शनिवार, ९ जुलै, २०२२

!!वारी पंढरीची २०२२ !! ( दिवस अठरावा ८ जुलै )

 !!वारी पंढरीची २०२२ !! ( दिवस अठरावा ८ जुलै )

            आज भंडीशेगावहून ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे दुपारी एक वाजता वाखरीच्या दिशेने प्रस्थान झाले. सुरुवातीपासूनच पावसाच्या हलक्या सरी कोसळायला सुरुवात झाली. मध्ये कधीतरी पावसाची उघडीप असायची. आज वाखरीपर्यंत दोन रिंगणे झाली. उभे रिंगण प्रथम झाले. महामार्गावर रिंगण झाल्यामुळे सगळ्यांनाच अधिक आनंद लुटता आला. रस्ता डांबरी असल्याने फुगड्या तसेच अन्य खेळ खेळण्याचा आनंद  वारकऱ्यांनी लुटला.  रिंगणात स्वार असलेला अश्व व माऊलींचा अश्व धावताना प्रत्येक जनाच्या तोंडातून माऊली, माऊली असा जयघोष होत होता. दिंड्या हळूहळू पावसाच्या सरी झेलत पुढे मार्गक्रमण करत होत्या.

                थोड्याच अंतरावर वाखरी पालखी तळ आला. तो भाग बाजीरावाची विहीर म्हणून ओळखला जातो. येथे गोल रिंगण झाले. रिंगणाच्या ठिकाणी बऱ्यापैकी चिखलाचे साम्राज्य होते.तशाही परिस्थितीत रिंगणाचा लोकांनी आनंद लुटला. बऱ्याच लोकांचे कपडे चिखलाने माखले होते. अशा चिखलमय स्थितीत वारकऱ्यांनी अनेक खेळ खेळले. रिंगण म्हटलेकी परिसरातील लोकांची मोठी यात्राच असते. लोक खऱ्याअर्थाने यात्रेचा आनंद लुटत होते.









               रिंगणाजवळ बागल वस्तीवर थोडा वेळ आम्ही थांबलो होतो. यावेळी ज्ञानेश्वर शिंदे माऊली, वैष्णव चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष विजय कासुर्डेआणि उद्योजक गोरख चव्हाण यांची अध्यात्म, शिक्षण, समाजसेवा या विषयावर भरपूर चर्चा झाली. त्या चर्चेत मलाही भाग घेण्याची संधी मिळाली. कोणतीही संस्था नावारुपाला यायची असेल तर निरपेक्ष भावनेने काम करणारी टीम असायला हवी. वैष्णव चॅरिटेबलची निर्मिती सेवाभावातून  झाली आहे. या संस्थेचे विद्यमान अध्यक्ष विजय कासुर्डे आळंदी ते पंढरपूर पायी वारी करतअसत. या वारीत आरोग्याविषयी कोणतीच काळजी घेतली जात नाही हे त्यांच्या लक्षात आले. आपणच यासाठी काही तरी केलं पाहिजे, यातूनच वैष्णव चॅरिटेबल ट्रस्टचा जन्म झाला. वैष्णव चॅरिटेबल ट्रस्ट गेली २९ वर्षे वारकऱ्यांना आरोग्यविषयक सुविधा पुरवत आहे. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत सोपानदेव या तिन्हीही पालखी मार्गावर या ट्रस्टच्या माध्यमातून सेवा पुरवली जाते. याशिवाय आदिवासी भागासाठी वर्षभर काम चालूच असते. देहू संस्थानसाठीही प्रासंगिक सेवा पुरवली जाते. या संस्थेचा ८०ते ९० लाखापर्यंतचा टर्नओव्हर आहे. ही सर्व रक्कम तसेच औषधे देणगी स्वरुपात मिळवली जातात. या संस्थेने कोविडच्या काळात मोफत लसीकरणाचे काम केले आहे. सेवाभावी कार्य असेल तर समाज अशा संस्थांना भरभरुन सहकार्य करत असतो.

                आपण प्रत्येकजण कोणत्या ना कोणत्या संस्थेशी संबधीत असतो. आपण त्या संस्थेत निरपेक्ष भावनेने, सेवाभावी वृत्तीने काम करावे, आपण संबधित असलेली संस्था नावारुपाला आणावी असे मला वाटते.

 राजेंद्र पवार

  ९८५०७८११७८

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

!!ग्रीन पुणे मान्सून हिल मॅरेथॉन२०२५ !!

 !!ग्रीन पुणे मान्सून हिल मॅरेथॉन२०२५ !!              आज रविवार दिनांक १३ जुलै २०२५ रोजी पुणे येथे" ग्रीन पुणे मान्सून हील मॅरेथॉनचे ...