळा दिसून आला. हा पुतळा पाहिल्यानंतर एक सुसंस्कृत राजकारणी आणि त्यांचा कार्यकाल नजरेसमोर आला. महाराष्ट्राला कसे प्रगतीपथावर नेले हे समजून आले. फलटण शहरात पालखीवर पुष्पवृष्टी करण्यात आली. शहरातसुध्दा अनेक ठिकाणी खाद्यपदार्थ व चहापानाचे वाटप होताना दिसत होते. एका ठिकाणी मुस्लिम समाजाच्यावतीने चहापान दिले जात होते, त्या कृतीने जास्त लक्ष वेधून घेतले. बऱ्याचवेळा एक धर्मातील लोक दुसऱ्या धर्माचा द्वेष करताना दिसतात. कोणताही धर्म दुसऱ्याचा द्वेष करावा असे सांगत नाही. मानवी मनानेच या भिंती उभ्या केल्या आहेत.आजच्या घटनेने सर्वधर्मसमभावाची शिकवण दिली. आपणही कोणत्याही धर्माचा द्वेष करु नये. इतर धर्मातील चांगल्या गोष्टींचा स्वीकार करावा असे मला वाटते.
राजेंद्र पवार
९८५०७८११७८
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा